खरे मित्र आपली चेष्टामस्करी करतात, चिडवतात का?

Image: freepik

माझे मित्र माझी खूप चेष्टामस्करी करतात. माझं काही चुकलं की मला हसतात. चिडवतात. मला खूप वाईट वाटतं, मी काय करु? - अनुप, धाराशिव.

मित्र म्हटलं की त्यात थोडी चिडवाचिडवी, चेष्टामस्करी हे सगळं आलंच, पण तुझे मित्र तुझी सतत फक्त चेष्टामस्करीच करत असतील आणि विशेष म्हणजे तुझं काही चुकलं म्हणून, तुला कुणी ओरडलं म्हणून तुला हसत किंवा चिडवत असतील तर आपण त्यांना आपले मित्र म्हणायचं का याचा विचार तू करायला हवास.

मैत्रीत भरपूर दंगामस्ती हवी, चिडवाचिडवी, चेष्टामस्करीही हवी, पण ते फक्त मजामस्तीपुरतंच असायला हवं. आपल्या मित्राला काही त्रास होत असेल आणि त्याच्यावर इतर सगळे हसत असतील किंवा चिडवत असतील तर आपण जरा विचार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ शाळेत तुझं काही तरी चुकलं म्हणून टीचरनी तुला वर्गात उभं केलं आणि ते काही बोलले तर तुझे खरे मित्र त्या प्रसंगात कधीही हसणार नाहीत, उलट ते तुला असं म्हणतील की तुझं खरंच चुकलं, पुन्हा असं होणार नाही यासाठी आपण काळजी घेऊ. याउलट जे तुला हसतील, चिडवतील, डिवचतील ते तुझे खरे मित्र नाहीत हे लक्षात ठेव.

हेही वाचा!

अभ्यासात अडचण येते पण शिक्षकांना प्रश्न विचारण्याची भीती वाटते?

आपण एकत्र एका वर्गात शिकतो म्हणून सगळेच आपले मित्र असतात असं नाही. एखाद्या वाईट, फजितीच्या प्रसंगात कोण आपल्याशी कसं वागलं यावरुनच आपल्याला खरे मित्र कोण याची पारख होत असते. आत्ता तू लहान आहेस त्यामुळे हे तुला कठीण वाटेल, पण मोठा होशील तेव्हा याचा अर्थ तुला नक्की कळेल.
मित्रांच्या वागण्याचं वाईट वाटतं असं तू म्हणालास, पण त्यांच्या वागण्याचा विचार करु नकोस, ते हसतात, चिडवतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, म्हणजे त्यांच्या वागण्याचं तुला वाईट वाटणार नाही.

शिवाय, ज्यांच्या वागण्याचं आपल्याला वाईट वाटतं त्यांच्यासारखं आपण कधीही वागायचं नाही हे लक्षात ठेव. तुझ्या वर्गातली इतर मुलंमुली काही चुकले, वेडंवाकडं वागले तर तू त्यांना हसू नकोस, चिडवू नकोस, त्यांच्याशी छान वाग, त्यातूनच तुला खरेखुरे मित्रमैत्रिणी मिळतील, काय एवढं जमवशील ना?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact