माझ्या नवीन क्लास टिचर मला बिल्कूल आवडत नाहीत.. मी काय करु?

मनाचा मित्र

- रुचिरा दर्डा,
पॅरेंट विथ पर्पज.

मला माझ्या यावर्षीच्या नवीन वर्गशिक्षिका अजिबात आवडलेल्या नाहीत… त्यांनाही मी आवडत नाही असं मला वाटतं. वर्षभर मी कसा त्यांच्या वर्गात बसणार मला कळतच नाही, खूप टेन्शन आलंय, मी काय करु? त्यांना मी आवडेन म्हणून मला काही करता येईल का? - अखिल, नागपूर.

Image: magnific

हाय अखिल! तुझ्या नवीन वर्गशिक्षिकांना तू आवडत नाहीस असं तू ठरवूनच टाकलंस? त्यापेक्षा त्या कशा आहेत हे ओळखायला शिक. म्हणजे त्यांना इंप्रेस करायला जाऊ नकोस, फक्त त्या कशा आहेत ते समजून घे. शिक्षकांना शिस्त पाळणारी मुलं आवडतात. तुझ्या नवीन वर्गशिक्षिका तुम्हाला कसं वागायला सांगतात, तुम्ही काय केलं की त्यांना राग येतो, काय केलं की त्यांचा आवाज चढतो, काय केलं की त्या खुश होतात? हे सगळं शोध. त्यांना जे हवं आहे तसं तुम्ही वागला नाहीत की त्या रागावणार हे नक्की…
वर्गात उगाचच मारलेल्या गप्पा, पूर्ण न केलेला होमवर्क, कसंतरी काढलेलं अक्षर हे त्यांना आवडत नसेल तर त्या गोष्टींमध्ये सुधारणा करायच्या. प्रयत्न केला, शंका विचारल्या, प्रामाणिकपणे वागलेलं त्यांना आवडत असेल, तर ते तुमच्या वागण्यात त्यांना दिसायला हवं. त्यांना कशाचा राग येतो आणि कशामुळे बरं वाटतं हे एकदा तुला कळलं की तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.

हेही वाचा!

मला उंच व्हायचंय.. काय केलं म्हणजे माझी उंची वाढेल?

आता तुला अजून एक गोष्ट करायची आहे. आपण स्वतःमध्ये काय चांगले बदल करु शकू असा विचार कर. म्हणजे, तू जसा नाहीस तसा हो असं नाही. नव्या वर्गशिक्षिका मॅडमना इंप्रेस करण्यासाठीही नाही. पण आपण स्वतःमध्ये केलेला एखादा छोटासा बदलही आपल्याला खूप उपयोगी पडू शकतो, म्हणून कदाचित, साधं रोज त्या भेटल्यावर त्यांच्याकडे बघून ‘गुड मॉर्निंग’ म्हटलंस, त्या तुझ्याकडे बघून हसायला लागल्या तरी त्यांच्या आणि तुझ्या नात्यात बदल होईल, ट्राय तर करुन बघ.
आणि तुला एक गंमत सांगू का? सगळे लोक आपल्याला आणि आपण सगळ्यांना आवडू शकतो असं नसतं. तू मोठा झालास की तुला अशा कितीतरी नवीन लोकांना भेटायचं आहे. तू मोठा झाल्यावर हॉस्टेलला राहायला गेलास तर तिथे तुला रुममेट असेल. तुम्ही दोघे एकमेकांना आवडणारच आहात, असं नाही. ऑफीसमध्ये जाशील तेव्हा तिथे तुझ्याबरोबर काम करणारे लोक, बॉस हेही तुला आवडतील, तू त्यांना आवडशील, असंही होणार नाही.
तेव्हा या व्यक्तींना माझ्याकडून काय हवं आणि मी काय बदल केला तर आपल्याला एकत्र राहाता येईल, अभ्यास करता येईल, काम करता येईल - असा विचार करायला लागेल. त्याची सुरुवात आत्तापासून करायची का?
तू काय केलंस आणि त्याचा उपयोग झाला का, हे मला नक्की कळव.

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही पण मनातून खूप भीती वाटतेय असं काहीतरी मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणींना सांगायला कसंतरीच वाटतं ; असं जे जे सिक्रेट तुमच्या मनात दडवलेलं असेल ते सगळं 'ऊर्जा'च्या कानात सांगा. तुम्ही काहीही, कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सिक्रेट ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया.

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact