
परवा मी शाळेतून घरी आले तेव्हा माझी फार फार चिडचिड झाली होती. संपूर्ण दिवसात काहीच माझ्या मनासारखं झालेलं नव्हतं. सकाळी उठायला उशीर झाला. त्यामुळे गृहपाठ पूर्ण झाला नाही. नेमकी ज्या विषयाची वही अपूर्ण होती त्याच विषयाच्या सरांनी गृहपाठ तपासला. मग मला शिक्षा झाली. वर्गातली एक आगाऊ मुलगी आहे ती एरवी कधीच गृहपाठ पूर्ण करत नाही, पण नेमका त्या दिवशी तिने गृहपाठ पूर्ण केलेला होता, त्यामुळे मला शिक्षा झाल्यावर ती मला हसली. मधल्या सुट्टीत लक्षात आलं की डबा दप्तरात थोडासा उघडला होता. त्यामुळे वह्यांवर भाजीच्या तेलाचे पिवळट तेलकट डाग पडले होते. तेव्हा वाटलं की शेवटचे दोन तास खेळाचे आहेत ते तरी चांगले जातील तर त्यात मैत्रिणीशी भांडण झालं.
एवढं सगळं झाल्यावर घरी येतांना मला रडूच यायला लागलं होतं. सगळ्या गोष्टींचा राग यायला लागला होता. सगळ्या लोकांशी भांडावं असं वाटत होतं. मी मनात म्हंटलं, की “आता घरी आईबाबांनी गेल्या गेल्या प्रश्न विचारायला नकोत प्लीज.” आणि काय झाली माहितीये? घरी गेल्यावर मी बूट काढले, दप्तर ठेवलं आणि हातपाय धुवून खायला बसले तर आईने विचारलंच, “का गं चेहेरा उतरलाय? बरं वाटत नाहीये का?”
मी मनात म्हंटलं, “झालं सुरु हिचं!” पण तिला म्हंटलं, “असं काही नाही. बरं आहे.”
“मग शाळेत काही झालं का? कोणी रागावलं का?”
हेही वाचा!
मी लहान आहे म्हणून काय झालं? मला माझी स्पेस हवी! आई-बाबांना कसं सांगू?

“नाही गं. असं काही नाहीये!” असं मी जरा चिडून म्हंटले. मला वाटलं की आता आई आपल्याला रागवणार. पण ती काहीच बोलली नाही. नुसतीच दोन मिनिटं माझ्याकडे बघत राहिली आणि मग मला म्हणाली, “तुला आत्ता सांगावंसं वाटत नसेल तर राहू दे. नंतर सांगितलंस तरी चालेल. किंवा काही गंभीर नसेल तर नाही सांगितलंस तरी चालेल. असं होतं कधी कधी. नुसती चिडचिड होते. पण कोणाशी काही बोलावंसं वाटत नाही. पण जर काही सांगावंसं वाटलं तर मला ऐकायला आवडेल.” असं म्हणून मला नुसतंच एक सेकंदभर जवळ घेतलं आणि उठून वेगळं काहीतरी काम करायला लागली.
आणि खरं सांगू? मला ना, इतकं छान वाटलं. कारण मला असंच वाटत होतं, की कोणाशी बोलायला नको. कोणाला काही सांगायला नको. आणि आईला ते बरोब्बर समजलं. मग मीपण काही न बोलता खाल्लं. थोडा वेळ खिडकीतून नुसती बाहेर बघत बसले. मग मला बरं वाटलं. मग मी आईला जाऊन म्हंटलं, “मगाशी मला खरंच काही बोलावंसं वाटत नव्हतं म्हणून मी काही बोलले नाही. पण एवढं काही झालेलं नाहीये.” मी आईला सकाळपासून काय काय झालं ते सांगितलं. आणि तिला सांगितलं, की “आजच्या दिवसातली सगळ्यात भारी गोष्ट ही, की तू मला काय झालं ते सांग म्हणून मागे लागली नाहीस.”
मला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आईने ऐकून घ्यायला पाहिजे तसंच मला बोलायचं नसतांना मला गप्प बसू दिलं पाहिजे हे सिक्रेट सगळ्यांच्या आईबाबांना समजलं तर किती भारी होईल ना?
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


