अवतीभवतीचे प्रश्न मांडण्यासाठी जॅडनने लिहिले काॅमिक बुक !

Image: brokelyn.com

अभ्यासाच्या पुस्तकांपेक्षा गोष्टीची पुस्तकं वाचायला किती मजा येते ना! अभ्यासालाही ही गोष्टीची पुस्तकं असती तर किती भारी झालं असतं! गोष्टीच्या पुस्तकातही चित्रकथा (काॅमिक) वाचायला तर आणखीनच मजा येते. चित्र आणि गोष्ट अशी दुहेरी गंमत असते त्यात. आपल्याला इतरांनी लिहिलेल्या गोष्टी वाचायला आवडतात. पण आपण कधी स्वत: गोष्ट लिहून पाहिली आहे का? किंवा एखादा संदेश देण्यासाठी गोष्ट लिहिण्याचा, त्यावर चित्र काढण्याचा कधी विचार केला आहे का? तुम्ही म्हणाल मुलांनी लिहिलेल्या गोष्टी कोण वाचणार? मुलांना हे कसं जमेल? पण हा समज चुकीचा ठरवलाय तो न्यूयाॅर्कमधील ब्रूकलीन परगण्यातील जॅडेन ॲन्थनी याने. आता जॅडेन १७ वर्षांचा आहे. पण त्याने जेव्हा काॅमिक बुक लिहिलं तेव्हा तो केवळ १२ वर्षांचा होता. मुलांना समजतं, जग बदलण्यासाठी मुलांमध्ये क्षमता असते. हे दाखवण्यासाठीच जॅडेन याने काॅमिक बुक लिहिलं. या काॅमिक बुकमध्ये आपली पृथ्वी वाचवण्यासाठी दृष्ट लोकांशी लढा देणारी मुलं यांची गोष्ट सांगितली आहे.

हेही वाचा!

२५ एप्रिल २०१४ मध्ये मिशिगनमधील फ्लिंट शहरात दूषित पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ह्यूराॅन तलावातून फ्लिंटला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. पण नंतर हे पाणी इतकं दूषित झालं की लोकं आजारी पडू लागले. त्यामुळे पाण्याचा स्त्रोत बदलावा लागला. ही घटना तेव्हा नऊ वर्षांच्या असलेल्या जॅडेनवर परिणाम करुन गेली. जॅडेन मोठा होत होता पण त्याच्या मनातून काही ही घटना जात नव्हती. जेव्हा त्याला काॅमिक बुकची कल्पना सूचली तेव्हा त्याच्या डोक्यात फ्लिंट शहरातील हा दूषित पाण्याच्या घटनेचा इतिहास होताच. जॅडेनने आपली ही कल्पना त्याच्या वडिलांना जोसेफ यांना सांगितलं. वडिलांना जॅडेनची काॅमिक बुकची कल्पना आवडली. मग दोघांनी मिळून त्यावर काम करायला सुरुवात केली.

किड ब्रूकलीन हे जॅडेनच्या काॅमिक बुकचं नाव. या काॅमिक बुक्समधील पात्र म्हणजे ब्रुकलीन शहरातले जॅडेनसारखी मुलं. यात स्वत: जॅडेन हा देखील एक पात्र आहे. बाकीची पात्रं म्हणजे जॅडेन याची लहानपणापासूनची मित्र मंडळी आहेत. यातलं एक पात्र फक्त काल्पनिक आहे. बाकीची सर्व पात्रं खऱ्याखुऱ्या जगातली किंबहुना जॅडेन स्वत: आणि त्याची मित्रमंडळीच होती. या काॅमिक बुकमधून जग बदलण्याची क्षमता मुलांमध्ये असते हे तर जॅडेनला सांगायचं होतंच सोबत अभ्यास करताना विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणित हे विषय खूप महत्वाचे असतात. आपल्याला जगात खरंच काही बदलायचं असेल काहीतरी करुन दाखवायचं असेल तर या विषयांचा अभ्यास करणं गरजेचं असतं असं जॅडेनला आणि त्याच्या मित्रांना जगभरातल्या मुलांना सांगायचं होतं. स्वत: जॅडेन ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेत विज्ञान, गणित, कम्प्युटर सायन्स या विषयांना अतिशय महत्व दिलं जात होतं. आणि हे विषय जॅडेनच्याही आवडीचे होते. या काॅमिक बुकमध्ये आपल्या खऱ्या खुऱ्या मित्रांचा समावेश केल्याने जॅडेनच्या मित्रांना खूप आनंद झाला. त्यांना त्याबद्दल खूप उत्सुकताही वाटायला लागली.

Image: brokelyn.com

हेही वाचा!

Image:goodreads

किड ब्रुकलीन या काॅमिक बुक्सच्या गोष्टीची सुरुवात मुख्य पात्र आणि शत्रू पात्र यांची ओळख करुन देण्यातून होते. जॅडेनचा झगडा शाळेतील एका विरोधी गटाशी चाललेला असतो. हा गट वाईट विचारांचा असतो. त्यांना ही पृथ्वी उध्वस्त करायची असते. पृथ्वीवरील नैसर्गिक गोष्टींचा नाश केल्यास पृथ्वी उध्वस्त होईल अशी या विरोधी गटाची कल्पना असते. या विरोधी गटाला विरोध करणारा आणखी एक गट असतो. हा गट जॅडेनला पृथ्वी वाचवण्यासाठी मदत करत असतो. त्यासाठी चांगला गट सूर्याचे खडे आणून ते जॅडेनला देतो. पृथ्वीवरील निसर्गाची हानी करण्याची भीती नष्ट करण्यासाठी या खड्यांद्वारे तो गट जॅडेनची ताकद वाढवतो.

किड ब्रुकलीन हे २०१७ मध्ये प्रकाशित झालं. तेव्हा हे पुस्तक खूप गाजलं. यातले हिरो हे कल्पनेतले नसून खरे आहे यामुळे तर जॅडेन आणि त्याच्या मित्रांचं खूप कौतुकही झालं. शिवाय हे काॅमिक बुक जॅडेन आणि त्याच्या वडिलांनी मिळून केल्याने वडील मुलगा यांच्यात एक घट्ट नातं तयार झालं. मुलं ही लहान असली तरी त्यांच्यातही अफाट क्षमता असते हे या काॅमिक बुकद्वारे जॅडेनने दाखवून दिल आहे. तुम्हीही जॅडेनचं 'किड ब्रुकलीन' हे काॅमिक बुक नक्की मिळवून वाचा आणि आपण काय करु शकतो याचा नक्की विचार करा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact