लाइफ स्किल्स
- गौरी पटवर्धन
मुक्त पत्रकार

सगळीकडे परीक्षेचं वातावरण आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत आईबाबा, शिक्षक, शेजारपाजारचे सगळेच्या सगळे मोठे लोक तुम्हाला फक्त अभ्यास आणि परीक्षेबद्दल काहीतरी सूचना देत असतील. पेपर नीट लिही, धांदरटपणा करू नकोस वगैरे वगैरे. पण परीक्षेच्या बाबतीत पण एक फार महत्वाचं लाइफ स्कील असतं हे तुम्हाला माहितीये का?
- ते म्हणजे 'डोकं शांत ठेवणं.
'ह्यॅ.. यात काय विशेष आहे' असं म्हणू नका. परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त गोंधळ आणि चुका कशामुळे होतात माहितीये का? तर परीक्षेचं टेन्शन घेतल्यामुळे.
'बापरे! उद्या परीक्षा आहे ' असं मनात आलं की गोंधळ व्हायला सुरुवात होते. ज्या गोष्टी तुम्हाला एरवी सहज जमतात त्यातही चुका व्हायला लागतात. खरं म्हणजे तुम्ही रोज शाळेचं दप्तर भरता, मग परीक्षेसाठी वेगळं काय भरायचं असतं? तर फक्त रायटिंग पॅड. एरवीही तुम्ही वेळेवरच शाळेत जाता. मग परीक्षेत एवढं काय विशेष आहे?
तर त्याचं तुम्हाला टेन्शन येतं. आणि टेन्शन आलं की चुका व्हायला लागतात. त्यामुळे तणावाखाली डोकं शांत ठेवणं हे फार मोठं कौशल्य आहे आणि ते एकदा जमलं तर तुम्हाला त्याचा आयुष्यभर फायदा होत राहणार असतो.
हेही वाचा!
'सेफ्टी फर्स्ट' साठी आधी संकटाचा विचार करा! तो कसा करायचा?
पण डोकं शांत कसं ठेवायचं?
- समोर असलेल्या परिस्थितीचा पूर्ण विचार करायचा. इथे परीक्षा ही परिस्थिती आहे. याचा ताण घेण्याची खरंच गरज आहे का? हा विचार सगळ्यात आधी करायचा. एरवी आपण जे रोज करतो त्यापेक्षा आज काय वेगळं करायला लागेल याचा विचार करायचा. मग त्या वेगळ्या गोष्टींची यादी करायची. मनातल्या मनात किंवा कागदावर. एवढं काम केलं तरी आपल्या मनावरचा निम्मा ताण कमी होतो. मनावरचा ताण कमी झाला की आपण आपोआप नेहेमीसारखा विचार करायला लागतो.
हे जमलं तर.. - डोकं शांत ठेवण्याचं स्कील आपल्याला भरपूर ठिकाणी कामाला येतं. आपण कधीही कुठल्याही वेगळ्या परिस्थितीत अडकलो, तर याच पद्धतीने विचार करायचा.
- पहिल्यांदा एकट्यानं शाळेतून घरी येतांना, पहिल्यांदा एकट्याने दुकानातून वस्तू विकत आणतांना इतक्या लहान लहान गोष्टीत आपल्याला डोकं शांत ठेवण्याचा उपयोग होतो.
- परीक्षेच्या निमित्तानं हे करून बघा आणि मग विचार करा की आपण आजवर फक्त गोंधळून गेल्यामुळे काय काय चुका केल्या आहेत? त्या आपल्याला टाळता आल्या असत्या का? निदान त्याच चुका परत होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करू शकतो का?
या चुका अगदी गणिताच्या पेपर मधल्या सिली मिस्टेक असू शकतात किंवा कुठल्यातरी चुकीच्या बसमध्ये बसल्याच्याही असू शकतात. आठवून तर बघा!
patwardhan.gauri@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


