दहावीची परीक्षा?- यंदा नाही देणार! हे असं वैभव सूर्यवंशी कसं म्हणू शकतो?

- अनन्या भारद्वाज

Image: assets.thehansindia

'बघ..बघ..बघ..जराऽऽऽ'
-हातातला मोबाइल कधी नव्हे ते स्वत:हून आईच्या पुढ्यात टाकत सातवीतला सम्यक संतापतच ओरडून म्हणत होता,' वाच जराऽऽऽ, आता तू वाच ही बातमी!'
आईने बातमी वाचली आणि लगेच तिची ट्यूब पेटली. बातमी होती की क्रिकेटमधला नवा नवा ताजा ताजा स्टार यावर्षी अभ्यास झाला नाही म्हणून दहावीची परीक्षाच देणार नाहीये! त्याच्या आईबाबांचंही म्हणणं की अभ्यास नसेल झाला, तर कशाला टेन्शन द्यायचं त्याला! मुख्य म्हणजे हॉल तिकिट आलं, परीक्षा केंद्र पाहून आले आणि मग ऐनवेळी परीक्षेला दांडीच मारायची ठरवली भाऊने!
ही बातमी आईला वाचून दाखवत सम्यक म्हणाला, '...बघितलंस? माझी साधी घटक चाचणी असली तरी तू म्हणतेस, पेपर देऊन मॅचला जा. आधी अभ्यास कर. क्रिकेटचा क्लास बुडला तरी चालेल पण होमवर्क पूर्ण कर..! वैभवच्या आईवडिलांनी असं केलं असतं तर कमावले असते का त्यानं एवढे पैसे? झाला असता का तो स्टार?'

हेही वाचा!

छान नटायला आणि मेकअप करायला मुलांनाही आवडतं.. यात त्यांचं काही चुकतं का?

सम्यकचे प्रश्न तर बरोबरच आहेत. खेळाला आपल्याकडे अभ्यासापेक्षा तसा कमीच भाव मिळतो. क्रिकेटची मॅच पाहात बसली मुलं की आईआजीबाबाआजोबाकाकामामा सगळ्यांचे पापड मोडतात.
मग वैभव सूर्यवंशीचे आईबाबा कसे काय इतरांपेक्षा वेगळा धाडसी निर्णय घेऊ शकले?
आपले आईबाबा म्हणजे एकदम डरपोक पकाऊ वाटतात, अभ्यासाचा लकडा न लावता आईबाबांनी आपल्याला खेळू दिलं तर आपणही उद्याचे कोहली, बुमराह होऊ, तेवढं ना सही कोट्यावधीची डिल देणारी आयपीएल तरी खेळूच असं खूप मुलांना वाटत असतं.
सम्यकचा मुद्दा नीट समजून घेतल्यावर आई म्हणाली, 'वैभवच काय, अगदी धोनी-कोहलीनेही केलं नाही शिक्षण पूर्ण हे खरंय. पण अनिक कुंबळे, राहुल द्रविड, अगदी रिंकू सिंगही चांगले शिकलेत. व्यंकटेश अय्यर तर पीएचडी आहे, आयपीएलमधला सगळ्यात महागडा भारतीय खेळाडू. पण ठीक आहे... तू पण घे ड्रॉप, मात्र वैभव करतो तेवढं उद्यापासून रोज करशील का?
जमेल का तुला?'

वैभवएवढा ‘अभ्यास’ रोज जमेल का?
१. वैभव येत्या मार्चमध्ये १५ वर्षांचा होईल. ५ वर्षांचा होता तेव्हापासून रोज सकाळी तो ६ वाजता उठतो. तासाभरात आवरुन लगेच मैदानात. रोज ७ ते ९ क्रिकेट. दिवसाला किमान ६०० बॉल ड्रिल्स करतोच.
२. सकाळी १० ते १२ शाळेचा अभ्यास-क्लास असतो.
३. नंतर १२ ते २ आराम. जेवण. त्याकाळातही मोबाइल बंदी. जेवणात जंक फूड मिळत नाही. रोज ठरलेलंच डाएट. त्यात बदल करण्याची परवानगी नाही. पिझाबिझा काही मिळत नाही.
४. दुपारी २ ते सायंकाळी ७ परत क्रिकेट प्रॅक्टिस. येत नाही तोपर्यंत एकेक फटका शिकायचा. पळायचं. फिल्डिंग शिकायची. बॉलिंग शिकायची.
५. आज पोट दुखतं, आज मूड नाही, आज पाऊस आला, मित्राचा वाढदिवस, कंटाळा आला म्हणून एकही दिवस प्रॅक्टिस बुडवता येत नाही.
६. रात्री ९ वाजता तासभर होमवर्क करायलाच बसवतात त्याचे बाबा.
७. रात्री १० वाजता गुडूप झोपायचं. लेट नाइट टीव्ही, मोबाइल गेम, नाइट आऊट, टाइमपास करण्यावर बंदी.
८. शिस्त म्हणजे शिस्त, ना खाण्याची शिस्त मोडता येत, ना क्रिकेट अभ्यासाची.
९. त्यालाही बोलणी बसतात, रडू आलं तरी सॉरीबिरी काही नाही. सराव करायचाच.
१०. क्रिकेटमध्ये टॉप करतोय म्हणून यंदापुरती परीक्षा चुकली, ती त्याला नंतर द्यायचीच आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact