- गौरी पटवर्धन
( मुक्त पत्रकार)

सगळ्यांना काय करू आणि काय नको असं झालं असेल. मित्रांना बोलवायचं, खेळायचं, दंगा करायचा, पसारा करायचा, खूप टीव्ही बघायचा, आइस्क्रीम खायचं, आंबे खायचे, पोहायला जायचं, रोज क्रिकेट खेळायचं, खूप खूप वेळ स्क्रीन टाइम घ्यायचा, गावाला जायचं आणि काय काय..
हे आणि असे अनेक प्लॅन्स तुम्ही सुट्टीसाठी केले असतील. खरं म्हणजे परीक्षा सुरु व्हायच्या आधीपासून तुम्ही सुट्टीची वाट बघितली असेल. आणि आता ती सुट्टी सुरु झाली आहे…
तर आता तुम्ही सगळ्यात आधी काय करणार? मे महिन्यात काय करणार आणि सुट्टी संपता संपता काय करणार? याचा विचार सुट्टी सुरु होतांना करून ठेवणं फार महत्वाचं असतं.
नाहीतर काय होतं, की सुट्टी असते दोन महिन्यांची. त्यातले पहिले पंधरा दिवस आपण सॉलिड मजा करतो. मग महिनाभर आपल्याला खूप कंटाळा येतो. “आता मी काय करू?” असं विचारलं तर आईवडील आपल्याला कुठल्या ना कुठल्या क्लासला घालून टाकतात. आणि जून सुरु झाल्यावर तर अक्षरशः असं वाटायला लागतं की कधी एकदाची शाळा सुरु होईल…
आणि एवढं सगळं करून सुट्टीत मजा येतच नाही. असं व्हायला नको असेल, तर तुम्हाला सुट्टीचं प्लॅनिंग करायला पाहिजे.
हेही वाचा!
देशावर बॉम्ब हल्ले होताना आनंदाने खेळणाऱ्या मुलांची गोष्ट
करा सुट्टीचं प्लॅनिंग
१. प्लॅनिंग करायचं म्हणजे काय?तर मुळात आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचं आहे याची एक यादी बनवायची.
२. ही यादी तयार झाली की असा विचार करायचा की यापैकी कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला आईबाबांची परवानगी किंवा मदत लागणार आहे. म्हणजे गावाला जाणं, मित्रमैत्रिणींना दिवसभर किंवा रात्रभर आपल्या घरी खेळायला बोलावणं असल्या गोष्टी आईबाबांच्या मदतीशिवाय आपण करू शकत नाही. आणि आईबाबांना काही उन्हाळ्याची सुट्टी नसते. त्यामुळे त्यांना दिवसभर ऑफिस आणि घरकाम हे नेहेमीसारखंच करावं लागतं. त्यामुळे असले प्लॅन करण्यासाठी त्यांना कधी वेळ आहे हे त्यांना विचारून घ्यायचं. कारण त्यांना ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागते. पैशांची जमवाजमव करायला लागते. तुम्ही अचानक “उद्याच्या उद्या ट्रीपला जाऊया.” असा हट्ट केलात तर ते काहीच करू शकत नाहीत.
३. त्यातही काही गोष्टी तुम्हाला हव्या असतात, आईबाबांना तुम्हाला द्यायच्या असतात, पण तरीही त्या ते करू शकत नाहीत. हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे.
४. काही वेळा आईबाबा आपल्याला सांगत असतात, की सगळे जण सुट्टी लागल्या लागल्या गावाला जातात, सगळीकडे गर्दी असते, त्यापेक्षा आपण जरा नंतर जाऊया. पण आपल्याला सगळ्याची घाई झालेली असते. तर आपण थोडीशी आपली घाई, उत्सुकता आणि एक्साइटमेंट बाजूला ठेऊन आईबाबा काय सांगतायत हे ऐकलं पाहिजे.
५. उन्हाळ्याच्या लांबलचक सुट्टीत तुम्ही अशी एक गोष्ट करू शकता ज्यामुळे तुमचाही वेळ मजेत जाईल आणि आईबाबा पण खुश होतील. ते म्हणजे एखादी नवीन गोष्ट किंवा कौशल्य शिकून घेणं. रोज शाळा, क्लास, आईबाबांचा ऑफिस या सगळ्याच्या घाईत ज्या गोष्टी तुम्ही शिकू शकत नाही त्या सुट्टीत तुम्ही शिकू शकता. एखाद्या लहानमोठ्या गोष्टीचा क्लास लावू शकता.
६. आत्ता वाचताना असं वाटू शकतं, की वर्षभर शाळा असतेच तर सुट्टीत कशाला अजून एक क्लास लावायचा? पण सुट्टीतला क्लास हा अभ्यासाचा नसून इतर कुठल्यातरी धमाल गोष्टींचा असतो. आणि आता आपल्याला कितीही वाटलं, तरी जसं ऊन वाढायला लागेल, तुम्हाला कोणी खेळायला बाहेर जाऊ देणार नाही, मित्रमैत्रिणी गावाला जातील त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की सुट्टीचाही कंटाळा येतो. त्यामुळे त्यासाठी वेळेवर उत्तर शोधून ठेवलेलं बरं!
तुम्हीही सुटीचं प्लॅन करा आणि कळवा ऊर्जाला तुम्ही काय काय करताय ते !

सुट्टीत आपण काय काय करु शकतो?
आईबाबांच्या मदतीशिवाय किंवा थोडीशी मदत घेऊन सुट्टीत आपण बरंच काही करू शकतो. जसं
-कॉलनीत खेळणं
-पुस्तक वाचणं
- हस्तकलेच्या वस्तू बनवणं
- रोजनिशी लिहिणं
- नाटक बसवणं
- घरात बैठे खेळ खेळणं
- अंगणात किंवा गच्चीवर गाद्या घालून झोपणं
या सुट्टीत काय शिकाल?
- थोडासा स्वयंपाक
- घरातल्या वस्तू दुरुस्त करणं
- चित्रकला शिबीर
- नाटक शिबीर
- घरात मदत करणं
patwardhan.gauri@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


