मुलांच्या रिंगणात मामाचं पत्र हरवतं आणि ते सापडतंही. ते कसं?

images : google

-अभिजित निंबाळकर

मित्रमैत्रिणींनो, डब्बा ऐसपैस हा खेळ तुम्ही खेळून पहिला असेल. त्यात मजा आली ना? पण तो घराबाहेर खेळायचा खेळ होता. आणि आत्ताच्या उन्हात घरातली मोठी माणसं सारखी "उन्हात जाऊ नका" म्हणून रागवतात. त्यामुळे आज एका बैठ्या आणि गमतीशीर खेळाबद्दल माहिती घेवूया आणि तो खेळ आम्ही कसा खेळायचो हे ही समजून घेवूया.

तर आपल्या आजच्या खेळच नाव आहे “आईच पत्र हरवलं” काही ठिकाणी याच खेळला “मामाच पत्र हरवलं” असंही म्हणतात बर का. आजच्या मोबाईल च्या काळात पत्र नावाची वस्तू हरवली आहे पण आम्ही हा खेळ खेळत असताना पत्र या शब्दाचीच खूप गम्मत वाटायची. आईच पत्र हरवलं हा खेळ महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये आणि शाळेमध्ये खेळला जायचा.
आणि बर का मित्रांनो हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही महागड्या सामग्री ची गरज नसते बर का, फक्त एक रुमाल हि एकच गोष्ट पुरेशी असते.

हेही वाचा!

विष देवून थांबवायचं अमृत देवून पळवायचं! हा खेळ कोणता?

आईच पत्र हरवलं कसे खेळणार ?
आम्ही १० – १२ मित्र मैत्रिणी जमलो कि हा खेळ आमच्या अंगणात खेळायचो. पहिला आम्ही सगळे जण गोल रिंगण करून बसायचो. कोणत्याही एका खेळाडूवर राज्य ठरवलं जायचं. मग ज्या खेळाडूवर राज्य तो रिंगण करून बसलेल्या सर्व खेळाडूंच्या पाठीमागून रुमाल घेवून फिरेल. फिरता फिरता तो म्हणेल, "आईचं पत्र हरवलं".  तो आईचं पत्र हरवलं म्हणताच रिंगण करून बसलेले सर्व खेळाडू एका सुरात म्हणयचे, "ते मला सापडलं."
“आईच पत्र हरवलं, ते मला सापडलं” अस एका सुरात चालू ठेवायचं.

मग काही वेळाने ज्या खेळाडूवर राज्य आहे तो रुमाल कोणत्याही खेळाडूच्या पाठीमागे हळूच, कोणालाही न कळता टाकायचा आणि फिरत राहायचा. ज्या खेळाडूच्या पाठीमागे रुमाल ठेवला त्याला समजताच तो आपल्या जागेवरून पटकन उठून राज्य असणाऱ्या खेळाडूला पकडायला धावेल (हि पकडापकडी रिंगणा भोवती असेल बर का). जर राज्य असणारा खेळाडू दुसरा खेळाडू उठलेल्या जागी बसला तर तो विजयी आणि राज्य मग दुसर्‍या खेळाडूवर. आणि जर जागेवरून उठलेला खेळाडू राज्य असणाऱ्या खेळाडूला पकडण्यास यशस्वी झाला तर तो विजयी.
हे चालू असताना रिंगणामध्ये बसलेले खेळाडू प्रोत्साहित करून मज्जा घ्यायचे.
या खेळामध्ये परत ज्याच्यावर राज्य आहे तो रुमाल घेवून फिरत म्हणेल "आईच पत्र हरवलं" आणि बाकी सगळे म्हणतील "ते मला सापडलं" हे अस चालूच राहत.
गुण कसे मोजायचे?
या खेळामध्ये गुण मोजण्यापेक्षा खेळाची मज्जा घेण खूप महत्वाच आहे. तरीही ज्या खेळाडूवर राज्य आहे तो एखाद्या खेळाडूला रिंगणा भोवती किती पळवतो यावर त्याचे गुण ठरतात. तसेच ज्या खेळाडूच्या मागे रुमाल ठेवला असेल तो राज्य असणार्‍या खेळाडूला किती पटकन पकडतो यावर त्याचे गुण ठरतात.
मित्रांनो जरा आपापल्या हातामध्ये असणारे मोबाईल बाजूला ठेवून हा खेळ खेळून पहा. मला खात्री आहे तुम्हाला याही खेळामध्ये नक्कीच मज्जा येईल.
चला तर मग हा खेळ खेळूया आणि मी पुन्हा भेटणारच आहे आणखी एक भन्नाट पारंपारिक खेळ घेवून.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact