सुटीच्या दिवशी आंघोळीला बुट्टी दिली तर काय बिघडतं?

Image: prsoloraya

सुट्टीच्या दिवशी मुलांना काय करावंसं वाटतं माहितीये का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लौकर उठायचं नाही. म्हणजे कोणीच मुलांना सकाळी लौकर उठवायचं नाही. आम्हाला जाग येईल तेव्हा उठू द्यायचं. दुसरं म्हणजे उठल्या उठल्या “दात घास” असं म्हणून कोणी मागे लागायचं नाही. आम्ही आता मोठे झालोय आणि आपल्याला रोज सकाळी दात घासावेच लागतात हे आम्हाला समजलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे दात घासल्याशिवाय आम्हाला कोणीच काहीच खायला देणार नाही हे आम्हाला माहिती असतं. त्यामुळे आम्ही दात घासणारच असतो. त्यासाठी सकाळी उठल्यापासून रागवायला सुरुवात करायची काहीच गरज नसते. तिसरी गोष्ट म्हणजे नाश्त्याला आणि जेवायला काहीतरी छान केलं तर आम्हाला पाहिजे असतं. पण… या तीन गोष्टींबाबत आमची काही फारशी तक्रार नाहीये. कारण या तीन गोष्टी कधी ना कधी आम्हाला करायला मिळतात. कधीतरी उशिरापर्यंत लोळायला मिळतं. आई तिला जमेल तेव्हा काहीतरी छान खायलापण करते. आणि त्या वासाने आम्ही आपोआप दात घासायला जातोच. आमची तक्रार आहे ती चौथ्या मुद्द्यावर. आणि तो मुद्दा आहे… आंघोळ!

हेही वाचा! 

थांबा… आम्ही उशिरा आंघोळ करण्याबद्दल बोलत नाहीयोत. आम्ही असं विचारतोय की सुट्टीच्या दिवशी आंघोळ करायचीच कशाला? थांबा… असा प्रश्न विचारल्याबद्दल रागवायला सुरुवात करण्याआधी आमचं लॉजिक तर समजून घ्या. आपण सकाळी आंघोळ कशाला करतो? तर आपल्याला शाळेत जायचं असतं. किंवा कुठेतरी बाहेर क्लासला वगैरे जायचं असतं. तिथे आंघोळ न करता कसं जाणार? म्हणून आईबाबा आम्हाला सकाळी आंघोळ करायला सांगतात. पण, सुट्टीच्या दिवशी आम्हाला कुठ्ठेच जायचं नसतं. हो की नाही?

सुट्टीच्या दिवशी आम्ही दिवसभर काय करतो? तर मोठ्यांच्या मते सगळे ‘नाही नाही ते उद्योग’ करतो. म्हणजे काय? तर मित्रमैत्रिणी जमवून गल्लीत / कॉलनीत खेळायला जायचं. त्यात अगदी क्रिकेटपासून ते लपाछपीपर्यंत सगळे खेळ येतात. ते खेळायला आम्हाला मातीत हात पाय घालावेच लागतात. आणि त्यातली भांडणं सोडवतांना मारामाऱ्या होतात, मग तोंडाला माती लागते, केसात माती जाते असं सगळं होतंच.

हे सगळं करत असतांना जेव्हा आम्ही फार आरडाओरडा करतो तेव्हा कोणीतरी मोठी माणसं आम्हाला रागावतात आणि आपापल्या घरी जाऊन शांतपणे खेळायला सांगतात. पण ‘शांतपणे खेळ’ असं काही नसतं हे त्यांनाही माहिती असतं आणि आम्हालाही माहिती असतं. मग आम्ही शहाण्या मुलांसारखे कागद, डिंक, कात्री, रंग असलं सगळं साहित्य काढतो आणि हस्तकलेच्या वस्तू करायला घेतो. त्याला मोठी माणसं कागद नासवणे असं म्हणत असली आणि त्यातून दर वेळेला काहीतरी छान वस्तू तयार होईलच याची खात्री नसली, तरीसुद्धा आम्ही आमच्या परीने काहीतरी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला असतो.

Image: freepik

मग संध्याकाळी आम्ही पुन्हा मैदानात खेळायला जातो. हे सगळं केल्याच्या नंतर संध्याकाळी आमच्या हातापायाला डिंक, कपड्यांना कागदाचे कपटे चिकटलेले, केसात माती, हातापायांवर मातीचे ओघळ असा आमचा अवतार झालेला असतो. आणि त्याला आमचा काहीच इलाज नसतो.

आता प्रश्न असा आहे, की आम्ही जर का दिवसभर असेच कळकट्ट होणार असलो, तर सकाळी आंघोळ कशाला करायची? डायरेक्ट रात्रीच हातपाय धुतले तर काय हरकत आहे? 

आम्हाला सुट्टीच्या दिवशी आंघोळीला सुट्टी देऊन तर बघा, किती आणि कशाकशाची बचत होते ते… पाणी, ते तापवायला लागणारी वीज, आम्हाला आंघोळीला पाठवण्यासाठी खर्च होणारी तुमची ऊर्जा आणि वेळ आणि एवढं सगळं झाल्यावर आम्ही आंघोळीसाठी खर्च केलेली तब्बल ५ मिनिटं!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact