आई बाबा पाहतात ती ‘एमिली इन पॅरिस’ मलाही पाहायचीये.. पण आई बाबा नाही का म्हणतात?

माझे आईबाबा आत्ता ‘एमिली इन पॅरिस'चा नवा सीझन पाहातायत. मला पण बघायचीय ती सिरीज; पण आईबाबा परवानगीच देत नाहीत. म्हणून ते घरी नसताना मी 'त्यांच्या' सिरीज पाहतो. हे चूक आहे की बरोबर?
- अमूल्य, ठाणे

एखादा सिनेमा, वेब सिरीज ही किती वर्षे वयाच्या प्रेक्षकांसाठी तयार केलेली आहे, त्याचा उल्लेख सुरुवातीला केल्यानंतरच ती प्रसिद्ध करायची परवानगी मिळते, हे तुला माहितीये का? म्हणूनच मुलांसाठीचा कंटेंट आणि मोठ्यांसाठीचा कंटेंट, अशी विभागणी असते. आईबाबा जे बघतात, ते तुझ्या वयाच्या मुलांनी बघणं अपेक्षित नाही; कारण मोठ्यांना कळू शकतात, ते विषय लहान मुलांना समजून घेता येणं, अवघड असतं. तू दुसरीत होतास तेव्हा तुला आठवीचं पुस्तक वाचायला देऊन त्यावर तुझी परीक्षा घेतली असती, तर चाललं असतं का - हे तसंच आहे! एखादी वेब सिरीज बघायला आईबाबा परवानगी देत नसतील तर ते घरी नसताना त्यांच्या नकळत ती पाहणं हे चूक आहे, ते म्हणूनच!

हेही वाचा!

माझ्यापेक्षा लहान भावाचेच लाड होतात..आईबाबा माझ्याशी असं का वागतात ?

अनेक वेब सीरिजमधली दृश्यं, भाषा, त्यातील हिंसा अशा अनेक गोष्टी तुझ्या वयाच्या मुलांना नीट समजून घेता येऊ शकत नाहीत आणि तरीही हट्ट करून, कधी चोरून तुम्ही त्या पाहत तेव्हा त्यातल्या न कळलेल्या, अर्धवट समजलेल्या अनेक गोष्टींमुळे मनात गोंधळ उडतो. शिवाय हे सगळं लपूनछपून केलेलं असल्यामुळे तुम्हा मुलांना त्याबद्दल कुणाशी बोलताही येत नाही, बरोबर?
- तुला पाहता येतील, तुझं कुतूहल वाढेल, मनोरंजन होईल आणि तुला भरपूर माहिती मिळेल, असा भरपूर कंटेंट टीव्ही आणि ओटीटीवर आहे. तो बघितलास तर तुला उपयोग होईल, वेब सिरीजचा तुला उपयोग होईलच असं नाही. आईबाबा ज्या गोष्टी पाहू नको म्हणतात, त्या गोष्टी त्यांच्या नकळत पाहणं म्हणजे त्यांनी तुझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तू न जागणं आहे. हे बरोबर नाही, हे तुलाही कुठेतरी मनातून वाटतं आहे, म्हणूनच तू हा प्रश्न विचारलायस... हो ना? - मग नको करूस तसं!

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही पण मनातून खूप भीती वाटतेय असं काहीतरी मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणींना सांगायला कसंतरीच वाटतं ; असं जे जे सिक्रेट तुमच्या मनात दडवलेलं असेल ते सगळं 'ऊर्जा'च्या कानात सांगा. तुम्ही काहीही, कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सिक्रेट ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया.

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact