
मग मित्रांनो विटी दांडू, लगोरी हे खेळ खेळून मज्जा आली असेल ना. आणि मोबाईल टीव्ही यांच्यापेक्षाही आपल्या पारंपारिक खेळांमध्ये किती धम्माल आहे हे कळलच असेल. तर चला आज मी तुम्हाला आम्ही खेळत असलेल्या आणखी एका धम्माल खेळाबद्दल सांगतो. आणि त्या धम्माल खेळाच नाव आहे “डब्बा ऐसपैस”.
डब्बा ऐसपैस हा सुद्धा महाराष्ट्रात खेळला जाणारा एक जुना खेळ आहे. साधारणता लपाछपी, किवा लपंडाव सारखा हा खेळ असतो. या खेळाला डब्बा ऐसपैस, डब्बा एक्स्प्रेस, डबा डबा डम डम अश्या अनेक नावानी ओळखल जात.
डब्बा ऐसपैस या नावावरून आपल्याला थोडी कल्पना आलीच असेल ती म्हणजे या खेळासाठी लागणारी सामग्री म्हणजे निरुपयोगी डब्बा किवा नारळाची करवंटी.
आम्ही ६-७ मुले मुली जमलो कि आमच्या दाराच्या अंगणात हा खेळ खेळायचो.
हेही वाचा!
मुलांच्या रिंगणात मामाचं पत्र हरवतं आणि ते सापडतंही. ते कसं?
डब्बा ऐसपैस कसे खेळणार?

पहिल्यांदा आम्ही राज्य कुणावर हे ठरवायचो आणि मग अंगणात मध्यभागी एक छोटा गोल आखायचो. मग कुणी तरी एकाने तो डब्बा दूरवर फेकायचा आणि ज्याच्यावर राज्य आहे तो डब्बा आण्यासाठी जाईल. तो डब्बा घेवून येईपर्यंत आम्ही बाकी सर्व जण आसपास लपून बसायचं. ज्याच्यावर राज्य आहे तो डब्बा घेवून त्या गोलमध्ये किवा रिंगणात ठेवून बाकी सर्वांना शोधण्याचा प्रयत्न करायचा. जर कुणी दिसले तर त्याचा नाव घेवून डब्बा रिंगणात आपटायचा आणि म्हणायचं डब्बा ऐसपैस. ज्याच नाव घेवून डब्बा ऐसपैस म्हटल जाईल तो खेळाडू बाद.
जर इतर खेळाडू शोधत असताना कुणीतरी येवून त्या डब्याला लाथेने उडवलं तर पुन्हा डब्बा फेकला जायचा आणि राज्य असणारा खेळाडू परत डब्बा आणून इतरांना शोधायचा.
त्याचप्रमाणे जर राज्य असणारा खेळाडू इतर सर्व खेळाडूंना शोधण्यात यशस्वी झाला तर जो पहिला सापडला त्यावर राज्य यायचं. हा खेळ खूप सोपा साधा असला तरी खूप मज्जा येते कारण कित्तेक वेळा खूप उशिरापर्यंत एकाच खेळाडूवर राज्य असायचं.
यात गुण मोजायची सोपी पद्धत म्हणजे ज्याच्यावर राज्य आहे तो किती वेळात सर्व खेळाडूंना शोधतो त्यावर ठरत कि या खेळात विजेता कोण.
तसेच जर इतर खेळाडूंपैकी कोणीही डब्बा जर लाथेने उडवण्यात यशस्वी झाले तर बाकीचे सर्व खेळाडू विजयी.
मग सवंगड्यांनो हा साधा सोपा पण धम्माल खेळ नक्की खेळून पहा आणि हो पण परत भेटूच आणखी एक मस्तपैकी पारंपारिक खेळाची माहिती घेवून.
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


