उन्हाळा खूप तापायला लागला की अनेकजण घराबाहेर पडताना छत्रीचा वापर करतात. पावसाळ्यात वापरली जाणारी ही छत्री उन्हाळ्यात उन्हाचा चटका टाळण्यासाठी वापरली जाते. आपल्या पृथ्वीच्या वातावरणाबाहेरही एक नैसर्गिक छत्री आहे. पृथ्वीसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या छत्रीबद्दल तुम्हाला माहितीये का? या छत्रीला ओझोनची छत्री असं म्हणतात. .. बरोबर.. ओझोनच्या छत्रीला छिद्र पडल्याची, ओझोनचा थर विरळ झाल्याची बातमी कधीतरी, कुठेतरी वाचल्याचं आता आलं का लक्षात? ही ओझोनची छत्री पृथ्वीचे सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवते. शास्त्रज्ञ म्हणतात की, जर ही ओझोनची छत्री नसती तर सूर्याचे हे हानिकारक अति नील किरणं थेट पृथ्वीवर पडले असते आणि पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माणच झाली नसती. ओझोनचा थर किंवा ही ओझोनची छत्री कशी निर्माण झाली? तिला छिद्र पडलं किंवा ओझोनचा थर विरळ झाला म्हणजे काय? हे समजून घ्यायचे असेल तर आधी ओझोन नक्की काय असतो, हे माहीत असायला हवं.
हेही वाचा!
ओझोन म्हणजे काय?
ओझोन हा नैसर्गिक वायू आहे. हा रंगहीन वायू आहे. ओझोन वायू पृथ्वीच्या वातावरणात दोन थरांमध्ये आढळतो. पहिल्या थरातील ओझोन वायू हा बॅड ओझोन म्हणून ओळखला जातो. तो पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ आढळतो. ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र झाले की, ओझोनचा एक रेणू तयार होतो. ओझोन हे प्राणघातक विष आहे. परंतु पृथ्वीवरील जीवसृष्टीचं रक्षण करण्यात ओझोन थराचं काम महत्वपूर्ण आहे. म्हणूनच ओझोनला गूड ओझोन असं संबोधलं जातं. गूड ओझोन हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर १७ ते ५० किलोमीटरपर्यंत असलेल्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये (स्थितांबर) असतो. ओझोन निर्माण होण्याची प्रक्रिया अतिशय हळू आहे. पृथ्वी बाहेरील वातावरणामध्ये उच्च ऊर्जा असलेले अती नील किरण ऑक्सिजनच्या रेणुचे विघटन करुन स्वतंत्र ऑक्सिजन अणू तयार करतात. हे ऑक्सिजन अणू ऑक्सिजन रेणूसह एकत्रित येवून ओझोन रेणू तयार करतात. असे बरेच रेणू एकत्र मिळून ओझोनचा थर तयार होतो.

Image: rapidresponsegj
ओझोनचा थर काय करतो?
आपल्या पृथ्वीवर अनेक वायुमंडळाचे थर आहेत. त्यातला एक हा ओझोनचा थर आहे. हा ओझोन थर सूर्यापासून निघालेल्या अति नील किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो. सूर्याच्या किरणांचा प्रभाव कमी करतो. त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यास मदत मिळते.
ओझोनचे दोन थर असतात. एक टोपोस्पिअर म्हणजे तपांबरात आणि दुसरा थर स्ट्रॅथोस्पिअर म्हणजे स्थितांबर किंवा समतापमंडळात असतो. टोपोस्पिअरमधील ओझोनचा थर हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० ते १६ किलोमीटर अंतरावर असतो तरा स्ट्रॅथोस्पिअरमधील ओझोनचा थर हा पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागात असून तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १७ ते ५० किलोमीटर अंतरावर असतो. पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या टोपोस्पिअर म्हणजे तपांबरातील ओझोनचा थर् हा मानवास हानिकारक तर मानवाचे अस्तित्त्व नसलेल्या स्ट्रॅथोस्पिअरमधील म्हणजे स्थितांबरातील ओझोनचा थर मानवास उपयुक्त असतो. पण मानवानेच निर्माण केलेल्या विविध रसायनांच्या परिणामामुळे टोपोस्पिअरमधील ओझोनची निर्मिती ही माणसासाठी घातक असते.
स्ट्रॅथोस्पिअरमधील ओझोनचा थर निर्माण होण्याची प्रक्रिया अतिशय हळू असते. पृथ्वीच्या वातावरणात वरच्या भागात उच्च ऊर्जा असलेले अति नील किरण ऑक्सिजनच्या रेणूंचे विघटन करुन स्वतंत्र ऑक्सिजन अणू तयार करतात. हे ऑक्सिजन अणू ऑक्सिजन रेणूसह एकत्रित येवून ओझोन रेणू तयार करतात. असे बरेच रेणू एकत्र मिळून ओझोन थर तयार होतो. हाच ओझोनचा थर पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रक्षण करतो.

Image: newscientist
ओझोनच्या थराला छिद्र का पडलं?
नैसर्गिकरित्या ओझोनचे संतुलन राखले जाते. परंतु अलीकडे काही दशकात मानवी कृतीमुळे हे संतुलन बिघडत चालले आहे, त्याचा परिणाम ओझोनच्या थरावर झाला आहे. माणसाने आपलं जीवन सुखद बनवण्यासाठी रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर , स्प्रे एअरोसाॅल्स अशा वस्तू निर्माण केल्या. अशा उत्पादनांमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे यांचा वापर केलेला असतो. मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु झाल्यानंतर वायू प्रदूषण वाढले. उद्योगांमधून सोडल्या गेलेल्या वायूंमध्ये बरीच क्लोरिनयुक्त रासायनिक संयुगे (कंम्पाउंड्स) असतात. वरच्या वातावरणातीलल अति नील किरण या वायूचे विघटन करतात. ज्यामुळे क्लोरीन रेणू तयार होतो. हे अणू ओझोनच्या रेणूचे विघटन ऑक्सिजनमध्ये करतात. क्लोरिनचा एक अणू ओझोनच्या सुमारे एक लक्ष रेणुंचे विघटन करतात. ओझोन रेणू तयार होण्यापेक्षा विघटन होण्याचा दर कित्येक पटीने जास्त असतो. म्हणूनच ओझोनचा थर हळू हळू विरळ होत आहे. यालाच ओझोनच्या थरात घट होणे असं म्हणतात.
क्लोरोफ्लोरो कार्बन, कार्बन टेट्राक्लोराइड, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्स, क्लोराफार्म ही क्लोरीनची संयुगे तर हेलाॅन्स, मिथाइल ब्रोमाइड, हायड्रो ब्रोमो फ्लोरो कार्बन ही ब्रोमीनची संयुगे ओझोनचा थर विरळ होण्यास कारणीभूत ठरतात. अंटार्क्टिकावर ओझोनच्या थराला छिद्र पडल्याचं वैज्ञानिकांना १९७९ मध्ये आढळलं. १९८७ मध्ये ओझोन छिद्राचा आकार मोठा होत असल्याचे आणि २००६ मध्ये हा आकार आणखीनच वाढला असं वैज्ञानिकांना आढळलं. ओझोनच्या छत्रीला छिद्र पडल्याने संपूर्ण जग चिंतेत पडलं आणि त्यावर उपाय शोधायला सुरुवात झाली.
काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact