आपल्या ताटातल्या पदार्थांमुळेही पृथ्वीचं तापमान वाढतं.ते कसं?

- विनय र.र.

( मराठी विज्ञान प्रसारक)

Image: freepik

तुम्ही रोज जेवणात काय खाता?भात, डाळ, भाजी, भाकरी, चिकन, मटण, मासे आणि काय काय.. तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या ताटातील नॉनव्हेज म्हणजेच मांसाहारी पदार्थ पृथ्वीला गरम करत आहे!
होय, हे खरं आहे. पृथ्वी गरम होते कारण हवेत ग्रीनहाऊस वायू जसे कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि मिथेन वायू वाढतात. हे वायू सूर्याची उष्णता अडवतात. पृथ्वीला थंड होऊ देत नाहीत.

 

 

हेही वाचा!

एक झाड कापलं तर असं काय नुकसान होतं?

अन्नामुळे तापमान कसं वाढतं?

* जगातील एकूण वातावरण तापवणाऱ्या गॅसच्या सुमारे २५-३० टक्के भाग आपण जे अन्न खातो, त्यामुळे येतो. यातले बरेच साधारणपणे १४-१८ टक्के गॅसमांस आणि दूध उत्पादनामुळे होतात
* बीफ म्हणजे गाय, बैल, म्हैस , रेडे, घोडे, उंट यांचे मांस आणि मटण म्हणजे शेळ्या मेंढ्या, बकरं, बोकड यांचे मांस हे पर्यावरण राखायला सर्वात जास्त हानिकारक ठरतात.
१ किलो बीफ तयार करताना सुमारे ६० ते १०० किलो गॅस हवेत सोडला जातो. २०० ग्रॅम बीफ खाल्ले तर १२ ते २० किलो गॅस हवेत मिसळतो!
* एवढे जास्त गॅस होतात कारण हे सगळे प्राणी रुमिनंट प्राणी आहेत. त्यांच्या पोटात जीवाणू गवत पचवतात आणि त्यातून मिथेन गॅस ढेकारातून, पादातून खूप प्रमाणात बाहेर सोडतात.मिथेन वायू कार्बन डायऑक्साइडपेक्षा २५-८० पट जास्त वातावरण तापवणारा आहे.

Image: freepik

* एक किलो मांस मिळवण्यासाठी खूप धान्य, गवत आणि मोठी जमीन लागते. अनेक ठिकाणी जंगले तोडून कुरणे केली जातात, ज्यामुळे आणखी कार्बन डायऑक्साइड सोडला जातो. १ किलो चिकनसाठी ६ ते १० किलो गॅस वातावरणात येतो. २०० ग्रॅम चिकनसाठी १.२ ते २ किलो गॅस वातावरणात मिसळतो.
* माश्यांच्या बाबत असेच आहे. १ किलो माशांसाठी सुमारे ५-१४ किलो वायू आणि २०० ग्रॅम मासे खाताना १-३ किलो गॅस वातावरणात येतो.
* १ किलो डाळ किंवा भाजीसाठी फक्त ०.५ ते २ किलो गॅस वातावरणात येतो. २०० ग्रॅम डाळ-भाजी खाल्ले तर ०.२ ते ०.५ किलो गॅस वातावरणात येतो
* डाळी थेट शेतात उगवतात. त्यांना प्राणी पचवावा लागत नाही, मिथेन येत नाही. जमीन आणि पाणीही खूप कमी लागते. डाळी जमिनीत नायट्रोजन सुधारतात, त्यामुळे खतही कमी लागते.
* जर आहारातील मांसाहार कमी झाला अन डाळ, भाजी, भाकरी जास्त खाल्लं, तर आपला वैयक्तिक गॅस ५०-७५% कमी होऊ शकतो.
जगातील लाखो लोकांनी असेच केलं तर पृथ्वीचं तापमान वाढणं मंद होईल, हवामान बदल कमी होतील आणि भविष्यातील मुलांसाठी जग चांगलं राहील.
* भारतात आपण आधीपासून डाळ-भाजी-भात - भाकरी जास्त प्रमाणात खातो.
आपण आपल्या आहारात केलेला एक छोटा बदल पृथ्वीसाठी मोलाची मदत ठरु शकेल. पृथ्वीला थंड ठेवू शकेल.

vinay.ramaraghunath@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact