
तुम्हाला रुबिक्स क्यूब माहिती आहे? तुम्ही खेळतच असाल तो… किती वेळ लागतो तुम्हाला रुबिक्स क्यूब सोडवायला? मिनिटं? तास की दिवस?
आपल्याला जो रुबिक्स क्यूब सोडवायला मान मोडून तासंतास बसायला लागतं ना तोच रुबिक्स क्यूब चीनमधल्या यिहेंग वांगचा मात्र जेमतेम काही सेकंदांमध्ये सोडवून होतो‘ अजिबात खरं वाटत नाही ना तुम्हाला हे? पण खरंच… आत्ताच २०२५ मध्ये द वर्ल्ड क्यूब असोसिएशनने दक्षिण कोरियामध्ये एक स्पर्धा घेतली. या स्पर्धेतलं यिहेंगचं ‘बेस्ट टायमिंग’ ४.२३ सेकंद एवढं होतं. म्हणजे पाच सेकंदांपेक्षा कमी वेळात त्याने रुबिक्स क्यूब सोडवला. गंमत म्हणजे त्याने ४.२३ सेकंदांमध्ये क्यूब सोडवला तेव्हा तो त्याचा ‘स्लोएस्ट’ खेळ होता आणि त्याने ‘फास्टेस्ट’ सोडवलेला क्यूब अवघ्या ३.९६ सेकंदांमध्ये म्हणजे चार सेकंदांपेक्षा कमी वेळेत सोडवला होता.
हेही वाचा!
अवघड स्पर्धा 'कूल' राहून जिंकता येते? फैजान झाकीने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली त्याची गोष्ट
यिहेंग चीनमध्ये राहातो. वयाच्या सहाव्या वर्षीपासून तो रुबिक्स क्यूब खेळतो. आता तो ज्या प्रकारचा खेळ खेळतो, त्याला स्पीडक्यूबिंग असं म्हणतात. दक्षिण कोरियातल्या सेऊलमध्ये ५० देशांचे ८०० स्पीड क्यूबर्स आले होते. यिहेंग ज्या शांत डोक्याने आणि झटक्यात क्यूब सोडवतो ते बघून तिथे आलेल्या लोकांनी तोंडात बोटं घातली, यावरुनच तुम्ही काय ते ओळखा! एवढ्या कमी वेळात क्यूब सोडवणारा हा गुणी मुलगा म्हणून सगळे जण याचं कौतुक करत होते आणि हा मात्र म्हणत होता, मी जिंकलो म्हणून मला भारी वाटतंच आहे, पण मला खेळायला मजा आली, ती मजाच सगळ्यात महत्त्वाची!
आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी शरीराचा व्यायाम करणं महत्त्वाचं असतं ना? मेंदू तल्लख राहावा यासाठी मेंदूलाही व्यायाम लागतो. रुबिक्स क्यूब सोडवणं हा मेंदूसाठी उत्तम व्यायाम आहे. अभ्यासात लक्ष एकाग्र व्हायला हवं, एका जागी स्थिर बसायची सवय लागायला हवी असेल, स्मरणशक्तीही चांगली ठेवायची असेल तर रुबिक्स क्यूब सोडवा. त्याचा तुम्हाला अभ्यासातही खूप उपयोग होईल.
रुबिक्स क्यूब एकदा का हातात मिळाला की तो सोडवल्याशिवाय चैन पडत नाही, हो ना? तुम्हालाही आलाय ना असा अनुभव? तो कसा सोडवायचा हे सांगणारी, गाईड करणारी, टिप्स आणि हॅक्स सांगणारी कितीतरी पुस्तकं आहेत… युट्यूब ट्युटोरिअल्स आहेत हे माहितीये तुम्हाला? रुबिक्स क्यूब तुम्हाला सुटत नसेल तर त्या टिप्स आणि हॅक्सचा तुम्हाला उपयोग होतो का बघा, पण चिटिंग मात्र करु नका… काय? रुबिक्स क्यूब हे खेळणं असलं तरी लहानांइतकंच ते मोठ्यांनाही आवडतं.. विल स्मिथ, जस्टिन बिबर, ब्राझिलचा फुटबॅालपटू फिलिप लुई ही नावं तुमच्या ओळखीची आहेत? मग या सगळ्यांनाही रुबिक्स क्यूब सोडवायला आवडतो. विल स्मिथने एका रिॲलिटी एका मिनिटापेक्षा कमी वेळात तो सोडवला होता. आपल्या आमिर खानलाही रुबिक्स क्यूब सोडवायला आवडतो आणि विराट कोहलीला ते आमिरकडून शिकायचं आहे असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता.
मग तुम्ही वाट कसली बघताय? घ्या तुमच्याकडचा क्यूब आणि सोडवा… किती वेळात सोडवला हे आम्हाला नक्की कळवा!

एका असाइनमेंटचा इंटरेस्टिंग गेम
हंगेरीच्या बुडापेस्ट या शहरात १९४४ मध्ये जन्मलेले एर्नो रुबिक हे रुबिक्स क्युबचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यावेळी दुसरं महायुद्ध सुरु होतं. एर्नोचे बाबा वडिल विमानांच्या कारखान्यात इंजिनिअर होते. आपण ठरवलं तर आपण कुठलीही गोष्ट सहज करु शकतो हे मला माझ्या बाबांनी शिकवलं असं हे एर्नो रुबिक सांगायचे. त्यांनी तयार केलेला पहिला क्यूब लाकडी होता. बुडापेस्टमधल्या अप्लाईड आर्ट्स कॉलेजमध्ये एर्नो ‘आर्किटेक्चर’ शिकवायचे. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ‘असाईनमेंट’ म्हणून खरं तर हा क्यूब तयार केला होता. पुढे जाऊन तो जगभरातल्या लहान मोठ्या माणसांना वेड लावेल अशी कल्पनाही त्यांनी तेव्हा केली नसेल! १९७५ मध्ये त्यांनी कोडं किंवा पझल गेम म्हणून तो तयार करुन विकण्यासाठी पेटंट घेतलं. हंगेरीत तेव्हा जे सरकार होतं त्या सरकारच्या काळात तो तिथे तयार करणं शक्य नव्हतं, म्हणून १९७९ मध्ये तो तयार करायची जबाबदारी एर्नोंनी अमेरिकेतल्या आयडियल टॉय्ज या कंपनीला दिली. पण बाजारात आल्यावर अक्षरशः रातोरात हे खेळणं चांगलंच लोकप्रिय झालं. टॉय ऑफ द इअर हा पुरस्कारही त्याने अनेकदा मिळवलाय… आत्तापर्यंत जगभरात ३५० मिलियनपेक्षा जास्त रुबिक्स क्यूब विकले गेलेत, त्यामुळे ‘बेस्ट सेलिंग टॅाय ॲाफ ॲाल टाईम’ म्हणूनही रुबिक्स क्यूबचं रेकॉर्ड आहे, आहे की नाही गंमत?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


