- डॉ . सुनील गोडबोले

भूक ही एक अजब गोष्ट आहे ! आईनं जेवायला बोलावलं तर गायब होते ; पण थोड्या वेळानं भज्यांचा नुसता वास आला तरी ‘कधी खाऊ कधी नाही !’ असं होऊन जातं !
भूक लागते म्हणजे होतं काय?
रक्तातील पोषणमूल्यं एका विशिष्ट पातळीखाली गेली की मेंदूतील केन्टू जागृत होतं व खाण्याची इच्छा निर्माण होते. काही वेळा मात्र अन्नाच्या दर्शनाने किंवा सुवासानेसुद्धा खावंसं वाटतं; पण तो मोह असतो, भूक नसते ! मित्रांनो, तुमची इथंच गल्लत होते. कॅडबरीचा एक तुकडा वाटीभर वरणभाताची भूक नष्ट करतो. मग जेवताना भूक नाही म्हणून आई-बाबांशी समरप्रसंग ठरलेलाच !
हेही वाचा!
पौष्टिक खाऊच्या डब्याला कशाला आईला त्रास? हा खाऊ तुम्हीच केला तर!
समजा, भूक लागलीच नाही तर?
1) तुम्ही भरपूर खेळत बसाल, प्रत्येक क्षणाला शरीरातील साखरेचं प्रमाण, ऊर्जेचं प्रमाण कमी कमी होत जाईल आणि हे प्रमाण एका क्षणाला धोक्याच्या पातळीपेक्षाही खाली जाईल.
2) त्यावेळेस मेंदू, हृदय, किडनी इत्यादी महत्त्वाचे अवयव बॅटरी संपल्यागत थंडावतील व जीवावर बेतेल.
3) थोडक्यात स्कूटर/ कारला ज्याप्रमाणे रिझर्व्ह म्हणजे पेट्रोल संपत आल्याची सूचना मिळते तशीच शरीरातील इंधन संपत आल्याची सूचना म्हणजे ‘भूक’ !
पोटाच्या पोत्यात काय काय भरताय?
1) आपलं पोट म्हणजे जादूची पोतडीच म्हटली पाहिजे. बिच्चारं वाट्टेल ते आणि वाट्टेल तेव्हा पचवायला बघतं.
2) बऱ्याचवेळा पोट आपले काम सुरळीत बिनबोभाट पार पाडतं; परंतु काही वेळा पोट निषेध व्यक्त करतं. ‘अपचन’ हा सोपा पण अनेक तक्रारी सामावून घेणारा शब्दप्रयोग या निषेधालाच वापरला जातो.
3) भूक कमी होणे ही अपचनाची सुरुवात, मग मळमळ, पोटदुखी, उलट्या, करपट ढेकर, तोंडात फो ड येणे, अस्वस्थपणा, डोकेदुखी अशा अनेक तक्रारी त्यातून सुरू होतात.
भूकच लागली नाही असं का होतं?
1) अयोग्य अन्नपदार्थ- भरपूर चीज/ बटर लावलेला पिझ्झा प्रत्यक्षात पचायला जड जाणारच ! मैद्याचे पदार्थ (ब्रेड, बिस्किटे, खारी) चवीला चांगले लागले तरी त्यात केवळ पिष्टमय भाग असतो,ज्याने भूक कमी होते.
2) जाता येता चरणे- भूक लागलेली नसताना केवळ जिभेच्या चोचल्यापोटी चरणे हे त्रासदायकच ! टीव्हीपुढे बसून वेफर्स, चिप्स फस्त करणं तेवढ्यापुरते आनंददायक वाटते; पण त्यानंतर पोटाची, भुकेची पार वाट लागते.
3) अपुरा व्यायाम- जर आपलं शरीर आपण हलवलेच नाही तर खाल्लेल्या अन्नाचा योग्य विनियोग होत नाही. म्हणूनच भरपूर खेळणं, व्यायाम हवाच ! मोकळ्या हवेत एक तासभर भरपूर खेळण्याने भुकेचा प्रश्न कायमचा मिटून जाईल.
4) मानसिक ताण- परीक्षेचा ताण, अभ्यासाचा डोंगर, भांडणं, चिडचिड, आरडाओरडा, वादविवाद, वारंवार शिक्षा इ. सगळंच आपल्या मेंदूतील मध्यवर्ती केंद्रांना त्रास देऊन जातं. भुकेचं केंद्रसुद्धा असंतुलित होऊन जाते. त्यातून एकतर भूक संपूर्ण नष्ट होते किंवा अति भुकेचा राक्षस निर्माण हाेताे. त्यासाठी डोके शांत ठेवणं हाच उपाय. म्हणून चौरस आहार, भरपूर व्यायाम, शांत मन या तीन गोष्टी विसरायच्या नाहीत.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


