
Image: lifebeyondnumbers
बिया किती छोट्या असतात ना. पण ४ मिलीमीटर आकाराच्या छोट्याशी बीमध्ये ४०० फूट उंच झाड उगवण्याची क्षमता असते. जे बियांच्या बाबतीत तेच मुलांच्या बाबतीत. कोण म्हणतं, मुलं बदल घडवून आणू शकत नाही? मुलांच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांनाच सडेतोड प्रश्न विचारणारी ही मुलगी आहे तामिळनाडूमधील. तिचं नाव प्रसिध्दी सिंह. प्रसिध्दीने अवघ्या दहा वर्षात पर्यावरणवदी, सामाजिक उद्योजक अशी स्वत:ची ओळख बनवली आहे. लहानपणापासून झाडांवर, निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रसिध्दीला आपली पृथ्वी जगण्यासाठी सुरक्षित करायची आहे.
प्रसिध्दी म्हणते मी दोन मोहिमा चालवते आहे. पहिली मोहीम म्हणजे झाडं लावून जैवविविधता वाढवणे, झाडं लावणं ही आपली संस्कृती होईल यासाठी प्रयत्न करणं, तर दुसरी मोहीम म्हणजे पृथ्वी जगण्यासाठी सुरक्षित करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना जागरुक करणे. आपल्या या मोहिमा राबवताना प्रसिध्दीने आतापर्यंत १ लाख झाडं लावली आहे आणि पृथ्वीवरील पर्यावरण वाचवण्यासाठी ६०० कार्यशाळा घेतल्या आहेत. एक १० वर्षांची मुलगी एवढं काम कसं करु शकते?
हेही वाचा!
एवढ्या लहान वयात प्रसिध्दीने एवढं मोठं काम उभं केलं आहे, कारण तिचं निसर्गावर खूप प्रेम आहे. तिला झाडांच्या पानांची सळसळ, मधमाश्यांची भूणभूण, समुद्राच्या लाटा अतिशय आवडतात. या गोष्टी तिला आनंदीत करतात.
तामिळनाडूत वरदाह चक्रीवादळ आलं तेव्हा प्रसिध्दी फक्त चार वर्षांची होती. चक्रीवादळ येवून गेल्यानंतर पुराचं पाणी आणि मुळासकट उन्मळून पडलेली झाडं बघितली तेव्हा प्रसिद्धीला फार वाईट वाटलं. झाडांसाठी, आपल्या पृथ्वीसाठी आपण काहीतरी करायला हवं असं तिला खूप मनापासून वाटलं. त्यानंतर लगेचंच वृक्षारोपणाच्या विविध मोहिमांमध्ये ती सहभागी झाली. या काळात बियांपासून रोपट्याची निर्मिती कशी होते? रोपवाटिका म्हणजे नर्सरी कशी राखायची? बी किंवा रोप कसं लावलं तर झाडं व्यवस्थित येईल, कुंपण कसं घालायचं? झाडं छाटायची कशी? झाडांना पाणी देण्याची योग्य पध्दत हे वृक्षरोपणाशी निगडित सर्व बारकावे तिने शिकून घेतले. प्रसिध्दी सहा वर्षांची झाली तेव्हा तिने 'प्रसिध्दी फाॅरेस्ट फाउंडेशन' सुरु केलं.

Image: mad4india
झाडं लावण्याच्या आणि त्यासंदर्भात लोकांची जाणीव जागृती करण्याच्या मोहिमेतून प्रसिध्दी २० देशांमधील लोकांशी जोडली गेली. भारतात प्रसिध्दीने आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पुद्दूचेरी, महाराष्ट्र , केरळ आणि डेहराडून येथे वृक्षारोपण केले. प्रसिध्दीने झाडं लावण्यासोबतच २१ सूक्ष्म फळांची जंगलं ( मायक्रो फ्रूट फाॅरेस्ट) तयार केली. २५,००० रोपांची क्षमता असलेल्या ३ समूह रोपवाटिका (कम्युनिटी नर्सरीज) तयार केल्या. यातून बऱ्याच शेतकऱ्यांना उपजिविकेचं साधन मिळालं. प्रसिध्दीने ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा कार्यशाळा घेऊन ३६,००० लोकांना (त्यात विद्यार्थी, गावातील लोक, शेतकरी यांचा समावेश आहे) शाश्वत जगणं, हवामान बदल, पर्यावरण वाचवण्यासाठी आपण स्वत: काय करु शकतो याबाबत प्रशिक्षण दिलं आहे.
हेही वाचा!
प्रसिद्धीला केवळ एका कामात गुंतून राहायला आवडत नाही. तिला वेगवेगळ्या गोष्टी करुन पाहाव्याशा वाटतात. तिला वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवायचं आहे. तिला भविष्यात चार 'एस' वर काम करायचं आहे. साॅइल म्हणजे माती. जे आपल्या जगण्याचं मूळ आहे. माती नसेल तर आपल्याकडील साधनांना काहीच किंमत नाही. प्रसिध्दीला ही माती जपायची आहे, समजून घ्यायची आहे. दुसरा 'एस' आहे स्पिरिच्युॲलिटी. परमार्थ, अध्यात्मिकता. ती म्हणते हे सर्व आपल्यातच असतं, ते दिसून येण्यासाठी आपल्याला स्वत:ला समजून घेणं आवश्यक आहे. तिसरा 'एस' म्हणजे सस्टॅनिबिलिटी. म्हणजे शाश्वतता. पृथ्वीची शाश्वतता जपण्यासाठी आपल्या जगण्याचा, जीवनशैलीचा विचार करणं आवश्यक आहे. आपल्या सवयी काय आहे, आपण काय घालतो, काय खातो याचा विचार करणे आवश्यक आहे. आपलं जगणं पर्यावरण पूरक करण्याचा प्रयत्न प्रसिध्दी करणार आहे आणि याबाबत ती इतरांनाही जागरुक करणार आहे. चौथा 'एस' म्हणजे स्पेस अर्थात अवकाश. झाडं लावून आपली पृथ्वी तर तिला आधी सुरक्षित करायचीच आहे, सोबतच अवकाशात मंगळ ग्रहावरही झाडं लावायची आहेत.

Image: dtnext
छोट्याशा प्रसिध्दीची मोठी ताकद
प्रसिध्दी म्हणते तिला काम करण्याची प्रेरणा आणि ताकद ही निसर्गातूनच मिळते. हार कधीच मानायची नाही, हे आपण पडलेल्या झाडाकडूनच शिकलो. अख्खं झाड पडलं तरी उरलेलं खोड निराश होत नाही. काही दिवसातच त्यातून पुन्हा हिरवं झाड उभं राहाण्याची प्रक्रिया सुरु होते. मधमाशांकडून एखादं काम पुढे नेण्यासाठी आपण कसं एकमेकांना सहकार्य देत, मदत करत मिळून मिसळून काम करायला हवं ते शिकलो. असं काम मधमाशा करतात, म्हणूनच मग गोड मध तयार होतं. समुद्र भरती असू दे नाहीतर ओहोटी, तो कधीच दु:खी असत नाही. तो कायम आनंदी असतो. आनंदी जगण्याची शिकवण ही अशी आपल्याला समुद्रानेच दिली असं प्रसिध्दी म्हणते.
हेही वाचा!
प्रसिध्दी सिंह हिने केलेल्या कामाची दखल एका डाॅक्युमेंटरी फिल्मनेही घेतली आहे. 'वन फाॅर चेंज' असं या फिल्मचं नाव आहे. पृथ्वी सुरक्षित करण्यासाठी ज्या लहान वयातल्या मुलांनी पुढाकार घेतला त्यांच्या कामावर आधारित ही फिल्म आहे. यात प्रसिध्दीसोबत पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या आणखी पाच जणांचा समावेश आहे.
वृक्ष लागवड आणि त्यासंबंधी जाणीव जागृतीच्य कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिध्दीच्या कामाची दखल देशात-परदेशात घेतली गेली. त्यासाठी तिचं वेगवेगळे पुरस्कार देवून कौतुक करण्यात आलं. २०२१ मध्ये प्रसिध्दीला प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार , ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवाॅर्ड हे पुरस्कार मिळाले तर तामिळनाडू सरकारच्या 'बेटी बचाव बेटी पढाव' या मोहिमेची तसेच ग्रीन तामिळनाडू मिशनचीही प्रसिध्दी राजदूत आहे.

Image: mad4india
बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी तुम्ही वयानं खूप मोठं व्हायला हवं किंवा मोठं काम केल्याशिवाय बदल होतच नाही असं नाही. लहान वयात, एकट्यानं एक कृती सातत्यानं केली तरी मोठा बदल घडू शकतो हे प्रसिध्दीने आपल्या कामातून दाखवून दिलं आहे. छोट्या मुलांचा निर्धार किती पक्का असतो हे प्रसिध्दीच्या १ लाख वृक्ष लागवडीच्या कामाकडे बघितल्यावर सहज लक्षात येतं.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact