
Image: savethechildren
मालवी. पूर्व आफ्रिकेतील देश. झोम्बा हेया देशातलं एक शहर. या शहराजवळच्या एका गावात इस्थर नावाची १७ वर्षांची मुलगी राहाते. इस्थर हवामान बदलाचा जो परिणाम आपल्याला गावाला सहन करावा लागतोय , त्या परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करतेय. आपण हवामान बदलाबद्दल रोज काहीना काही ऐकतो, वाचतो. पण इस्थर हवामान बदलाचा परिणाम नुसता ऐकला, वाचला नाही तर प्रत्यक्ष अनुभवला आहे. हवामान बदलाचे गावावर, गावातल्या शेतीवर, गावातल्या लोकांवर होणारा परिणाम ती रोज पाहते आहे. हवामान बदलाच्या परिणामामुळेच तिचं घर बुडालं, आई वडील कसत असलेली शेती वाहून गेली. टोकाच्या हवामान बदलाचा परिणाम म्हणून गावातल्या लोकांना डायरिया, काॅलरा या आजारांनी ग्रासले. हे सर्व हवामान बदालाचे परिणाम आहेत, हे तिला शाळेत शिकताना समजलं. हे असंच सुरु राहिलं तर आपल्या गावात कोणीच उरणार नाही. ना कुणाचं घर उरेल ना कोणाची शेती राहील. आपण काहीतरी करायला हवं असं तिला वाटू लागलं.
हेही वाचा!
२०१५ मध्ये इस्थरच्या गावात खूप मोठा पूर आला. या पुराने अख्खं गाव उध्वस्त झालं. जंगल नष्ट होत चालल्याने गावात असे पूर येत होते. जंगल हळू हळू कमी होत जाणं ही वाईट गोष्ट आहे. यामुळे जंगलातील प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात. झाडांमुळे जमिनीवरील माती धरुन ठेवली जाते. पण झाडंच तोडली तर माती कोण धरुन ठेवणार? पुरामागचं नेमकं कारण
इस्थरला समजलं होतं. पूर, दुष्काळ, आजारपण, मृत्यू हे द्रृष्टचक्र थांबवायचं असेल तर आता आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील , हे ओळखून इस्टरनं झाडं लावायला सुरुवात केली. आधी ती स्वत: झाडं लावू लागली. मग तिने गावातल्या लोकांना झाडं लावण्यासाठी प्रेरणा दिली. इस्थरचं ऐकून गावातली लोकंही जास्तीत जास्त झाडं लावू लागली आहेत.
पावसाळ्यात पूर तर पावसाळ्यानंतर काही महिन्यांनी पाण्याविना पिकं सुकणं हे नेहमीचंच. हे असं होतं कारण गावात पावसाचं पाणी अडवणारं, जिरवणारं अशी व्यवस्थाच नव्हती. गावात जलसंधारणाची कामंच झाली नव्हती. काय केलं म्हणजे पावसाचं पाणी अडेल, जिरेल याचा इस्थरने अभ्यास केला. हे सर्व तिने गावातल्या लोकांना समजावून सांगितलं. इस्थर म्हणते जेवढी जास्त झाडं लावू, तेवढं जगंल वाढेल. जंगल वाढलं की पाऊस चांगला पडेल. आणि पाऊस चांगला पडला की गावातली रोगट हवा स्वच्छ होईल. झाडांमुळे गावात मोठे पूर येणार नाही. आपलं गाव सुरक्षित होईल.
हेही वाचा!

Image: savethechildren
इस्थर म्हणते..
मी जर देशाची राष्ट्रप्रमुख असते तर देशभरातल्या लोकांना जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं असतं. हवा अशुध्द करणारा धूर कमी करण्याला प्रोत्साहन दिलं असतं. पण मी राष्ट्रप्रमुख नाही. सामान्य नागरिक आहे. त्यामुळे मी माझं काम करत राहीन. मी झाडं लावत राहिन.
इस्थरला हे माहीत आहे की केवळ आपल्या एका गावाने हे केलं तर हवामान बदलाचे परिणाम नष्ट होणार नाही. पण तिला हे माहीत आहे की काहीही झालं तरी आपण झाडं लावण्याचं, गावात पावसाचं पाणी अडवण्याचं काम करत राहायला हवं. यातून आज ना उद्या काहीतरी चांगलं घडेल. लहान वयात किती मोठी समज आहे ना इस्थरला?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact