-शिवान दर्डा

जगभरातल्या शहरांमध्ये सगळीकडे कबुतरं दिसतात. खूप लोकांना ही कबुतरं गोंडस आणि आकर्षक वाटत असली तरी ती त्रासदायक ठरू शकतात. या पक्ष्यांबद्दल काही माहिती आपण समजून घेऊया.
तुम्हाला हे माहिती आहे का?
कबुतरांचा उपयोग संदेश पाठवण्यासाठी ऐतिहासिक काळापासून केला जातो. कबुतरांना शांतीचं प्रतिक समजलं जातं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांच्या वेळी शत्रूच्या निरोप पोचवण्यासाठी कबुतरांचा वापर केला गेला.
रोगांचे वाहक
कबुतरांमुळे होणारा रोगांचा प्रसार हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. कबुतरांच्या विष्ठेत माणसांसाठी हानीकारक असणारे जिवाणू, विषाणू आणि बुरशी मोठ्या प्रमाणात असतात. कबुतरांमुळे हिस्टोप्लॅस्मोसिस, क्रिप्टोकॉकासिस आणि सिटाकॉकॅसिस यासारखे अनेक आजार पसरू शकतात.
सतत आवाज करणं हाही कबुतरांचा एक वैताग असतो. ज्या घरापाशी कबुतरं असतात त्यातले लोक त्यांच्या सततच्या घुमण्याने वैतागून जातात. शिवाय जिथे कबुतरं मोठ्या संख्येने असतात तिथे त्यांच्या विष्ठेच्या असह्य होईल इतका घाणेरडा वास येतो.
हेही वाचा!
परकीय प्राणी आणि वनस्पती यांच्याविरुध्द युध्द सुरु आहे!
कबुतरांची वीणही झपाट्याने होते. त्यामुळे त्यांची संख्या भरभर वाढते आणि मग दाटी झाल्यामुळे त्यांच्यात भांडणं आणि मारामाऱ्या होतात.
इमारती, पुतळे आणि इतर उंच ठिकाणांना कबुतरांच्या विष्ठेचा त्रास सहन करावा लागतो. ही विष्ठा आम्लारी असल्याने तिच्यामुळे रंग, धातू आणि इतर बांधकाम साहित्याची झीज होते. त्यामुळे काही काळानंतर नुकसान होते. कबुतरांच्या घरट्यांमुळे गटार आणि मलनिःस्सारण व्यवस्थेतही अडथळे येतात.
कबुतरं निरागस दिसत असली तरी बऱ्यापैकी त्रासदायक असतात आणि आरोग्यालाही हानीकारक असतात. मात्र त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जाळं लावण्यासारख्या योग्य मार्गांचा उपयोग करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे कबुतरांचा काय त्रास होतो हे लोकांना समजावून सांगितल्यानेही उपयोग होतो.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?


