
Image: .freepik
' काय सारखं सारखं माझी स्पेस माझी स्पेस करते. एवढं मोठं घर आहे ना आपलं, घे ना तुला हवी तितकी स्पेस!'
आई ईरावर फारच चिडली होती त्या दिवशी. घरी पाहुणे आलेले होते. आणि ईरा मात्र बेडरुममध्ये दार लावून बसली होती. अगदी पाहुणे जायच्या वेळेस त्यांना बाय करण्यासाठी तेवढी ईरा बेडरुममधून बाहेर आली. ते काही आईला आवडलेलं नव्हतं. पाहुणे गेल्या गेल्या आईने बेडरुममध्ये मोर्चा वळवणाऱ्या ईराला थांबवलं आणि धारेवरच धरलं. ' तुला थोडा वेळही बाहेर येवून पाहुण्यांसमोर बसता येत नाही, त्यांच्याशी बोलता येत नाही. नववीत गेली तर शिंग फुटले की काय तुला?'
हेही वाचा!
' आई मी पुस्तक वाचत होते. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर होतं ते. मला ते पूर्ण वाचायचंच होतं. आणि तू बोलत होतीस ना पाहुण्यांशी. मी तर ओळखतही नव्हते त्यांना. आणि तू त्यांना पाणी द्यायला सांगितलं तर मी दिलं होतं ना तेव्हा!' ईराने आइने चिडून विचारलेल्या प्रश्नाला शांतपणे उत्तर दिलं. पण ईराचं म्हणणं काही आईला पटत नव्हतं.
'बेडरुममध्ये दार लावून तास न तास बसून काय करत असतेस इतकं?'
आपल्यावरचा हा अविश्वास पाहून ईराही चिडते. ' आई प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का? मी माझी स्पेस घेते!'
'म्हणजे?' न कळून आई विचारते. ' आई स्पेस म्हणजे स्पेस. आणखी काय सांगू तुला?'
"ईरा मला नीट सांग. ही काय स्पेसची भानगड आहे?'
'आई मला माझं काहीतरी करायचं असतं. समजलं का तुला? आणि नाही समजलं तर अंजू मावशीला विचार. तिनं सांगितलेलंच तुला पटतं ना, मग विचार तिला!'

Image: freepik
अंजू मावशी म्हणजे ईराच्या आईची खास मैत्रिण. कोणताही प्राब्लेम असू देत, प्रश्न असू देत, अंजू मावशीकडे त्याचं उत्तर असतंच.
'बरंच झालं अंजू मावशीचं नाव घेतलंस ते. किती दिवस झाले भेटलेच नाहीये तिला. उद्या तिला जेवायलाच बोलावते. अंजू मावशीला बोलावणार म्हटल्यावर ईराचीही कळी खुलते. अंजूमावशी मावशी कम फ्रेण्डच होती ना ईराची.
आई अंजू मावशीला फोन करते आणि तिला दुसऱ्या दिवशी जेवणाचं आमंत्रणच देते. दुसऱ्या दिवशी आई अंजू मावशीसाठी खास आमरस पुरीचा बेत करते. अंजू मावशी येते. आई आणि ईरा दोघीही खूष होतात. सगळेजण आमरस आणि पुरीवर ताव मारतात. आवरुन सावरुन आई आणि अंजू मावशी हाॅलमध्ये कुलरच्या हवेला येवून बसतात. आई ईराला हाक मारुन हाॅलमध्ये बोलावते.

Image: .freepik
' हं सांग आता अंजू मावशीला तुझ्या स्पेसचं पुराण'. इतक्या वेळ हसत खेळत मूडमध्ये असलेल्या इंदूला एकदम काय झालं, हे अंजू मावशीला कळलंच नाही. पण वातावरण एकदम बदलून गेलं. ईराही जरा सावरुनच सोफ्यावर बसली.
' काय गं ईरू काय झालं?' अंजू मावशीनं ईराला विचारलं
' काही नाही गं मावशी. मी आईला म्हटलं, मला घरात माझी स्पेस हवी आहे. मला माझ्या मनासारखं काहीतरी तर करता यायला हवं की नाही? हेच आईला सांगायला जाते तर प्रत्येक वेळेस आई मला ओरडते. तिला समजतंच नाहीये स्पेसचा अर्थ. माझी काही चूक नाही त्यात!' अंजू मावशी ऐकतच असते. ईरा काही बोलायचं थांबत नाही.
' मावशी मी बेडरुममध्ये दार लावून बसते हे खरं आहे. मला दार लावून बसलं की छान वाटतं. एकतर मी पुस्तक वाचते, नाहीतर चिर्त्रं काढते. चित्रं काढल्यावर ते आईलाही दाखवते. आणि माझी मैत्रिण वैष्णवी घरी आली की आम्ही दोघी गप्पा मारत बेडरुममध्ये बसतो. आणखी मी काय करते. का सारखं आई मला विचारत असते. तिचा माझ्यावर विश्वास नाही का?
' अंजू मवशीच्या लक्षात येतं सारं. तिला दोघींचीही अडचण समजलेली असते. मोठी होणारी मुलगी खोलीत दार लावून एकटीच तास न तास बसते याचं टेन्शन आईला येणं स्वाभाविकच आहे. पण म्हणून मुलांना हवी असणारी स्पेस द्यायचीच नाही, हे मात्र तिला योग्य वाटलं नाही. यात चुकीचं कोणीच नव्हतं. दोघींनाही विश्वासात घेवून बोलण्याची गरज होती हे अंजू मावशीला कळलं होतं.
हेही वाचा!
'अगं इंदू, का चिडतेस ईरावर? तिला खरंच तिची स्पेस द्यायला हवी. तिला छान वाटतं. काहीतरी सूचतं तिला त्या स्पेसमध्ये तर छानच आहे की. प्रत्येकालाच त्याची त्याची स्पेस हवी असते. मग त्यात लहान मोठं नसतं काही. मलाही माझ्या घरात माझी स्पेस हवी असते. त्यात लूडबूड केलेली मला नाही चालत. आता तुझंच बघ ना, तुला स्वयंपाकघरात छान वाटतं ना. स्वयंपाकघरात गेलं की मला मस्त वाटतं, असं तूच म्हणतेस ना नेहेमी. तिथे गेल्यावर तुला नवीन नवीन सूचतं, वेगळं काहीतरी करुन बघण्याची ईच्छा तुला होते. स्वयंपाकघरातूनच तुला आनंद आणि उर्जा मिळते असं तूच म्हणतेस ना. हे स्वयंपाकघर म्हणजे तुझी स्पेस आहे. तू तिथे मोकळेपणानं हवं ते करते. तशीच ईरा तिची तिची स्पेस घेते. एवढंच!'
'स्पेस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. स्पेस म्हणजे मोकळीक. स्पेस म्हणजे स्वातंत्र्य. अशी मोकळीक आणि स्वातंत्र्य घरात असलं की मुलं छान खुलतात, आनंदी राहातात. '
आईला आता स्पेस म्हणजे काय हे नीट समजलेलं असतं. पण तरी तिची एक तक्रार असतेच. ' अंजू तू म्हणतेस ते पटलं मला. पण घरात पाहुणे आले तरी बेडरुममध्ये दार बंद करुन बसणं हे जरा उध्दटपणासारखं वाटतं मला' आईची ही तक्रार अंजू मावशीला पटते आणि ईरालाही .
'ईरू तू तुझी स्पेस घे. त्यात तुला आवडेल ते कर. पण स्पेस म्हणजे स्वातंत्र्य. आणि जिथे स्वातंत्र्य असतं, तिथे जबाबदारीही असतेच. त्यामुळे आपण घेत असलेल्या स्पेसचा योग्य वापर करणं हे तुला जमायला हवं. असं झालं तर आई बाबांनाही विश्वास वाटतो आपला!' अंजू मावशीने ईराला स्पेसमध्ये असलेल्या जबाबदारीची जाणीव ईराला करुन दिली.
' अगं अंजू ईरा दार लावून बेडरुममध्ये काय करते, हे माहिती असतं मला. पण तिची सारखी माझी स्पेस, मला स्पेस हवी अशी जी भूणभूण सुरु असते ना त्याचा राग आला होता मला. पण मॅडम आता कळलं मला आणि ईरा तुला कळलं का मावशी काय म्हणाली ते?' आईने हसून ईराला प्रश्न विचारला. ' हो समजलं. स्पेस म्हणजे स्वातंत्र्य आणि जबाबदारीही!' अभ्यासातल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यावं तसं ईरानं आईला उत्तर दिलं.
आईनं लिंबाचं सरबत करुन आण म्हटल्यावर ईरा जवळ जवळ उड्या मारतच स्वयंपाकघरात गेली. इकडे अंजू मावशी आणि आई दोघींच्याही गप्पा पुन्हा सुरु झाल्या.
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact