
Image: digpu
अयान शांक्ता हा १४ वर्षांचा मुलगा. मुंबईत राहातो. त्याचे बाबा पायलट आहे. त्यालाही मोठेपणी पायलट व्हायचं आहे. पण अयानची ही एवढीच ओळख नाही. अयान हा पर्यावरणासाठी काम करतो. पर्यावरणवादी अशी लहानपणीच त्याची ओळख झाली आहे. आपल्या आवडत्या पवई तलावाला पूर्वीचं सौंदर्य प्राप्त करुन देण्यासाठी लहान असतानाही अयाननं स्वत:वर मोठी जबाबदारी घेतली आहे. पवई तलावाचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याचं त्याचं मिशन आहे. वाचूनच किती अवघड वाटतं ना. पण हे अवघड काम करण्याचं अयाननं ठरवलंय कारण त्याचं त्याच्या पवई तलावावर खूप प्रेम आहे.
अयान जेव्हा लहान होता तेव्हा त्याचे आई-बाबा त्याला पवई तलाव पाहायला घेवून जायचे. तलावातलं निळंशार पाणी, तलावाच्या अवतीभवतीचे प्राणी-पक्षी पाहून अयानला खूप मजा यायची. अयान नेहमीच आपल्या आई-बाबांसोबत पवई तलावावर जायचा. पण तो जसा मोठा होत गेला तसं पवई तलावाचं सौंदर्य पालटत गेलं. सुंदर दिसणारा तलाव अस्वच्छ झाला. तलावाची पार कचरा कुंडी झाली. स्वच्छ सुंदर तलावाचं हे बदललेलं विद्रूप रुप पाहून छोट्याशा अयानला खूप वाईट वाटायचं.
हेही वाचा!
हा तलाव का खराब झाला, कोणी खराब केला? याचंच दुख करत न बसता पवई तलावाचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याचं अवघड काम त्याने हाती घेतलं. हा प्रकल्प त्याचा होता. तो त्याने स्वत: डिझाईन केला. आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागेल याचं त्याने बारकाईन प्लॅनिंग केलं. हे सर्व प्लॅनिंग झाल्यावर त्याने पवई तलावाच्या पाण्याच्या अनेक चाचण्या केल्या. रासायनिक चाचणी, पाण्याचं पी एच मूल्य किती हे तपासणारी चाचणी. तलावात असणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करुन त्याने ' ॲक्शन रिसर्च रिपोर्ट' लिहिला. या त्याच्या रिपोर्टला होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त झालंं. गेल्या पाच वर्षांपासून अयान पवई तलावाच्या संवर्धनाच्या प्रकल्पावर काम करतोय. त्याने जेव्हा या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली तेव्हा अयान केवळ नऊ वर्षांचा होता. एवढ्या लहान वयात त्यानं खरंच किती मोठं काम हाती घेतलं आहे ना!
हेही वाचा!
पवई तलावातील प्रदूषणाचा अभ्यास करताना, संशोधन करताना अयाननं एक सर्वेक्षण ( सर्व्हे) केलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की पवई तलाव प्रदूषित झालाय याची ७० टक्के लोकांना माहितीच नव्हती. मग अयानने केवळ संशोधनच केलं नाही तर आजूबाजूच्या इमारतीत राहाणाऱ्या लोकांना, उद्योजकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना पवई तलावाच्या प्रदूषणाबाबत जागरुक करायला सुरुवात केली.
लहानपणी आई-बाबा अयानला भरपूर खेळण्या आणून द्यायचे. त्या सर्व खेळण्यात एकमेकांना जोडून तयार होणारे पझल्सच्या खेळण्या अयानला सर्वात जास्त आवडायच्या. त्यातूनच त्याला रोबोट बनवायची आवड निर्माण झाली. त्याने पाण्यातील प्रदूषण ओळखण्यासाठी 'हायड्रस' नावाचा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट पाण्याचं सतत परीक्षण करतो. पाण्याला प्रदूषित करणारे घटक ओळखतो. त्यामुळे जे लोक पाणी प्रदूषित करतात त्यांना जागरुक करण सोपं जातं. तसेच अयानने 'ॲटोनोमस स्पॅटिअल पोल्यूशन डिटेक्शन रोबोट' तयार केला आहे. हा रोबोट स्वयंचलित आहे.तो तलावाच्या सभोवताली फिरतो आणि पाण्यातील प्रदूषणाची पातळी तपासतो.

Image: digpu
अयान आपल्या मित्रांना, इतर मुलांना सांगतो की आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराचं नेहमी निरीक्षण करायला हवं. आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही पर्यावरणाच्या मुद्द्यावर आपण काम करु शकतो. जगात अशक्य असं काहीच नसतं, फक्त आपण ते ठरवायला हवं. कोणत्याही अवघड कामाची जबाबदारी घेण्याचा किती सोपा मंत्र अयाननं दिला आहे.. हो ना?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact