किती धडे.. किती कविता.. भाषेचा अभ्यास करताना सगळं लक्षात कसं ठेवायचं?

 

Image: freepik

भाषा आपण रोज बोलतो. वापरतो. ऐकतो. मग तिचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं?
आपण शाळेत जे जे विषय शिकतो ते सगळे म्हणजे अगदी विज्ञान समजून घ्यायलाही आपल्याला भाषाच उपयोगी पडते. मराठी, हिंदी, इंग्लीश, संस्कृत, कन्नड, उर्दू… अगदी कुठल्याही भाषेत तुम्ही शिकत असा, ती भाषा तुम्हाला छान येत असेल तर त्या भाषेतून तुम्हीं ज्या विषयाचा अभ्यास कराल तो मस्तच होईल.
भाषेच्या अभ्यासासाठी अवांतर वाचन खूप महत्त्वाचं आहे. अवांतर वाचन म्हणजे काय? अभ्यासाची पुस्तकं सोडून तुम्ही जे जे वाचता ते म्हणजे तुमचं अवांतर वाचन… रोज घरी येणारा पेपर, गोष्टींची, कवितांची पुस्तकं… कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र हे सगळं वाचल्यानंतर आपल्याला कितीतरी नवनवीन शब्द माहिती होतात. या वाचनातून आपली कल्पनाशक्ती सुधारते. आपला विचार करता येण्याची क्षमता सुधारते. अवांतर वाचनातून नवीन म्हणी, वाक्प्रचार माहिती होतात. त्यांचा वापर केला की आपलं लिहिणं, बोलणं सगळंच चारचौघांपेक्षा उठून दिसतं. आपली भाषा पक्की होते आणि मग त्या भाषेत अभ्यास करतानाही आपल्याला मजा यायला लागते.

हेही वाचा!

इंग्रजीचा अभ्यास मारुन मुटकून नाही तर हसत खेळत करा.. तो कसा?

परीक्षेसाठी भाषेच्या पेपरचा अभ्यास करताना अर्थातच तुम्हाला तुमचं पुस्तक वाचायला हवं. त्यातले धडे-कविता सतत तुमच्या डोळ्यांखालून जायला हव्यात. त्याखालचे नवीन शब्द, त्यांचे अर्थ, प्रश्नोत्तरं हे सतत वाचलं तरी तुमचा भाषेच्या पेपरचा अभ्यास होतो. पण तो धडा किंवा कविता कुठल्या लेखकाने, कवीने लिहिली आहे, त्या लेखकाचं किंवा कवीचं एखादं पुस्तक तुमच्या शाळेच्या लायब्ररीत असेल तर ते तुम्ही वाचलं तर त्यातून तुम्हाला कितीतरी नव्या गोष्टी कळतात. तुमची भाषेशी मैत्री होते. अर्थात् हे वर्षभर करायचं, आत्ता परीक्षा जवळ आल्यावर फक्त पुस्तक वाचायचं…
कुठल्याही भाषेतल्या अवांतर वाचनाचा अजून एक फायदा म्हणजे आपलं व्याकरण सुधारतं. वाचताना नीट लक्ष असेल तर ऱ्हस्व-दीर्घ, उकार, वेलांट्या हे सगळं लक्षात ठेवायला सोपं जातं, म्हणजे मग पेपर लिहिताना आपणही ते अचूक लिहू शकतो.
तुमच्यापैकी अनेकांना शब्द, त्यांचे अर्थ, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द आले की गोंधळून जायला होतं, हो ना? त्यावर एक साधा उपाय करायचा. शब्दांचे अर्थ सरळ लिहून काढायचे. एखाद्या परिच्छेदातले समजा तुम्हाला पाच शब्द अडत असतील तर त्यांचे अर्थ तिथेच पेन्सिलने लिहायचे. हे एकदा केलं की परत परत धडा वाचताना अडलेला शब्द त्याच्या अर्थासह वाचला जाईल म्हणजे मग शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा, पाठ करा हे टेन्शनच नाही!
परीक्षा जवळ आली की भाषेचा अभ्यास म्हणजे पुस्तक वाचत राहाणं… मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांच्या पेपरआधी हे करायचं. पुस्तकातले धडे वाचले की व्याकरणाचाही अभ्यास होतो. स्पेलिंग्जही सारखी डोळ्यांखालून गेली की वेगळी पाठ करायला लागत नाहीत आणि शिवाय हा अभ्यास इतर विषयांचा अभ्यास करताना उपयोगीही पडतो.
आहे की नाही सोप्पं?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact