सुटीची सवय मोडून शाळेत जाण्याचा कंटाळा का येतो?

मेंदूची सिक्रेटस
- डाॅ. श्रुती पानसे

Image: freepik

खूप दिवसांच्या सुट्टीनंतर जेव्हा शाळा सुरू होते, अभ्यास सुरू होतो, तेव्हा सुरुवातीला कंटाळा येणं साहजिक असतं. कारण मेंदू एकदम आरामाच्या अवस्थेत असतो. रोज लवकर उठायचं आहे, अभ्यास करायचा आहे, शाळेत जायचं आहे. संध्याकाळी घरी येऊन शाळेत दिलेला अभ्यास करायचा आहे आणि ही दिनचर्या रोज पाळायची आहे. ही शिस्त सोमवार ते शनिवार पाळायची आहे. याची सवय काहीशी गेलेली असते. म्हणून पुन्हा त्या रुटीनला सुरुवात करणं यासाठी आपलं मन आणि शरीर सुरुवातीच्या काळात थोडसं तयार नसतं. पण जेव्हा एक-दोन दिवस जातात, त्यानंतर आपण शाळेत रूळतो.

हेही वाचा! 

आपल्याला सुट्टी असते तशी मेंदूलाही सुट्टी असते का?

नवीन वर्ग, नवीन शिक्षक, कदाचित नवीन मित्र-मैत्रिणी, नवी वह्या पुस्तक आणि आपण आता वरच्या वर्गात गेलो याची मस्त भावना मनात असते. आणि म्हणून छान वाटत असतं. हळूहळू तेही सरावाचं होऊन जातं. यासाठी मेंदू मदत करतो. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात.

आता आठवून बघ की ज्यावेळेस शाळा चालू होती, मग परीक्षा झाली, त्यानंतर जेव्हा सुट्टी सुरू झाली, तेव्हा पहिले काही दिवस शाळेची किती आठवण यायची ! ठराविक वेळ झाली की आता माझी शाळेत जायची वेळ झाली! आत्ता शाळा सुरू असली असती तर मी शाळेत पोहोचले असते किंवा आता माझी डबा खायची वेळ झाली असती, असे विचार आपल्या मनात येत असतात. शाळेत रोज भेटणारे आपले मित्र-मैत्रिणी सुट्टीच्या काळात किती आठवतात! आता मेंदूला नव्या वर्गात जायला तयार करायला हवं.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact