पिटू पक्ष्याच्या पोटात प्लॅस्टिकचे ४०३ तुकडे! त्याच्या पोटात एवढं प्लॅस्टिक कुठून आलं?

- अदिती देवधर
(मुलांना पर्यावरणाबाबत जबाबदार बनवण्यासाठी धडपडणारी ताई)

Illustration by: Sayali Bhagali-Damale

निळ्या समुद्रात एक छोटं बेट होतं. त्या बेटावर खूप पक्षी राहायचे. त्यातच एक समुद्रीपक्षी होता, त्याचं नाव पिटू. पिटूला समुद्र खूप आवडायचा. पंख पसरून रोज तो बेटावरून भरारी घ्यायचा, पाण्यात डुबकी मारून मासे पकडायचा. मासे पकडणं खूप अवघड काम असतं, मासे थोडेच एका जागी थांबतात… भरपूर डुबक्या मारल्या तर कुठे एखादा मासा मिळतो, पण पिटूला मात्र ते जमायचं…
एक दिवस त्याला समुद्रात लालचुटुक मासा दिसला. पिटूच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने झपाट्याने सूर मारला आणि काय आश्चर्य… तो मासा लगेच त्याच्या चोचीत आला. त्याने सुळकी मारून पळायचा प्रयत्नही केला नाही. या माशाला चव नव्हती. पण चला, सहज, फारसे प्रयत्न न करता खायला मिळालं ना, पिटू त्यावरच खूश होता.काही दिवसांनी परत असाच एक आळशी मासा मिळाला. पिटूने सूर मारला तरी त्याने पळून जायचा प्रयत्न केला नाही. हाही फारसा चविष्ट नव्हता पण त्याचा रंग छान पिवळाधमक आणि चकचकीत होता.

 

 

हेही वाचा!

दहावीची परीक्षा?- यंदा नाही देणार! हे असं वैभव सूर्यवंशी कसं म्हणू शकतो?

कधीतरी मिळणारे हे असे आळशी मासे मग सारखेच मिळायला लागले. रंगीबेरंगी, चकचकीत मासे बघून हा घेऊ की तो असं व्हायचं पिटूला… नुसते मासेच नाही, लांबडे किडेसुद्धा भरपूर मिळायचे.
पण आपण ज्यांना मासे समजतोय ते खरं तर प्लॅस्टिकचे तुकडे आहेत आणि लांबसडक किडे म्हणजे नायलॉनचे दोरे हे पिटूला कळायला खूप वेळ लागला.
त्याच्या छोट्या बेटाभोवतीचा निळा, स्वच्छ समुद्र आता प्लॅस्टिकच्या तुकड्यांनी भरून गेला. भरपूर मासे मिळतात म्हणून खुश असलेल्या पिटूचं पोट आता सारखं दुखायचं. दमायला व्हायचं. जास्त मासे खाल्ले तर जास्त शक्ती येईल या विचाराने बिचारा अजून मासे खायला लागला… पण झालं उलटंच, त्याला अजूनच थकवा यायला लागला. आपण खातोय ते मासे नाहीत, प्लॅस्टिक आहे आणि ते पचत नाही, पोटात साठून राहातं हे त्याला बिचाऱ्याला कोण सांगणार होतं?

शेवटी पिटू अशक्त होत गेला. त्याचं उडणं बंद झालं… मग एकदा एका शास्त्रज्ञाला तो सापडला. “एवढा सुंदर पक्षी असा अशक्त का झाला असेल?” या विचाराने त्याने पिटूला आपल्या प्रयोगशाळेत आणलं. पिटूच्या पोटात प्लॅस्टिकचे तुकडे आहेत असं शास्त्रज्ञाच्या लक्षात आलं. त्याने एकेक तुकडा बाहेर काढला… किती तुकडे होते माहितीये? - चारशे तीन !!!!!

छोटे, मोठे, पातळ, कडक, सगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकचे तुकडे! हे एवढं प्लॅस्टिक पिटूच्या समुद्रातल्या त्या लांबच्या बेटावर कसं पोहोचलं?
त्या तुकड्यांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्यांची झाकणं, चिप्सची पाकिटं, चॉकलेटची चांदी, ज्यूस प्यायचे स्ट्रॉ, टिफिन बॉक्स, वाढदिवसाच्या पार्टीत लावलेले फुगे… असे कशाकशाचे अवशेष होते. आपण म्हणजे माणसांनी ते कचरा म्हणून टाकले. नदीतून वाहात वाहात ते समुद्रात गेले. पाण्याबरोबर पोहत पोहत पिटूच्या बेटावर… आणि मग त्या बिचाऱ्याच्या पोटात.

Image: google

आपण रोज शाळेत प्लॅस्टिकचा डबा, प्लॅस्टिकची पाण्याची बाटली शाळेत नेतो. प्लॅस्टिकचा डबा दोन-तीन वर्ष टिकतो. मग नवीन आणावा लागतो. प्लॅस्टिकची बाटली तर दरवर्षीच नवीन लागते. आपण टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या डब्याचं काय होतं? तो कुठे जातो? प्लॅस्टिकचं रिसायक्लिंग दोन तीन वेळाच होतं, त्यानंतर ते इतकं खराब होतं की त्याचा उपयोगच होत नाही. मग असं निरुपयोगी प्लॅस्टिक कचरा होऊन कुठे कुठे पडतं आणि पावसाच्या पाण्याबरोबर नदीत, समुद्रात जातं.
आपल्याच एखाद्या जुन्या डब्याचा तुकडा पिटूच्या पोटात नसेल ना गेला?
आपल्याला त्यासाठी काय करता येईल ? - पुण्यातल्या हजारो मुलांनी एक ठरवलंय - शाळेत प्लास्टिकचा नाही, तर स्टीलचाच डबा न्यायचा!
पिटूसारख्या अनेक पक्षांसाठी तुम्ही पण एवढं कराल?

मुलं काय करू शकतात?

१ . समुद्रात आणखी प्लॅस्टिक जाऊ नये म्हणून मुलांना खूप काही करता येईल!
२. शाळेत नेण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी स्टीलचा डबा वापरला तर?
३. स्टील कधी कुणी कचऱ्यात टाकत नाही; कारण स्टील खूप टिकतं. एकदा डबा आणला की शाळा, कॉलेज, पुढे ऑफिसलाही तोच वापरता येईल…
४. प्लॅस्टिकच्या बाटली ऐवजी स्टीलची बाटली… नवीन पुस्तकं आणली की त्यांना प्लॅस्टिक ऐवजी साधं कागदाचं कव्हर घातलं तर?

aditi.deodhar@gipe.ac.in

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact