मधमाश्यांना घरातल्या बागेत बोलावण्यासाठी आरुषची लगबग

 

images : freepik

बाबा म्हणाला, “जी मधमाशी तुला चावली तिला आपण मारू शकत नाही, कारण ती माशी ऑलरेडी मेली असेल. आपल्याला चावलेली माशी नंतर जगत नाही.” सगळी मुलं आ वासून बाबाकडे बघत होती. इतका वेळ माश्या मारण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या मुलांना ती माशी खरंच मेली असेल म्हटल्यावर सॉलिड धक्का बसला. दोन मिनिटं कोणीच काही बोललं नाही. आणि मग अरहान हळूच म्हणाला,

“बिचारी! एवढी काही वाईट नव्हती ती.”

“हो ना…” अंकिता म्हणाली.

“पण मी नाही मारलं तिला.” आरुष अस्वस्थ होऊन म्हणाला. “खरंच बाबा. मी नाही मारलं तिला. मला तर दिसली पण नव्हती मधमाशी.”

“मला माहितीये बेटा.” बाबा म्हणाला.

“मग अशी कशी मेली ती?”

“मधमाशी जेव्हा डंख मारते तेव्हा ती तिची नांगी आणि त्याला लागून असलेली विषाची छोटीशी पिशवी आपल्याला फेकून मारते. तिला काही परत नांगी येत नाही. मग ती कशी जगणार?”

“हे किती वाईट आहे ना बाबा…” आरुषला आता मनापासून वाईट वाटलं होतं. त्याच्या हाताची आग व्हायची केव्हाच कमी झाली होती.

हेही वाचा : 

मित्रांशी खेळता खेळता आरुषच्या हाताला भूत चावतं तेव्हा!

 

“पण काका, जर का ती मधमाशी आपल्याला चावल्यावर मरते तर ती आपल्याला का चावते?” अरहान म्हणाला.

“आपला तिला हात लागला, तिला आपली भीती वाटली तर ती घाबरून चावते.”

“पण त्यापेक्षा तिने पळून जायला पाहिजे ना?” अंकिताने विचारलं.

“असं आपल्याला वाटतं. मधमाशीला काय वाटतं कोणाला माहिती?” बाबा म्हणाला.

“आपल्याला कळायला पाहिजे ना, मधमाशी काय विचार करते ते…” आरुष म्हणाला, “पण ते कसं कळणार? कारण मुळात मधमाशी आपल्या जवळ येणारच नाही कधी!”

“असं काही नाही…” बाबा म्हणाला, “एक आयडिया आहे ज्यामुळे मधमाशी आपल्या जवळ येईल पण आपल्याला चावणार नाही.”

“काय आयडिया?”

“काका सांगा ना!” सगळ्यांनी एकदम कल्ला केला.

“सांगतो… सांगतो…” बाबा म्हणाला. “मला सांगा मधमाशीला काय आवडतं?”

“मध!” तिघं एका आवाजात ओरडले. आणि मग अंकिता म्हणाली,

“मला समजलं मधमाशी कशी आपल्याकडे येईल ते!”

अंकिता म्हणाली, “मला समजलं की मधमाशी आपल्याकडे कशी येईल.”

“कशी?” आता अरहान आणि आरुषने तिच्याकडे मोर्चा वळवला.

“सोप्पंय!” अंकिता रुबाबात म्हणाली. “एक मोट्ठी मधाची बाटली आणायची आणि झाकण उघडून  खिडकीत ठेऊन द्यायची.”

“हो बाबा?”

“नाही.” बाबा मान हलवत म्हणाला, “मधमाश्या आपल्यासारख्या आळशी नसतात. दुकानात जाऊन बाटलीतून मध आणायला… त्या स्वतःचा मध स्वतः गोळा करतात. कशातून गोळा करतात बरं मध?”

“फुलातून!” सगळे एका आवाजात ओरडले.

“शाब्बास! मग तुम्ही जर मधमाश्यांना भरपूर मध मिळेल अशी फुलझाडं लावलीत आणि त्याला भरपूर फुलं आली, तर तुमच्याकडे मधमाश्या येतील.”

“आपण लावायला पाहिजेत ना झाडं?” अंकिता म्हणाली.

“हो ना.” अरहान म्हणाला, “आपल्या एरियात झाडं किती कमी आहेत. त्यात पण फुलांची अजूनच कमी आहेत. बिचाऱ्या मधमाशांना थोडुश्या मधासाठी किती लांब लांब उडायला लागत असेल…”

“हो ना.” आरुष म्हणाला, “आपण लावूया फुलांची झाडं. म्हणजे त्यावर मधमाश्या येतील. आणि शिवाय त्या आपल्या फ्रेंड्स असतील त्यामुळे त्या आपल्याला चावणार पण नाहीत.”

मधमाश्या या विषयावर ते अजून खूप  बोलत राहिले असते, पण बराच उशीर झाल्यामुळे अंकिता आणि अरहान दोघांच्या आया येऊन त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी घेऊन गेल्या. ते दोघं घरी गेल्यावर पण आरुषच्या डोक्यात मधमाश्याच गूं गूं करत होत्या. मधमाशी इतकं नुकसान करून घेऊन आपल्याला चावते याचं उत्तर त्याला पाहिजेच होतं. 

त्यामुळे त्याने आईबाबाच्या डोक्याशी भुणभूण करून, नर्सरीत जाऊन, कुंड्या आणून, माती भरून छोटी छोटी खूप सगळी फुलझाडं अंगणात लावली. आईची पक्की खात्री होती की तो  झाडांना पाणी घालेल आणि नंतर ते विसरून जाईल आणि मग आपल्यालाच रोज पाणी घालायला लागेल.

कदाचित तसं झालंही असतं, पण झालं काय, की आरुषने लावलेल्या झाडाला चौथ्या दिवशी फूल आलं. त्यामुळे उत्साह येऊन त्याने अजून दोन दिवस पाणी घातलं. मग अजून एका झाडाला फूल आलं.

आणि असं करता करता एक दिवस त्याला त्याच्या एका फुलावर कोणीतरी भिरभिरतांना दिसलं. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact