अभ्यास करूनही परीक्षेला जातांना अभ्यास झालेला नाही असं का वाटतं?

– डाॅ. श्रुती पानसे

मी नेहमी अभ्यास करतो. गृहपाठ करतो. परीक्षांमध्ये सुद्धा खूप जास्त नाही पण बरे मार्क असतात. पण तरीसुद्धा जेव्हा परीक्षेला जायची वेळ येते त्यावेळेला मला असं वाटतं की माझा अभ्यास झालेलाच नाही. असं का होत असेल?

image : brgfx

विशेषत: वार्षिक परीक्षेत  खूप जास्त अभ्यासक्रम असतो. तो सर्वच्या सर्व लक्षात राहणं हे सर्वांना शक्य होत नाही.  काही थोडक्या लोकांना कदाचित शक्य होत असेल पण पूर्ण अभ्यासक्रम माहिती असणं, तो लक्षात असणं ही गोष्ट तशी फार सोपी नाही . त्यामुळे कदाचित आपला अभ्यास झाला नाही असं वाटत असेल. 

जे काही शिकवलं गेलेलं आहे त्यातला काही भाग - जो महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला पुढच्या इयत्तासाठी महत्त्वाचा आहे, त्यावर भर देऊन त्यावर परीक्षा घेतली जाते. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. 

आपण अभ्यास केलेला आहे, पण अचानक कोणीतरी एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटकन आठवत नाही. पण जर आपण अभ्यास केलेला असेल तर,  थोडा जास्त विचार केला तर ते उत्तर आपल्याला आठवू शकतो. मेंदूमध्ये ही क्षमता असते की प्रत्येक वेळेला प्रश्न विचारल्यावर दुसऱ्या सेकंदाला कदाचित आपल्याला ते उत्तर येणार नाही . पण याचा अर्थ ते आपल्याला आठवणार नाही आणि आपल्याला लिहिताच येणार नाही असं नाही. त्यामुळे थोडं  आठवावं  लागेल, थोडा विचार करावा लागेल. असं केलं तर उत्तर आपल्याला नक्की सापडेल. 

 

हेही वाचा!

जे ऑप्शनलला टाकलं आणि त्यावरच जर पेपरमध्ये प्रश्न विचारले तर?

आपला अभ्यास नक्की झाला आहे का अशी शंका कधी येते, जर आपल्याला परीक्षेची जास्त भीती वाटत असेल, मनावर ताण आला असेल तर! या आधीच्या परीक्षांमध्ये सुद्धा असाच झालं होतं. अभ्यास झाला होता, पण वाटत होतं की अभ्यास झालेलाच नाही. पण जेव्हा प्रश्नपत्रिका वाटल्या आणि पेपर बघितला तेव्हा पेपर नीट सोडवता आला. आणि मार्क ही चांगले मिळाले. असं या आधी जेव्हा घडलं असेल तेव्हा ते आठवा, म्हणजे आत्ताही अभ्यास केला आहे याची जाणीव होईल. ‘मी अभ्यास केला आहे आणि जे प्रश्न येतील त्यांची मी नीट उत्तरं देईन’ असं म्हटलं तर ताण हलका होतो. उत्तरं लिहिता येतात. 

( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)

shruti.akrodcourses@gmail.com

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 9112050500
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact