
पूर्वी इतका नाही पण अजूनही पोस्टाने पत्रव्यवहार सुरु आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस, पोस्टमन, पत्रपेट्या, पत्र, आंतर्देशिय पत्र वगैरे गोष्टी आपल्याला माहिती आहेत. वर्षातून एकदा अनेक शाळा मुलांना 'अभ्यास सहल' म्हणून पोस्ट ऑफिस दाखवायला घेऊन जातात. तिथलं काम कसं चालतं, पत्र कुठून कशी येतात? कशी वितरित होतात हे सगळं त्या अभ्यास सहलीत दाखवलं जातं. त्या अभ्यास सहलीनंतर मुलांना पत्र लिहिण्याचा गृहपाठही दिला जातो. मुलं तेव्हा आनंदाने आई-बाबा, ताई-दादा, मित्र मैत्रिणी, शिक्षक, आजी आजोबा, आत्या- मावशी -काका-काकू यांना पत्र लिहितात. ते पत्र वाचून त्यांना किती आनंद झाला याची मजा अनुभवतात. आपण ठरवलं तर आजही ज्यांना हवं त्यांना पत्र लिहून पोस्ट करु शकतो. पण हे आता डेन्मार्कमधील मुलं करु शकणार नाहीत. मुलंच काय मोठी माणसंही करु शकणार नाहीत. कारण आता या देशाने 'पोस्टनाॅर्ड' ही आपली पोस्टल सेवा बंद करुन टाकली. अनेकांना यामुळे फार वाईट वाटलं. टेलिफोन, इंटरनेट, मोबाइल, व्हाॅट्सॲप यासारख्या सोय सुविधा येण्याआधी ऐकमेकांना जोडून ठेवण्याचं काम करणारी ही पोस्टल सेवा या देशाने एकदम कशी बंद केली असेल?
हेही वाचा!
रुबिक्स क्यूब? हा किचकट गेम फक्त ४.२३ सेकंदात कसा सुटू शकतो?
-खरंतर ही डेन्मार्कमधील टपाल सेवा बंद झाल्याची बातमी आत्ता मिळत असली तरी त्याबाबतचा विचार अनेक वर्षांपासून सुरु होता. याचं कारण इ.स.२००० सालापसून पत्रव्यवहारात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत होती. थोडी थिडकी नाही तर पूर्वीच्या तुलनेत ९० टक्के पत्रव्यवहार कमी झाला होता. तेव्हापासून नंतर प्रत्येक वर्षी पोस्टाने पत्र पाठवण्याचा लोकांचा रस कमी झाला होता. इंटरनेट, व्हाॅट्सअप ही संपर्क यंत्रणा हाताशी असताना लोकं आता पत्र लिहून एकमेकांना आपली ख्याली खुशाली कळवत नाही. पण भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भाग जिथे इंटरनेट सारख्या सोयी सुविधा सहज उपलब्ध नसतात तिथल्या लोकांना दूरवरच्या लोकांशी बोलण्यास पत्र हेच माध्यम उपयुक्त ठरत होतं. पण डेन्मार्कमधील या लोकांची ही सोय आता बंद झाली आहे.
डेन्मार्कमध्ये पत्र पाठवण्याच्या खर्चात एका नव्या कायद्याने मोठी वाढ झाली. नव्या कायद्यानुसार पत्र पाठवण्यास आता डेन्मार्कच्या लोकांना ४.५५ डाॅलर्स म्हणजे जवळजवळ ४१५ रुपये खर्च येऊ लागाला. या खर्चामुळेही पत्र पाठवणाऱ्यांची संख्या आणखीनच कमी झाली. त्यात गेल्या दहा वर्षांपासून डेन्मार्कने आपल्या देशात डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणात सुरु केल्या. त्या लोकांनी वापराव्यात यासाठी मोठा प्रचार प्रसार केला. त्याचा परिणाम म्हणजे लोकं संवादासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करु लागले. सरकारच्या या डिजिटल धोरणामुळेही लोकांचं पत्र लिहिणं, पत्र पाठवणं कमी झालं.

१७व्या शतकात डेन्मार्कमध्ये पोस्टनाॅर्ड सेवा सुरु झाली होती. ४०० वर्ष जुनी सेवा बंद केल्याने तिथे काम करणाऱ्या २,००० कर्मचाऱ्यांना घरी जावं लागलं. देशभरात १५०० पत्रपेट्या होत्या. त्याही काढल्या गेल्या. आता पोस्टनाॅर्ड ही फक्त पॅकेजेसचं वितरण करणार आहे. डेन्मार्क आणि स्वीडनमध्ये पोस्टनाॅर्ड टपाल सेवा देत असे. आता या नव्या निर्णयानंतर पोस्टनाॅर्ड डेन्मार्कमधील टपाल सेवा बंद करणार असली तरी स्वीडनमध्ये ती सुरु ठेवणार आहे. सध्या डेन्मार्क हा पहिला युरोपियन देश आहे ज्याने आपली टपाल सेवा बंद केली आहे. इंटरनेट, व्हाॅटसअप, फेसबुक सारख्या सुविधा यामुळे पत्र लिहिण्याची कमी होत गेलेली गरज आणि आवड यामुळे डेन्मार्क हा असं पाऊल उचलणारा एकटा देश नक्कीच ठरणार नाही, अशी खात्री पोस्टात काम करणाऱ्या लोकांना वाटते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


