आपल्याला सुट्टी असते तशी मेंदूलाही सुट्टी असते का?

मेंदूचे सिक्रेटस
- डाॅ. श्रुती पानसे

Image: freepik

शाळेला सुट्टी म्हणजे मेंदूलाही सुट्टी असते का? अजिबात नाही. उलट तू या सुट्टीत काय केलंस हे पुन्हा आठव. कोणालातरी सांग. किंवा लिहून काढ. म्हणजे कळेल की या सुट्टीत तुझ्या मेंदूला तू छान काम दिलंस की त्याला बोअर केलंस?

या सुट्टीमध्ये तू काय केलंस ? या सुट्टीत फिरायला गावाबाहेर जाणं झालं का? जर झालं असेल तर तिथे काय पाहिलं? कुणाला भेटलो? आपण नवीन कोणते पदार्थ खाल्ले ?

जर गावाबाहेर गेलो नसू तर पूर्ण सुट्टीत काय केलं? एखादी नवीन चांगली सवय लावून घेतली का? आपल्याकडे कोणी पाहुणे आले होते का? काय गमती जमती घडल्या? आपण काही शिबिरांना गेलो का? तिथे काय शिकलो? तिथे आपल्याला नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले का?

समजा शिबिरांना गेलो नसू तर सुट्टीत नवीन काय केलं? आई-बाबाला घरात मदत केली का? काहीजणांनी सुट्टीत छोटसं बाहेरचं काम केलं असेल किंवा घरातलं एखादं नवीन काम शिकलं असेल तर त्या सगळ्याबद्दल आवर्जून लिहिणं फार आवश्यक आहे. त्यामुळे या अनुभवांमुळे आपल्या मेंदूमध्ये काय बदल झाला हे आपल्या लक्षात येईल. कोणताही नवा अनुभव आपला मेंदू बदलवत असतो. या सुट्टीत मेंदू किती बदलला? किती नव्या गोष्टींची भर तू घातलीस? आणि स्क्रीनसमोर फार वेळ घालवला नाही ना? जर फार काही घडलं नसेल तर आत्ता शाळा सुरु झालेली असताना शनिवार-रविवारच्या सुटीत काही वेगळे प्रयोग करा. आपल्या मेंदूत काय नवीन चांगली भर घालायची हे ठरवा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact