अवकाशात हरवलेल्या एका टमाट्याचं रहस्य! हरवलेला टमाटा कोणाला सापडला?

Image: theinformant

आपण आताच काही दिवसांपूर्वी अवकाशात अंतराळवीराच्या हातून टूलकीट बॅग निसटली आणि अवकाशात हरवली हे वाचलं होतं. आठवतं ना? या टूलकीट बॅग सारखंच डाॅ. फ्रॅंक रुबियो यांचा टमाटाही अवकाशात हरवला. या गायब झालेल्या टमाट्याचं काय बरं झालं असेल? असं कोडं सगळ्यांनाच पडलं. आता तुम्हालाही हाच प्रश्न पडला ना की काय आहे हे टमाट्याचं रहस्य? खरंतर टमाट्याचं रहस्य जाणून घेण्याआधी तुम्हाला डाॅ. फ्रॅंक रुबियो आणि त्यांचं काम आणि त्यांच्या नावावरचा विक्रमही सांगायला हवा. तर डाॅ. फ्रॅंक रुबीयो हे अमेरिकेचे अंतराळवीर आहेत.  त्यांनी अवकाशात सर्वात जास्त म्हणजे ३७१ दिवस राहण्याचा (अवकाश उड्डाण करण्याचा) विक्रम केला आहे.  या आधी हा विक्रम अमेरिकन अंतराळवीर मार्क वांडे हेइ यांच्या नावावर होता. हेइ यांनी २०२२ मध्ये ३५५ दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम केला होता. पण रुबियो काही अवकाशात राहण्याचा नवीन विक्रम करण्याच्या उद्देशाने अवकाशात गेले नव्हते. खरंतर ते गेले होते सहा महिन्यांसाठी पण त्यांना अवकाशातील 'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन'वर एक वर्ष राहावं लागलं. तिथे असताना रुबियो यांनी अनेक कामं केली. टमाट्याची घटनाही याच मुक्कामात घडली.

हेही वाचा!

डाॅ. फ्रॅंक रुबियो हे ४७ वर्षांचे अमेरिकन अंतराळवीर. त्यांनी डाॅक्टर होण्यासाठीचा अभ्यास केला होता. त्याआधी ते अमेरिकेच्या लष्करात हेलिकाॅप्टर उडवायचे. सप्टेंबर२०२२ मध्ये ते अवकाशात गेले. पण डिसेंबर महिन्यात रुबियो आणि  दोन रशियन अंतराळवीर ज्या सोयूझ अवकाश यानात होते ते यान अवकाशातल्या एका दगडावर आपटले. त्यामुळे या यानाची थंड होण्याची यंत्रणा  नादुरुस्त झाली. त्यामुळे सोयूझ अवकाशयान रुबियो आणि त्यांच्या दोन रशियन अंतराळवीर साथीदारांना पृथ्वीवर परत सोडू शकत नव्हता. त्यामुळे रुबियो यांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन पृथ्वीवर परतण्यासाठी नवीन मार्ग शोधावा लागणार होता.

फेब्रुवारी २०२३ मध्ये  रिकामं सोयूझ अवकाशयान रुबियो आणि दोन रशियन अंतराळवीर यांना घेण्यासाठी अवकाशात आलं. पण या अवकाश यानाने २ अंतराळवीर पृथ्वीवरुन येणं अपेक्षित होतं. पण रुबियो यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी सोयूझ हे अवकाश यान रिकामं आलं होतं. त्यामुळे जे दोन अंतराळवीर सोयूझने येवू शकले नाही त्यांचं काम रुबियो आणि दोन रशियन अंतराळवीरांना करावं लागणार होतं. त्यामुळे डाॅ. रुबियो नियोजित वेळेप्रमाणे मार्च २०२३ मध्ये पृथ्वीवर पोहोचू शकले नाही. ते सप्टेंबर २०२३ मध्ये ३७१ दिवस दिवसांनी परत पृथ्वीवर आले. वर्षभर रुबियो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर होते. तिथे त्यांनी वेगवेगळ्या देशातील २८ अंतराळवीरांसोबत वेगवेगळ्या मिशनवर काम केलं.

 Image : wusf.org

रुबियो यांचा टमाटा हरवण्याची गोष्ट!

Image: telegraph

अवकाशात गुरुत्वाकर्षण आगदीच कमी असतं. अशा परिस्थितीत इतका दीर्घ काळ अवकाशात राहणं हे आव्हानात्मकच होतं. पण डाॅ. रुबियो हे स्वत:ला फीट ठेवण्यासाठी रोज एक तास व्यायाम करायचे. आपले स्नायू आणि हाडं बळकट करण्यासाठी विशिष्ट मशीनचा वापर करायचे. या काळात रुबियो यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहून भरपूर प्रयोग केले. त्यातलाच एक महत्त्वाचा प्रयोग हा टमाट्याशी निगडित होता.

डाॅ. रुबियो यांनी अवकाशात टमाटे उगवण्याचा प्रयोग केला होता. अवकाशात एकही वनस्पती उगवत नाही की तग धरु शकत नाही. असं असताना केवळ हवा आणि पाणी यावर मातीशिवाय त्यांनी टमाटे उगवले. त्यांच्या या प्रयोगाचं ध्येयचं मुळी अवकाशात भाज्या-फळं कोणत्या उगवतात, कशा उगवतात यांचा अभ्यास करणे हे होतं. हा प्रयोग यशस्वी करुन त्यांना अवकाशात दीर्घकाळासाठी येणाऱ्या अंतराळवीरांच्या खाण्यासाठीचा पर्याय शोधायचा होता.

डाॅ. रुबियो यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यांनी अवकाशात लावलेल्या टमाट्याचं रोप मोठं झालं. त्याला पुढे टमाटे धरले. नंतर टमाटे आले देखील. रुबियो यांनी अवकाशात उगवलेल्या टमाट्याचा नमुना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील सर्व अंतराळवीरांना दिला. आणि त्यांच्याकडीन टमाटा त्यांनी एका वेल्क्रो पिशवीत ठेवला. हा टमाटा त्यांना व्हिडीओ काॅल करणाऱ्या विद्यार्थ्यांना दाखवायचा होता. रुबियो यांना वाटलं की आपण ही पिशवी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला व्यवस्थित जोडून ठेवली आहे. पण तसं नव्हतं. थोड्या वेळाने येवून पाहातो तो काय स्पेस स्टेशनला अटकवलेला टमाटा पिशवीसह गायब झाला होता. त्यांनी आपल्या या टमाट्याचा खूप तास शोध घेतला. पण त्यांना काही अवकाशात तरंगत गेलेला टमाटा सापडला नाही. हा टमाटा कुठे गेला असेल हा प्रश्न त्यांना ते जेव्हा पृथ्वीवर परतले तेव्हाही पडतच होता.

हेही वाचा!

टमाटा अवकाशात गायब झाल्यानंतर  इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील सर्व अंतराळवीर त्यांना चिडवू लागले. हा टमाटा रुबियोनेच खाल्ला असं म्हणू लागले. आणि रुबियो मात्र,'  टमाटा मी खाल्ला नाही, तो खरंच अवकाशात तरंगत गायब झाला' असं सतत सांगत राहायचे पण अंतराळवीर काही मजा करण्याचे थांबत नव्हते. ते जेव्हा सप्टेंबर २०२३ मध्ये पृथ्वीवर आले त्यानंतर काही महिन्यांनी अवकाशात हरवलेल्या टमाट्याचं रहस्य सुटलं. नासाच्या अंतराळवीर जास्मिन मोघबेली यांनी तो टमाटा आम्हाला सापडला आहे असं डाॅ. रुबियो यांना खास व्हिडीओ कॉल  करुन सांगितलं. पण हा टमाटा नासाच्या कोणत्या क्रू मेंबर्सला सापडला, तो सापडला तेव्हा कसा दिसत होता? याबद्दलची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.

अवकाशात १० महिन्यांपासून हरवलेल्या टमाट्याचं एवढं तरी  कोडं  सुटलं. आता हा टमाटा कोणाला, कुठे सापडला, सापडला तेव्हा टमाटा कसा होता? हे प्रश्न डाॅ. रुबियो प्रमाणेच इतरांनाही पडलेले आहेतच. आता या प्रश्नांची उत्तरं कधी बरं मिळतील?

Image: telegraph

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact