
तुम्ही रोजचा पेपर वाचता का? वाचत असाल तर सार्थक सिद्धांत हे नाव तुमच्या डोळ्यांखालून नक्की गेलं असेल.
सार्थकने नुकताच बारावी झाला, म्हणजे तुम्हा सगळ्यांपेक्षा तो थोडासाच मोठा असेल… पण सार्थकने एवढ्या लहान वयात जे डेअरिंग केलं त्यामुळे आज देशभर त्याचं खूप कौतुक होतंय. त्याचे फोटो, मुलाखती सगळीकडे छापून येतायेत. असं काय केलं सार्थकने हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना? सार्थकने काय केलं त्याची गोष्ट मोठी इंटरेस्टिंग आहे.
हेही वाचा!
आम्ही कशाला पेपर वाचू? पेपर वाचल्याने मुलांना मिळतं तरी काय?
सार्थक हा झारखंड राज्यातल्या राँची या शहरात राहातो. नुकतीच त्याने सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा दिली. त्याचा रिझल्ट लागला. छान मार्क मिळून तो पास झाला खरा, पण त्याला मिळालेल्या मार्कांनी त्याचं स्वतःचंच समाधान होईना. आपल्याला अजून चांगले मार्क मिळायला हवेत, आपले मार्क नक्की कुठे आणि कसे गेले ही रुखरुख त्याला लागली होती. म्हणून त्याने रीचेकिंगचा फॉर्म भरला. रीचेकिंगचा फॉर्म भरल्यानंतर ज्या ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टिममधून त्याचा पेपर तपासण्यात आला त्या सिस्टिमवर त्याच्या पेपरची स्कॅन केलेली कॉपी, म्हणजे थोडक्यात त्याने लिहिलेल्या उत्तरपत्रिकेचे चक्क फोटोच त्याला बघायला मिळाले. ते फोटो बघायला मिळाले आणि ‘आपले मार्क गेले कुठे?’ या प्रश्नाचं उत्तर सार्थकला मिळालं. त्याच्या उत्तरपत्रिकेतली काही पानं ही दुसऱ्याच कुणाच्यातरी उत्तरपत्रिकेतून आलेली होती. ऑन स्क्रीन मार्किंगसाठी उत्तरपत्रिकेची पानं स्कॅन करुन, म्हणजे थोडक्यात तिचे फोटो काढून ते अपलोड केले जात असताना हा घोळ झालाय हे त्याच्या लक्षात आलं. मग सार्थकने या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं आणि यातले अनेक गैरव्यवहार त्याने पुराव्यांसकट समोर आणले. सीबीएसईने हे काम करण्यासाठी कुठल्या कंपनीला काँट्रॅक्ट दिलं, ते देताना अनेक नियम कसे पायदळी तोडण्यात आले वगैरे गोष्टी त्याने केलेल्या शोधामुळेच समोर आल्या. तो फक्त एवढंच करुन थांबला नाही तर देशाच्या शिक्षण विषयक संसदीय समितीसमोरही त्याने हे प्रकरण मांडलं.
आता तुमच्यापैकी अनेक मुलं सीबीएसईच्या शाळेत जात असतील. तुम्हाला माहितीच असेल, दरवर्षी लाखो मुलं सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांना बसतात. परीक्षा घेणाऱ्या, त्या परीक्षांचे निकाल लावणाऱ्या यंत्रणा असे घोळ घालत असतील तर यातल्या कितीतरी मुलांचं नुकसान होणार, या विचारातून सार्थकने हे सगळं केलं. या कामात सार्थकला त्याच्या दोन मित्रांचीही खूप मदत झाली. निसर्ग अधिकारी हा सार्थकचा मित्र एथिकल हॅकर आहे. ‘चोरीच्या उद्देशाने सायबर गुन्हेगारांनी अमुक बँकेची वेबसाईट हॅक केली’ वगैरे बातम्या तुम्ही वाचल्या असतील. हॅकिंग ही काही चांगली, योग्य, कायदेशीर गोष्ट नाही. आपल्या स्वार्थासाठी एखादी वेबसाईट, मोबाईल किंवा एखादी मोठी सिस्टिम हॅक करणं म्हणजे चोरीच… पण ‘हॅकिंग’ करण्यासाठी लागणाऱ्या ज्ञानाचा, कौशल्याचा वापर जेव्हा एखादं चांगलं काम करण्यासाठी, कुणाच्यातरी भल्याच्या उद्देशाने केला जातो तेव्हा त्याला एथिकल हॅकिंग म्हणतात. निसर्ग या सार्थकच्या मित्राने तेच केलं आणि डिजिटल मार्किंग सिस्टिमच्या डेटाचं विश्लेषण केलं. त्यात कुठे काय गडबड आहे हे शोधून काढलं. सीबीएसईच्या वेब पोर्टलमध्ये सायबर आणि डेटा सिक्युरिटीसंदर्भातही अशा गडबडी होत्या. त्याही त्याने शोधल्या. वेदांत श्रीवास्तव या त्यांच्या मित्रानेही सार्थकसारखाच री-चेकिंगसाठी अर्ज केला तेव्हा त्यालाही दुसऱ्याच कुणाचीतरी उत्तरपत्रिका आपल्या नावावर दिसत असल्याचं दिसलं. ते त्याने उघड करुन दाखवलं आणि डिजिटल मार्किंग सिस्टिम कशी गोंधळ घालते आहे ते समोर आणलं. या तिघांनी मिळून केलेल्या या सगळ्या कष्टांमुळे एक मोठा गैरप्रकार उघडकीला आला. आता तो दूर करण्यासाठी काम होईल. पुन्हा असे प्रकार व्हायला नको, म्हणून खबरदारी घेतली जाईल आणि भविष्यात, तुमच्या सारख्या अनेक मुलांना सार्थक आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या या कामाचा उपयोग होईल, अशी शक्यता आहे.

मग आता यातून तुम्ही काय शिकायचं?
- तुमच्या रोजच्या जगण्यात तुम्हालाही कधीतरी काहीतरी चुकीचं दिसतं. ते चुकीचं आहे हे कळतंसुद्धा… पण आपण लहान आहोत म्हणजे आपण काहीच करु शकत नाही, ही सगळी मोठ्यांची कामं असं तुम्ही म्हणता. सार्थक, निसर्ग आणि वेदांतने मात्र ‘आम्ही काय करु?’ असा विचार केला नाही, उलट नेमकं काय चुकतंय याच्या मुळापर्यंत गेले. त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले.
- आपल्यावर अन्याय होत असेल, एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होत असेल, तर त्याविरोधात आवाज उठवायचा. असा आवाज उठवताना थोडी भीती वाटू शकते, पण तुमचं खरं असेल तर सगळ्यांना तुमचा आवाज ऐकायला लागतोच, हे लक्षात ठेवायचं.
- स्वतःवर, स्वतःच्या अभ्यासावर, स्वतःच्या क्षमतेवर आपला विश्वास हवा. सार्थक किंवा त्याचे मित्र कमी मार्क बघून गप्प बसले नाहीत, कारण आपण किती अभ्यास केलाय आणि आपल्याला किती मार्क मिळू शकतात, यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे मार्क कुठे गेले हे शोधायचं त्यांनी ठरवलं आणि त्यामुळेच हा एवढा मोठा घोळही ते उघड करु शकले.
- आपण लहान असलो तरी लिंबू टिंबू नाही, आपण ठरवलं तर आपल्या हातूनही मोठं काम होऊ शकतं आणि त्यामुळे मोठमोठ्या माणसांना आणि यंत्रणांना आपण घाम आणू शकतो.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


