
Image: .freepik
आज मी तुम्हाला तुमची आवडती गोष्ट करायला सांगणार आहे. माझी खात्री आहे की ही गोष्ट करताना तुम्हाला भरपूर मजा येईल! काय आहे ती गोष्ट ?
ती गोष्ट म्हणजे ‘नाही’ म्हणायला शिका !
हो ! मला माहीत आहे की तुम्ही ‘नाही’ म्हणतच असाल.
चिंगे, चल अभ्यासाला बस ! - नाही.
बिट्टू आता खेळ पुरे, घरात ये ! - नाही आई, अजून थोडा वेळ !
अरे ओम, एका जागी बैस आणि नीट जेव ! - नाही, मला खेळायचंय !
एक ना अनेक वेळा हा ‘नाही’ शब्द म्हणून तुम्ही तुमच्या आई बाबांना त्रास दिला असेल. या नाही म्हटल्याने तुम्हाला कितीतरी वेळा मोठ्यांची बोलणी खावी लागली असतील. हो ना?
आणि तरीही तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला नाही म्हणायला शिकवणार?
पण मी तुम्हाला नाही म्हणायला प्रोत्साहित करणार नाही. तर मी सांगतोय ती नाही म्हणायची ताकद अजमावयाला !
हेही वाचा!
आपण अनेकदा चांगल्या गोष्टींना नाही म्हणून आपलं नुकसान करुन घेतो आणि वाईट गोष्टींना इच्छा असूनही नाही म्हणू शकत नाही. वाईट गोष्टींना, चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्यासाठी ताकद लागते. ती ताकद आपल्यात आली की आपण अनेक चांगल्या गोष्टी सहज करु शकतो. वाईट गोष्टींना नाही म्हणणं ही खूप पाॅवरफुल गोष्ट आहे.
कशाला नाही म्हणाल?
बाजारात सामान आणायला गेल्यावर आपली कापडी पिशवी घेऊनच निघा. दुकानदार देत असलेली प्लॅस्टिकची पिशवी घेण्यासाठी ‘नाही’ म्हणा. कुणाच्या वाढदिवसाला गेल्यावर गोळ्या चॉकलेटस वाटले तर त्यांची वेष्टणं वाटेल तिकडे टाकायला ‘नाही’ म्हणा. ती नेटकेपणे कऱ्याच्या कुंडीत टाका. तुमच्याकडे भरपूर कपडे असतात, वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपड्यांची काही गरज नसते. तर अशा अनावश्यक खरेदीला आई बाबांना नाही म्हणा. त्याऐवजी पुस्तकं घ्या किंवा इतर गरजेच्या गोष्टी घ्या.
मनाला शिस्त लागण्यासाठी नाही म्हणणं एक उत्तम उपाय आहे हं ! पण नाही म्हणणं म्हणजे उलट बोलणं किंवा आगाऊपणा करणं नाही. नाही म्हणण्याने आपण स्वयंपूर्ण व्हायची सुरुवात करतो . मी माझे कपडे इतर कुणालाही धुवायला देणार नाही. स्वत: स्वत:चे कपडे स्वच्छ धुवायला शिकीन.
या नाही म्हणण्याने जगात अनेक चमत्कार केले आहेत. आम्ही वर्णभेद सहन करणार नाही असं म्हणत नेल्सन मंडेलांनी समतेचे धडे दिले. मी पारतंत्र्यात राहणार नाही असं म्हणत कितीतरी जणं भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उतरले. मी माझ्या प्रदेशातील निसर्गाचा ऱ्हास होऊ देणार नाही असं म्हणत भँवरीदेवीने चिपको आंदोलनात हिरीरीने काम केलं.
‘नाही’ म्हणणं म्हणजे स्वयंशिस्त अंगी बाणवणं. आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी स्वत:ला सक्षम करणं आणि आपल्या विकासाला सहजपणे हातभार लावणं. तर मग ‘नाही’ म्हणायला सुरुवात करा आणि नाही म्हणण्याची ताकद काय आहे, ते अनुभवा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact