परीक्षा संपली ना एकदाची? सुट्टी लागली ना? हुश्श!
एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे अभ्यास आणि परीक्षा. एप्रिल महिना एकदम बोअर असतो त्या बाबतीत. म्हणजे सगळा एप्रिल नाही. पण निदान पहिले १०-१२ दिवस तरी! बाहेर चिंचा, बोरं दिसायला लागलेली असतात. झाडांना कैऱ्या लटकलेल्या असतात, आंबे यायला लागलेले असतात आणि मोठी माणसं यातलं काहीही आपल्याला खाऊ देत नाहीत. का? तर म्हणे परीक्षा संपू द्या. उगाच काहीतरी खाऊन आजारी पडू नका.
बरं खाऊ देत नाहीत तर नाहीत, पण दोन पेपरच्या मधल्या सुट्टीत कुठे जाऊसुद्धा देत नाहीत. ‘बाहेर फार ऊन आहे, खेळायला कुठे जाऊ नका. जरा चार दिवस घरात खेळा काय ते. परीक्षा संपली की करा काय ते उद्योग!’

अरे काय वैताग आहे. होळी, धुळवड, रंगपंचमीला थोडं पाण्यात खेळू देतात, अगदीच नाही असं नाही. पण तेही थोडा वेळ. का? तर परीक्षा!
हेही वाचा!
सुटीच्या दिवशी आंघोळीला बुट्टी दिली तर काय बिघडतं?
असं सगळं असल्यामुळे वार्षिक परीक्षेची कटकट कधी एकदा संपते याची सगळे वाट बघत असतात. म्हणजे मुलं तर वाट बघतातच, पण आईवडील पण त्याची वाट बघत असतात. कारण त्यांनाही एव्हाना मुलांची भुणभूण ऐकण्याचा आणि सारखं सगळ्याला ‘नाही’ म्हणण्याचा कंटाळा आलेला असतो. त्यामुळे परीक्षा संपली की आईवडील म्हणतात, “आता करा काय करायचं ते! फक्त आजारी पडू नका आणि कुठे धडपडू नका.” आणि मग मोठा प्रश्न निर्माण होतो, की अजिबात न धडपडता आणि आजारी न पडता मजा करायची म्हणजे करायचं काय? तर त्यासाठी काही आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. अशा गोष्टी ज्या तुम्ही सहज करू शकता, त्या करायला आईवडील ‘नाही’ म्हणणार नाहीत आणि तरीही त्यात धमाल येईल. त्या गोष्टी कुठल्या ते वाचायला मला रोज इथे भेटायला या!
- तुमची ऊर्जा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


