मधमाश्यांच्या पोळ्यात आरुषला दिसला एक गुप्त कप्पा.कोण होतं त्यात?

 

image : iStock

मधमाशीने आरुषला सरळ पोळ्याची टूर करायला नेलं. त्या पोळ्यातली एकूण शिस्त, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे मॅनेजमेंट बघून आरुष सॉलिड इम्प्रेस झाला. त्याने बघितलं की मधमाश्या स्वतःचं पोळं अक्षरशः स्वतः तयार करतात. आणि ते सगळं पोळं मऊ सोनेरी तपकिरी रंगाच्या मेणाचं बनवलेलं असतं. काही मधमाशांना ते मेण तयार करण्याचं काम नेमून दिलेलं होतं. त्यांनी तयार केलेलं मेण दुसऱ्या काही मधमाश्या घेऊन जात होत्या आणि त्या मेणाचे एकसारखे षट्कोनी कप्पे बांधून पोळं मोठं करत होत्या. आरुष कितीतरी वेळ ते नुसतं बघत राहिला. आपल्याला फुटपट्टी, कोनमापक, पेन्सिल आणि खोडरबर घेऊनसुद्धा परफेक्ट षट्कोनी काढता येत नाही, आणि या पिटुकल्या मधमाश्यांना मात्र ते परफेक्ट जमलेलं होतं. 

त्यांनी बांधलेल्या षट्कोनी घरांमध्ये अजून काही मधमाश्या फुलांमधून गोळा करून आणलेला मध आणून टाकत होत्या. त्याच्या समोर लगेच काही माश्या येऊन एकसारखे पंख हलवून तो मध वाळवत होत्या. शेजारच्या काही कप्प्यांमध्ये काही मधमाश्यांनी रंगीबेरंगी परागकण आणून भरले होते. त्या कुठल्या कुठल्या फुलांवर गेल्या असतील आणि किती लांबून ते घेऊन आल्या असतील त्यांचं त्यांनाच माहीत! काही मधमाश्या पूर्ण भरलेले मधाचे आणि परागकणांचे कप्पे मेणाने सील करत होत्या.

काही मधमाश्या चक्क तयार मध आणि परागकण एकत्र करून त्याचे छोटे छोटे गोळे करत होत्या. त्या तो गोळा घ्यायच्या आणि उडत उडत कुठेतरी निघून जायच्या. पण त्या कुठे गेल्या ते काही केल्या आरुषला समजत नव्हतं. झालं होतं असं, की पोळं खूप मोठं होतं, आणि ते दोघं त्याच्या एकदम खालच्या बाजूला बसलेले होते. त्यामुळे या मधमाश्या ते छोटे गोळे घेऊन पोळ्याच्या वरच्या बाजूला कुठे जातायत ते काही केल्या त्याला दिसत नव्हतं. शेवटी तो आणि त्याची मैत्रीण मधमाशी तिथून उडाले आणि उडत उडत पोळ्याच्या वरच्या बाजूला गेले. इथे तुलनेने काम करणाऱ्या मधमाश्यांची गर्दी थोडी कमी होती. 

इथल्या एका अर्ध्या बंद केलेल्या कप्प्यात एका मधमाशीने तो परागकण आणि मधाचा गोळा टाकला, आणि ती तिथून उडून गेली. ‘ही काय आयडिया आहे?’ असा विचार आरुषच्या मनात येणार तेवढ्यात त्याला त्या कप्प्यात चक्क काहीतरी हालचाल दिसली. आणि तो मधमाशीला म्हणाला,

“अगं अगं त्या कप्प्यात कोणीतरी आहे!”

हेही वाचा : 

मधमाशी झालेल्या आरुषला पोळ्यामध्ये दिसलं मधमाश्यांचं अनोखं जग

मधमाश्यांच्या पोळ्यात गेलेल्या आरुषला इतका वेळ फक्त काम करणाऱ्या माश्या दिसल्या होत्या आणि पोळ्यातले षट्कोनी कप्पे सगळे मधाने आणि परागकणांनी भरलेले दिसले होते. त्यामुळे त्या एवढ्याच्या कप्प्यात कोणी असेल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. पण त्याच्या मैत्रीण मधमाशीने त्याला त्या कप्प्याच्या जवळ नेलं आणि म्हणाली,

image : vista create

“अरे त्याच्यात अळी मधमाशी असेल.”

“अळी का मधमाशी?”

“अळी मधमाशी! म्हणजे पिल्लू मधमाशी. सगळ्या मधमाश्या लहानपणी अळ्याच असतात.” असं म्हणून मधमाशीने त्याला त्या कप्प्याच्या आतली छोटीशी मधमाशीची अळी दाखवली आणि म्हणाली,

“आता या अळीला पुरेल इतकं खायला देऊन आम्ही तो कप्पा बंद करणार. मग आतल्या आत त्या अळीची मधमाशी तयार होईल आणि मग ती उडायला तयार झाली की तो कप्पा उघडून बाहेर येईल.”

“ओह!” आरुषला त्यावर काय बोलावं ते सुचेना. तो इतका मोठा झाला तरी कधी कधी आईने भरवण्यासाठी हट्ट करायचा. आणि ही मधमाशी तिची तिची मोठी होऊन बाहेर येणार होती. तेवढ्यात त्याला जरा पलीकडच्या कप्प्यातून काहीतरी पांढरा जेलीसारखा पदार्थ थोडासा बाहेर आलेला दिसला. त्याच्याकडे सगळ्यात पुढचा पाय करत त्याने विचारलं,

“ते पांढरं काय आहे? वेगळा मध आहे का?”

“पांढरं?” मधमाशीने आरुषने पाय केलेल्या दिशेला बघितलं, आणि म्हणाली, “ओह ते? ती रॉयल जेली आहे. ती अगदी छोट्या अळ्यांना भरवतात. म्हणजे त्या अंड्यातून जस्ट बाहेर आल्या की त्यांना ती रॉयल जेली खायला देतात.”

“का?”

“एकतर छोट्या अळ्यांना मध आणि परागकण खाता येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे रॉयल जेली मधून खूप ताकद मिळते. ती फार पौष्टिक असते.”

“सगळ्या अळ्या ती खातात?” आरुषने विचारलं, “खायला कटकट करत नाहीत? त्रास देत नाहीत?”

image : quora

“नाही… त्या का खायला नाही म्हणतील?” मधमाशी आश्चर्याने म्हणाली, “त्यातून त्यांनाच शक्ती मिळणार असते. त्यांचीच वाढ चांगली होणार असते. आणि लहान असतांना नीट खाल्लं नाही, तर त्यांनाच पुढे त्रास होईल ना!”

मधमाशीचं हे बोलणं ऐकून आरुषला एकदम आईचीच आठवण आली. ती पण कायम असंच म्हणायची, पण आरुष जेवतांना भाज्या खायला कायम कुरकूर करायचा. इथून पुढे आईला खाण्यासाठी त्रास द्यायचा नाही असं त्याने ठरवून टाकलं.

मधमाश्यांचं एकूण सगळं वागणं बघून त्याला पटकन घरी जाऊन चांगलं वागून दाखवावंसं वाटायला लागलं. आईची आणि बाबाची सॉलिड आठवण यायला लागली.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact