व्हेरोनिका नावाची एक स्मार्ट गाय: खाज आल्यावर झाडू वापरते!

Image: dw.com

प्राणी आणि माणूस यांच्यात हुशार कोण? असा प्रश्न विचारला तर कोणीही त्याचं उत्तर माणूसच देईल. माणूस बुद्धीचा वापर करतो, विचार करतो, त्याच्यासमोर काही संकटं, आव्हानं उभी राहिलीत की तो युक्त्या वापरतो. त्याच्याकडे असलेल्या साधनांचा वापर करतो. तसं काही प्राण्यांना करता येत नाही. हे जरी खरं असलं तरी प्राणीही साधनांचा वापर करु शकतात हे आता स्वत: शास्त्रज्ञ देखील सांगतात. जगभरात एका गायीची चर्चा सुरु आहे ती याचकारणाने. व्हेरोनिका ही ती गाय. ही गाय ऑस्ट्रिया या युरोपातल्या देशातली. व्हेरोनिका ही 'टूल्स 'वापरणारी 'स्मार्ट' गाय असल्याचं शास्त्रज्ञांनी सिध्द केलं आहे.

 

हेही वाचा!

आपण झोपलो तरी कान कसे झोपत नाहीत? कानांना झोपेतही ऐकू कसं येतं?

 

व्हेरोनिका गाय स्मार्ट कशी?

  • व्हेरोनिका ही एक पाळीव गाय आहे. तिचा उपयोग दुधासाठी वगैरे केला जात नाही. ती घरासमोरच्या मोकळ्या जागेत राहाते. या गायीला घोडमाशांनी बेजार केलं. त्या सारख्या तिला चावायच्या. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी घोडमाशांनी चावल्याने खाज यायची. गेल्या काही वर्षांपासून व्हेरोनिकाची एक बाब विशेष लक्षणीय ठरली. व्हेरोनिका खाजवण्यासाठी एका काठीचा वापर करु लागली. जिभेच्या सहाय्याने ती काठी उचलते. ती काठी ती तोंडात दातात धरते आणि काठीचा वापर खाज आली की खाजवण्यासाठी करते. तिला हे कोणी शिकवलेले नाही. हा उपाय तिचा तिनेच शोधून काढला. तिच्या मालकांनी कौतुकाने तिचा हा काठीने अंग खाजवण्याचा व्हिडीओ शेअर केला. तो पाहून डाॅ. ॲलीस ऑर्सपर्ग यांना कौतुक आणि कुतुहल वाटलं. त्यांनी व्हेरोनिकाचा अभ्यास करायचं ठरवलं. डाॅ. ॲलिस आणि त्यांच्या टीमने तसा अभ्यास केला.
  • प्राण्यांनी साधनांचा वापर करणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. शास्त्रज्ञ म्हणतात चिंपाझी, हत्ती आणि कावळे हे प्राणी पक्षी साधनं वापरतात हे आजपर्यंतच्या अभ्यासात दिसून आलं आहे. पण गाय हा प्राणी असा साधनांचा वापर करतो हे दिसलेलं नव्हतं.
  • व्हेरोनिका ही कशाप्रकारे साधनांचा वापर करते हे प्रत्यक्ष प्रयोगातून समजून घेण्याचा प्रयत्न डाॅ. ॲलीस आणि त्यांच्या टीमने केला. त्यांनी व्हेरोनिकासमोर एक झाडू ठेवला. खाज आल्यास झाडूने खाजवते का हे डाॅ. ॲलीस आणि त्यांच्या टीमला बघायचं होतं. त्या झाडूच्या एका टोकाला कडक केस होते.
    बरेच दिवस शास्त्रज्ञ व्हेरोनिकाचे निरिक्षण करत होते. त्यांना दिसलं की व्हेरोनिका जिभेच्या सहाय्याने झाडू उचलायची. नंतर झाडूचा दांडा दातात पकडायची. आणि खाज आलेल्या ठिकाणी खाजवायची. अनेकदा व्हेरोनिका झाडूच्या टोकदार केस असलेल्या भागाचा वापर खाजवण्यासाठी करायची. विशेषत: पाठीची जाड त्वचा ती झाडूच्या या टोकाने खाजवायची. पण पोटाचा खालचा भाग खाजवण्यासाठी मात्र व्हेरोनिका झाडूच्या दुसऱ्या टोकाचा वापर करायची.

Image: livescience

 

  • आधी शास्त्रज्ञांना वाटलं की व्हेरोनिका हे चुकून करते आहे. पण नंतर त्यांना लक्षात आलं की व्हेरोनिका हे समजून उमजून करते आहे. अंगावर कुठे खाज आहे हे बघून ती झाडूचा कोणता भाग खाजवण्यासाठी वापरायचा हे ठरवून त्याचा वापर करते. झाडूचा टोकदार केसांचा भाग पोटाखालच्या नाजूक भागासाठी खडबडीत आहे हे तिला याचा वापर करुन समजले. त्यामुळे झाडूच्या टोकदार भागाने ती पोटाखालचा भाग खाजवत नाही. तिथे ती झाडूच्या दांड्याचा वापर करते .
  • एकाच गोष्टीचा वापर एकापेक्षा जास्त हेतुंसाठी व्हेरोनिका करत असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं. हे कौशल्य आतापर्यंत चिंपाझीमधेच पाहायला मिळालं होतं. व्हेरोनिकाच्या निमित्ताने हे कौशल्य गायीमधेही पाहायला मिळालं. शास्त्रज्ञ म्हणतात की व्हेरोनिका ही काही गायींमधली 'आइनस्टाइ' वगैरे नाही. शास्त्रज्ञ म्हणतात गायींमध्ये असा 'स्मार्टनेस' असतो पण बहुतांश गायींना तो वापरायला मिळत नाही. उत्पादनासाठी म्हणून मालकाने व्हेरोनिकाला पाळलेलं नाही. त्यांनी एका पाळीव प्राण्याप्रमाणे व्हेरोनिकाला पाळलं आहे आणि त्याच पध्दतीने तिची काळजी घेतली जात असल्याने व्हेरोनिकाला तिच्यातला स्मार्टनेस वापरण्याची संधी मिळाली. आणि म्हणूनच आपल्यासमोरील अडचणी सोडवण्यासाठी साधनांचा वापर करण्याचं कौशल्य तिला शिकता आलं असा निष्कर्ष डाॅ. ॲलीस आणि त्यांच्या टीमने काढला.
    आज जगभर व्हेरोनिकाची चर्चा झाडूचा वापर करणारी गाय म्हणून होत आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact.