कर के देखो
- श्रुती पानसे
(मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)
ishruti2@gmail.com

नुकतीच शाळा सुरू झाली आहे. सुट्टीनंतरचं एक नवीन रुटीन सुरू झालं आहे. पण, त्या रुटीनशी ॲडजेस्ट होता-होता कंटाळा येतोच. कंटाळा हा असा आताच येतो असं नाही. शाळेचं रुटीन स्थिरावल्यावरही येतोच. रोजच काय तो अभ्यास करायचा, म्हणूनही कंटाळा येतो. शाळा, क्लास, अभ्यासाचा ताण, यामुळेही कंटाळा येतो. समोर भरपूर अभ्यास पडलेला असतो, पण काहीच करावंसं वाटत नाही. हा कंटाळा घालवण्यासाठी आपल्याला गाणं, संगीत, वाद्य आपली मदत करू शकतात. कंटाळा आला की, एक सोपी कृती करायची, गाणं गुणगुणायचं किंवा आपल्या आवडीचं गाणं किंवा संगीत ऐकायचं. गाण-संगीत ऐकल्याने आपण एका वेगळ्याच जगात जातो. छान वाटायला लागतं आणि थोड्या वेळापूर्वी आलेला कंटाळा दूर होतो.
हेही वाचा!
तुम्हाला आळशी करणाऱ्या मोबाइलशी कट्टीचा प्लॅन करायचा का?
हे करून बघा !
१. मनात येईल, जे आठवेल ते गाणं म्हणा. यामुळे तुमचा मूड लगेच बदलेल.
२. एखादं नवीन गाणं शिका. यामुळे तुमचं आकलन वाढेल.
३. फार कधी ऐकलं नसेल, तरीही शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत किंवा कोणतेही शब्द नसलेलं केवळ वाद्य संगीत ऐकून बघा. यामुळे श्रवण कौशल्य वाढतं.
४. एखादं वाद्य वाजवायला शिका. जर आपल्याला वाद्य वाजवायला येत असेल, तर ज्यावेळेस मनावर एखादा ताण आहे, कंटाळवाण्या विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा कशामुळे तरी मन अस्वस्थ झालं आहे, तेव्हा जे आपल्याला येतं ते वाद्य वाजवून बघावं.
५. तबला, गिटार, संवादिनी, असं कोणतंही वाद्य आपण शिकत असलो, ते वाजवायला लागलो, तर मेंदू आनंदी राहायला मदत होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांचं आकलन होण्यासाठीदेखील त्याची मदत होत असते आणि म्हणून वाद्य वाजवायला शिकणं, वाद्य वाजवणं हा मेंदूसाठी उत्कृष्ट व्यायाम आहे.
गाणं म्हटल्याने वाद्य वाजवल्याने मेंदूच्या डाव्या आणि उजव्या अर्धगोलातली अनेक क्षेत्र उद्दीपित होतात.
आपण जेव्हा बाळ असतो, ना तेव्हाच आपल्याला संगीतातल्या तालाची ओळख झालेली असते. बाळाला झोपवण्यासाठी आई जेव्हा थोपटते, तेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके आणि आईने थोपटणं याचा ताल बाळाच्या मनामध्ये एक बंध निर्माण करत असतो. म्हणून, हळुवार थोपटलं की बाळाला शांत झोप लागते. वास्तविक थोपटणं हा एक प्रकारचा ताल आहे. जन्माला आल्यापासून या तालाशी आपलं असं नातं जोडलेलं असतं. त्यामुळे संगीत हे कायम आपल्याला आपलंसं वाटतं.

आपण गाणं ऐकतो किंवा म्हणतो तेव्हा...
१. मनावरचा ताण कमी होतो.
२. आपलं लक्ष दुसरीकडे वेधलं जातं.
३. आपल्याला उत्साही वाटायला लागतं. अगदी एखादं दुःखी गाणं असेल, तरीसुद्धा मेंदूला ते गाणं गुणगुणून छान वाटत असतं.
४. आपल्या शाळेत प्रार्थनेने सुरुवात होते. प्रार्थनेचे शांत स्वर आपल्या मनाला शांत करतात. तर, लेझीम, ढोल, अशी वाद्य आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये खूप जास्त उत्साह निर्माण करतात. म्हणजेच, ज्या प्रकारचे संगीत असेल, त्या प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात.
५. वेगवान संगीतामुळे आपल्या मेंदूतल्या बीटा नावाच्या ध्वनी लहरी उद्दीपित होत असतात. यामुळे आपल्या शरीरात उत्साह संचारतो.
६. एखादं शांत प्रकारातलं संगीत मनाला ताणरहित करतं. अशा प्रकारच्या शांत संगीतामुळे मेंदूत अल्फा या ध्वनी लहरी उद्दीपित होतात . काही जणांना अभ्यास करताना अशा लहरींचा उपयोग होऊ शकतो.
७. एखादं गाणं आवडलं, संगीत आवडलं की, आपल्याला पुन:पुन्हा ते ऐकावसं वाटतं. यामुळे मेंदूतल्या थिटा या लहरी उद्दीपित होतात. या लहरी आवडीचं गाणं ऐकल्यामुळे मनात आनंद निर्माण करतात.
८. खूपच संथ अशा संगीतामुळे आपल्याला झोप येते, यावेळेस डेल्टा या ध्वनी लहरी उद्दीपित होत असतात. त्यामुळे कधी झोप येत नसेल, तेव्हाही शांत संगीत ऐकायला हवं.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


