आपण झोपलो तरी कान कसे झोपत नाहीत? कानांना झोपेतही ऐकू कसं येतं?

Image: freepik

१. झोपताना आपले डोळे मिटतात. आपलं शरीर आराम करतं पण कान मात्र पहारेकऱ्यासारखे सगळं ऐकत असतात. आपण गाढ झोपतो. एखाद्या आवाजाने आपल्याला जाग येते .. हे असं का होतं? त्याला कारण म्हणजे आपला मेंदू. आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू 'साउंड फिल्टर’ सारखं काम करतो. कुठल्या आवाजाकडे लक्ष द्यायचं, कुठल्या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं हे मेंदू ठरवतो. हळू आवाज, ओळखीचा आवाज यांच्याकडे मेंदू दुर्लक्ष करतो. नेहमीपेक्षा वेगळा, भयंकर आवाज आला तर मात्र मेंदू आपल्याला उठवतो.

२. आपण झोपेत असलो तरी आईने आपल्याला मारलेली हाक, वाजलेला गजर कानांना ऐकू येतो. मेंदू त्याला प्रतिसाद देतो. अशा आवाजांना आपण प्रतिसाद देतो पण आपण पूर्ण जागे होत नाही. आपले डोळेही मिटलेलेच राहतात. आपल्याला पूर्ण जाग येऊ नये ही काळजीही आपला मेंदूच घेतो. आपल्या नावाने आलेली हाक असेल तर मेंदू आपल्याला उठवतो, पण त्या हाकेत आपलं नाव नसेल तर मात्र आपल्याला ती ऐकू गेली नाही तरी चालेल एवढी खबरदारी मेंदू घेतो.

हेही वाचा!

चित्रं काढताना, हाताने वस्तू बनवताना मेंदूत काय घडतं?

३. अनेकजण झोपेत घोरतात. स्वत:च्या घोरण्याच्या आवाजाकडे मेंदू 'आपलाच आवाज आहे' म्हणून सरळ दुर्लक्ष करतो. इतरांना मात्र त्या आवाजाचा त्रास होतो आणि जाग येते.

४. लहान मुलांच्या मेंदूचे साउंड फिल्टर पुरेसे विकसित झालेले नसतात. त्यामुळे अगदी किरकोळ आवाजानेही त्यांना जाग येते. मोठं होतात तशी मात्र त्यांची झोप सुधारते म्हणजे, मेंदू अनावश्यक आवाजांनी त्यांना उठवून घालत नाही. थोडक्यात, आपले कान म्हणजे शरीराचे पहारेकरी आहेत. आपण झोपलो तरी ते कायम जागे राहातात आणि एक प्रकारे आपली काळजीच घेतात.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact.