
हे खडूसकाका सोसायटीतल्या सगळ्या मुलांचे शत्रू होते. ते कायम काही ना काही कारण काढून मुलांना रागवायचे. ते काका गाडीतून उतरले, त्यांनी गाडी लॉक केली आणि या तिघांनी एका आवाजात ओरडायला सुरुवात केली, “उऊऊऊऊऊऊउ…” आणि आज त्यांनी काही ना करताच झाडाची पानं सळसळायला लागली, फांद्या जोरजोरात हलायला लागल्या. वाऱ्याचा घूं घूं आवाज यायला लागला. ते परत ओरडले, “उऊऊऊऊऊउ... “ त्यांच्या ओरडण्याच्याच वेळेला परत एकदा तेच पांढरं घुबड झाडाच्या शेंड्यावरून उडालं आणि त्या काकांच्या अगदी कानाजवळून “चिर्रर्र चिर्रर्र” करत उडून गेलं. मुलं झाडावर बसून वाट बघत होती की खडूसकाका एकतर निघून जातील किंवा कोण आहे ते बघायला झाडाच्या जवळ येतील. दोन मिनिटं झाली, पाच मिनिटं झाली… खडूसकाका काहीच करेनात. आणि मग मुलांच्या लक्षात आलं की ते भीतीने पांढरेफटक पडले होते. ते थिजल्यासारखे एकाच जागी उभे राहिले होते. आता ते तिथून हलत नाहीत तोवर मुलांना झाडावरून खाली उतरता येईना. काय करावं ते कळेना.

तेवढ्यात ते मगाचं पांढरं घुबड परत आलं आणि सरळ त्या काकांच्या गाडीवर बसून त्यांच्या तोंडाकडे बघून त्याने ‘चिर्रर्र चिर्रर्र’ करून ओरडायला सुरुवात केली. आणि त्याने बसल्या बसल्या पंख फडफडवले. त्याने खडूसकाका एकदम दचकून भानावर आले आणि वेड्यासारखे ओरडत सोसायटीच्या मधल्या मोकळ्या चौकाकडे धावत सुटले. आता तीन मिनिटात इथे मोठी माणसं येतील हे ओळखून तयारीत असलेल्या आद्य, झेलम आणि अवनीने धपाधप झाडावरून उड्या मारल्या आणि ते तिघं वेगळ्या रस्त्याने जाऊन मधल्या मोकळ्या जागेतल्या एका बाकावर जाऊन बसले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खडूसकाकांनी आरडाओरडा करून बरीच माणसं गोळा केली होती आणि त्यांना घेऊन ते आंब्याच्या झाडाकडे जायला निघाले होते.
हेही वाचा!
झाड गदागदा हलले आणि बघणारे सगळे घाबरुन पळाले!

आद्य, झेलम आणि अवनी हसू दाबत सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी खेळत बसले. आंब्याच्या झाडापाशी जाऊन काय होईल ते त्यांना माहिती होतं. आद्य, झेलम आणि अवनीच्या अपेक्षेप्रमाणे खडूसकाकांनी दुसऱ्या दिवशी सोसायटीच्या सेक्रेटरीशी बराच वेळ भांडून गाडी पार्क करण्यासाठी वेगळीकडे जागा मिळवली. एव्हाना आंब्याच्या झाडाखाली पार्क होणाऱ्या अजून तीन टू व्हिलर्स पण लोकांनी दुसरीकडे लावायला सुरुवात केली होती. आता फक्त तीन टू व्हीलर्स आणि एक कार उरली होती. तेवढ्या लोकांना पण जर या तिघांनी घाबरवलं असतं, तर त्यांनीही गाड्या दुसरीकडे लावायला सुरुवात केली असती. आणि एकदा झाडाखाली कोणी गाडी लावतच नाही म्हंटल्यावर पक्षी शिटून गाड्या खराब होणं, उंदरांनी वायर कुरतडून टाकणं असल्या तक्रारींना काही अर्थच उरला नसता आणि झाड तोडायचा विषय आपोआप बाजूला पडला असता. पण पुढचे दोन दिवस त्या तिघांना गपचूप झाडावर जाऊन बसायला काही चान्सच मिळाला नाही. संध्याकाळ झाल्यापासून सतत कोणी ना कोणी त्या झाडापाशी डोकावून जात होतं. एव्हाना त्या झाडालाही मुलांचा काय प्लॅन आहे ते समजलं होतं. त्यामुळे ते झाडही कोणी जवळ आलं की फांद्या हलवायचं, पानं हलवायचं. ते पांढरं घुबडसुद्धा अधून मधून कोणाच्या कोणाच्या डोक्यावरून उडत जायचं. त्यामुळे लोक संध्याकाळी तिथे यायचं टाळायला लागले. त्या उरलेल्या तीन टू व्हिलर्ससुद्धा त्यांच्या मालकांनी केव्हातरी सकाळी-दुपारी तिथून काढून नेल्या आणि दुसरीकडे लावायला सुरुवात केली.

आता त्या झाडाखाली फक्त एक पांढरी छोटी कार उरली होती. ती कार डी विंगमध्ये एकट्या राहणाऱ्या एका आजींची होती. त्या कुठल्यातरी कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्या खरं म्हणजे चांगल्या होत्या. मुलांना कधीच रागवायच्या नाहीत. त्यामुळे त्यांना घाबरवून पळवून लावायच्या कल्पनेने मुलांना पण वाईट वाटत होतं. पण त्याला काही इलाज नव्हता. त्यांचं झाड वाचवण्यासाठी ते तिघं काहीही करायला तयार होते. पण त्या आजी ती गाडी काढतच नव्हत्या. मुलं संधीची वाट बघत होती.
शेवटी एक दिवस त्या दुपारी गाडी घेऊन बाहेर गेल्या आणि संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत परत आल्या नाहीत. आद्य, झेलम आणि अवनी परत एकदा काळी ओढणी पांघरून आंब्याच्या झाडावर जाऊन बसले, आणि तिथूनच त्यांचा प्लॅन फसायला सुरुवात झाली.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


