आरुषला समजलं फुलांवर बसलेल्या मधमाश्यांचं सीक्रेट

Image: freepik

आपण लावलेल्या झाडाला आलेल्या फुलावर कोण भिरभिरतंय ते बघायला आरुष उत्साहाने गेला. आणि बघतो तर काय??? खरंच त्याच्या बागेतल्या फुलावर एक मधमाशी भिरभिरत होती. आरुष तिच्यापासून जरा लांब थांबला आणि एका खुर्चीआड लपून ती काय करतीये ते बघायला लागला.  मधमाशीने त्याच्या फुलावरून चार - पाच घिरट्या घातल्या आणि मग ती अलगद  छोट्याश्या फुलाच्या एका पाकळीवर उतरली. तिथून दोन-तीन पावलं चालत गेली आणि मग त्या फुलाच्या मध्यभागी तिने हळूच सोंड खुपसली. जरा वेळ तिथेच बसली.

आरुषला वाटलं की आपण आता जरा जवळ जाऊन बघावं, म्हणून तो जागेवरून उठला आणि त्या मधमाशीच्या दिशेला एक पाऊल गेला तर ती मधमाशी उडून गेली. आरुषला वाटलं, की ती आपल्यामुळे उडून गेली. त्याला फार वाईट वाटलं. आता ती मधमाशी परत येणारच नाही, असं त्याच्या मनात आलं, आणि तेवढ्यात ती मधमाशी परत आली. आणि परत त्याच झाडावरच्या दुसऱ्या फुलावर बसली. परत तिने त्या फुलात तोंड घातलं, जरा वेळ बसली आणि उडून गेली. आता आरुषच्या लक्षात आलं, की आपल्याला जरी ती नुसती बसल्यासारखी वाटत असली, तरी त्यावेळी ती सोंडेने मध घेत असणार. तो ती मधमाशी परत येण्याची वाट बघत बसला. तर थोड्या वेळाने ती मधमाशी परत आली, पण या वेळी ती तिच्या अजून ४ मैत्रिणींना घेऊन आली.

बाप रे! पाच मधमाश्या???! आरुष घरात पळून आला आणि आत लपून त्या काय करतायत ते बघत बसला. जरा वेळाने त्याला बसून राहण्याचा कंटाळा आला आणि तो खेळायला गेला. पण तो संपूर्ण दिवस येता-जाता त्याच्या झाडांकडे बघत होता आणि संपूर्ण दिवस त्या मधमाश्या जराही न थांबता, न कंटाळता त्याच्या बागेतल्या फुलावर येत होत्या, त्यातून मध काढून नेत होत्या आणि संपूर्ण दिवसात त्यांनी एक मिनिटसुद्धा खेळायला सुट्टी घेतली नाही.

आता आरुषला त्यांच्याबद्दल फारच उत्सुकता वाटायला लागली. आणि त्याने ठरवलं, की उद्या सकाळी ती पहिली मधमाशी परत आली, की तिला तिच्याबद्दल माहिती विचारायची.

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी लौकर उठून तो मधमाशीची वाट बघत बसला.

हेही वाचा : 

मधमाश्यांना घरातल्या बागेत बोलावण्यासाठी आरुषची लगबग

दुसऱ्या दिवशी सकाळी आरुष लौक्कर उठून त्याच्या फुलांच्या जवळ अगदी गुपचूप बसून राहिला. जरा वेळाने गूं गूं करत ती मधमाशी आली आणि आपल्याच नादात येऊन त्या फुलावर बसली. तिचं आजूबाजूला लक्षच नव्हतं. त्यामुळे तिला आरुष दिसलाच नाही. तिने येऊन त्या फुलात सोंड खुपसली आणि ती डोळे मिटून शाळेत प्रार्थनेच्या वेळेला बसवतात तशी गप्प बसली. आरुष जरा त्या फुलाच्या जवळ सरकला आणि हळूच म्हणाला,

“हाय!”

“फुर्रर्रर्रर्रर्रर्र!” मधमाशी इतकी जोरात दचकली की तिच्या सोंडेतून आत्तापर्यंत गोळा केलेल्या मधाचा एक छोटासा फवाराच उडाला. तिने घाईघाईने पंख उघडले आणि ती उडून जायच्या तयारीला लागली. आरुष म्हणाला,

“अगं घाबरू नकोस. मी तुला पकडायला नाही आलोय. तुझ्याशी गप्पा मारायला आलोय.”

तरी पण मधमाशीने काही पंख मिटले नाहीत. मग आरुष परत म्हणाला,

“अगं मधमाशी, तुला मध मिळावा म्हणून मीच इथे ही झाडं आणून लावली. मग मी तुला पकडीन का? मारीन का? सांग बरं…”

मधमाशीने त्यावर जरा विचार केला आणि तिने उडायच्या तयारीने उघडलेले पंख हळूच मिटले. मग आरुष म्हणाला,

“तुला या फुलातला मध आवडला का?”

“हो.” मधमाशी म्हणाली. तिचा आवाज पण गुणगुणल्यासारखा होता.

“तुझ्या मैत्रिणी कुठे गेल्या?”

“त्यांना जरा उशीर झाला. पण त्या येतीलच एवढ्यात.” मधमाशी परत त्या गुणगुणल्यासारख्या आवाजात पण स्पष्टपणे म्हणाली.

“तुझं घर खूप लांब आहे?”

“थोडंसं लांब आहे. उडत जायला ५-७ मिनिटं लागतात.”

“अच्छा…” आरुष म्हणाला. पण उडत जायला ५-७ मिनिटं म्हणजे नेमकं किती लांब ते काही त्याला कळलं नाही. पण बहुतेक मधमाशीच्या ते लक्षात आलं असावं. कारण तिने लांबवर दिसणाऱ्या एका मोठ्या झाडाकडे तिचा एक पाय केला आणि म्हणाली,

“ते आंब्याचं झाड आहे ना, त्याच्या वरच्या फांदीवर घर आहे माझं.”

“आणि तुझ्या मैत्रिणींचं घर कुठे आहे?” आरुषने विचारलं.

“आम्ही सगळ्या जणी एकाच घरात राहतो.”

“एकाच घरात? कसलं भारी ना!” आरुष एकदम टाळी वाजवून म्हणाला. “म्हणजे तुम्हाला केव्हापण एकमेकींशी गप्पा मारता येत असतील आणि खेळता येत असेल ना?”

“येतं, पण आम्हाला खेळायला वेळच नसतो.”

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact