रस्त्यावर उतरुन सायकल चालवण्याचा हक्क मिळवणाऱ्या शहराची गोष्ट

Image: amsterdamcanalcruises

आता सायकल कोणाला आवडते? सगळ्यांना गाडीवर किंवा गाडीतच फिरायला आवडतं. सायकल ही गोष्ट आता जुनी झाली असं आपल्याला वाटतं का? तर असं नाही. जगात असं एक शहर आहे, ज्याचं सायकलवर खूप प्रेम आहे. या शहरातली माणसं जास्तीतजास्त सायकलच वापरतात. मोठी माणसं ऑफिसला जाताना, कुठे फिरायला जाताना, सहलीला जाताना, बाजारहाट करायला जाताना, मुलांना शाळेत सोडवायला, पाळीव कुत्र्यांना फिरवून आणायला सायकलच वापरतात. सायकलवर इतकं प्रेम करणाऱ्या शहराचं नाव आहे ॲमस्टरडॅम. नेदरलॅंड या देशाची राजधानी असलेलं हे शहर. संपूर्ण नेदरलॅंडमध्येच मोठ्या प्रमाणावर सायकली वापरल्या जात असल्या तरी नेदरलॅंडमधील इतर कोणत्याही शहरापेक्षा ॲमस्टरडॅम या शहरात सायकली इतक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात की जगात या शहराची ओळख 'सायकलींची राजधानी' (कॅपिटल ऑफ बाइक्स) अशी आहे. या शहराची सायकलची म्हणून एक गोष्ट आहे. जी १९२० मध्ये सुरु झाली . ही गोष्ट आजही सुरु आहे कारण या शहरातल्या लोकांचं सायकलवरचं प्रेम जराही कमी झालं नाही. उलट ते वाढतच आहे.

हेही वाचा!

इतकंच नाही तर परदेशातली माणसं जेव्हा हे शहर फिरायला येतात तेव्हा ते देखील सायकलच्या प्रेमात पडतात. ॲमस्टरडॅम फिरण्यासाठी बाहेरच्या देशातून आलेले पर्यटक भाड्याने मिळणाऱ्या सायकली घेवून शहरभर फिरतात आणि सायकल चालवण्याचा आणि सायकलवर फिरुन हे सुंदर शहर शांतपणे अनुभवण्याचा आनंद घेतात. ॲमस्टरडॅम या शहराची भौगोलिक रचना आणि तिथलं वातावरणही सायकल वापरण्याच्या दृष्टिकोनातून अनुकुल आहे. ॲमस्टरडॅम शहरात सुरुवातीला लोकं सायकल वापरायला लागले ते ती गाड्यांच्या तुलनेत परवडते म्हणून. सायकल लोकांना परवडत होती नंतर ती आवडू लागली. असं असलं तरी आधुनिकता जशी आली तशा गाड्याही या शहरात यायला लागल्या. गाड्यांच्या तुलनेत सायकलवरचं प्रेम टिकवून ठेवण्याची या शहराची गोष्ट मोठी रंजक आहे. 

ॲमस्टरडॅम शहराची सायकलची गोष्ट

१९२० नंतर ॲमस्टरडॅमधील शहर नियोजनकर्त्यांनी या शहराचा विस्तार करण्याची योजना आखली. ही योजना आखताना त्यांनी सायकलाच मध्यवर्ती धरलं होतं. पण ही योजना प्रत्यक्ष अमलात येण्याआधीच शहरात चारचाकी गाड्यांची संख्या वाढू लागली. १९५० ते १९७०  या काळात ॲमस्टरडॅम शहरात गाड्यांची कोंडी वाढली. गाड्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी रस्ते रुंद करण्याची, वाढवण्याची गरज होती. पण हे शहर म्हणजे कालव्यांच शहर. या शहरात१६५  कालवे आहेत. रस्ते वाढवण्यासाठी कालवे बुजवावे लागणार होते. पण लोकांचं तर कालव्यांवरही खूप प्रेम. ॲमस्टरडॅम शहरातील खूप लोकं असे कालवे बुजवून रस्ते वाढवण्याच्या कल्पनेच्या विरोधात होते. आपलं हे शहर सायकल चालवण्यासाठीच योग्य आहे या विचाराने एकत्र आलेल्या लोकांनी मग रस्त्यावर उतरुन आंदोलन करायला सुरुवात केली.

 Image: santorinidave

शहरात चारचाकी गाड्यांची संख्या वाढल्यापासून या शहरातील लोकांचं जीवन धोक्यात आलं होतं. शहारतल्या लोकांचं रक्षण करायचं असेल तर शहरात लोकांना सायकल चालवता यायलाच हवी, गाड्यांच्या तुलनेत लोकांनी सायकलच वापरायला हवी असं लोक म्हणू लागले. यासाठी जी आंदोलनं सुरु झाली त्यातलं महत्त्वाचं आंदोलन म्हणजे 'स्टाॅप डी किंडरमूर्ड ( मुलांची हत्या थांबवा) हे आंदोलन. चारचाकी गाड्यांची संख्या वाढल्याने शहरात वाहतूक कोंडी तर होत होतीच शिवाय रस्त्यावरील अपघातांची संख्याही वाढली होती. १९७१  मध्ये ३,३००  लोकं गाड्यांची गर्दी होवून झालेल्या अपघात मरण पावली. त्यापैकी ४०० पेक्षा जास्त लहान मुलंच होती. मुलांना शाळेत पाठवणं देखील धोक्याचं झालं होतं. चालणारी माणसं,रस्त्यावर खेळणारी मुलं यांच्यासाठी चारचाकी गाड्यांचा धोका निर्माण झाला होता. तेव्हा स्टाॅप डी किंडरमूर्ड या आंदोलनाच्या आंदोलकांनी अनोखं आंदोलन सुरु केलं. ते रस्त्यावर टेबल आडवे ठेवून रस्ता अडवायचे. रस्त्यावर खेळणे म्हणजे मुलांचा मृत्यू यासारख्या घोषणा देवून त्यांनी जास्तीत जास्त लोकांना या मोहिमेत सामील करुन घेतलं होतं.  

हे आंदोलन सुरु असतानाच फिस्टर्स बाॅण्ड या सायकल चालवणाऱ्यांच्या युनियनने सायकल चालवणाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ३०,००० पेक्षा जास्त सदस्य मिळवले. आंदोलनं सुरुच होती. लोकं रस्त्यावर उतरून सायकली चालवत, सायकली उभ्या करुन निदर्शनं करत होते. रात्री रस्ते रंगवत होते. पोलिस अटक करत होते. पण चळवळीतले लोक मागे हटले नाहीत. लोकं लढले आणि त्यांनी त्यांच्या मनातील नियोजनही मांडलं. 

आंदोलकांना शहरातले कलाकर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मोट्या लोकांनी पाठिंबा दिला. त्यांनी सायकलसाठी शहर तयार करा या आंदोलनाच्या उद्देशाला पाठिंबा दिला.

Image: dutchnews.nl

त्या काळात शहरात पेट्रोलची समस्याही होती. त्यावर उपाय म्हणून पेट्रोलची बचत व्हावी म्हणून डच सरकारने 'कार फ्री संडे' सुरु केला होता. त्याच काळात आणखी एक महत्वाची चळवळ झाली ती म्हणजे 'व्हाइट बायसिकल प्लॅन' ही चळवळ प्रोव्हो गटाने चालवली.सार्वजनिक वाहतुकीसाठीही सायकलचा वापर ही बाब लोकांच्या मनावर बिंबावी यासाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी ५० सायकली रस्त्यावर चालवण्यासाठी आणल्या गेल्या.

सायकलीच्या दृष्टिकोनातून मग नियोजनकर्त्यांनी शहराच्या पुर्नरचनेचा विचार करायला सुरुवात केली. सायकली चालवण्यास अडथळा ठरणाऱ्या शहरातल्या ३०० गोष्टी शोधून काढल्या. हे अडथळे दूर करण्यासाठी उपाय शोधले गेलेत.

हेही वाचा!

आंदोलनांमुळे राजकारणी लोकांवर, नेत्यांवर प्रभाव पडला. दबाव वाढला. तेव्हा १९७८मधल्या शहरातल्या स्थानिक निवडणुकाही सायकलच्या दृष्टिकोनातून शहराच्ं नियोजन याच मुद्यावर लढवल्या गेल्या. नेत्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करुन शहारचं नियोजन केलं आणि ॲमस्टरडॅम हे शहर सायकल चालवणाऱ्यांसाठी सोयिस्कर आणि सुरक्षित करण्यात आलं.

ॲमस्टरडॅम शहरातला प्रत्येक रस्ता सायकल चालवणाऱ्यांसाठी सुरक्षित केला गेला. खास सायकल चालवण्यासाठीचे सायकल पथ तयार केले गेले. सायकलसाठी शहरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली गेली. हे सर्व होताना सायकलसाठी प्रचार करणाऱ्यांचं यावर लक्ष होतं.

चारचाकी नको पण मोपेड चालवता येतील म्हणून रस्त्यांवर दुचाकी गाड्या आल्या. पुन्हा शहरातील लोकांची सुरक्षा धोक्यात आली. तेव्हा लोकं पुन्हा सुरक्षेबाबत चिंतीत झाले. संतप्त झाले. त्यासाठी पुन्हा १० वर्षं प्रयत्न करावे लागले.

ॲमस्टरडॅम हे सायकलचं शहर झालं, हे अशा प्रकारे एका रात्रीत झालं नाही. त्यासाठी लोकांना सतत आंदोलनं करावी लागली. आजही या शहरातले नागरिक  बाइक सिटी ही आपल्या शहराची ओळख टिकवण्यासाठी जागरुक आहेत.  

पण आता ॲमस्टरडॅम शहरात सायकलींची संख्या इतकी वाढली आहे आता सायकलींमुळे शहरात कोंडी व्हायला लागली आहे. आज या शहराची जितकी मूळ लोकसंख्या आहे त्यापेक्षा आधिक सायकलींची संख्या आहे. शहराची लोकसंंख्या ७, ८०, ५५९( सात लाख ऐंशी हजार पाचशे ऐकोणसाठ) आहे तर सायकलींची संख्या मात्र ८,८१,००० ( आठ लाख ऐक्यांशी हजार) इतकी आहे.

Image: travelmamas

शहराच्या भौगोलिक रचना, शहराचं ऐतिहासिक महत्त्व आणि नागरिकांची सुरक्षा हे सर्व लक्षात घेवून सायकलीचा पर्याय निवडणारे ॲमस्टरडॅम हे जगातलं एकमेव शहर आहे. सायकलीचा पर्याय निवडायला धैर्य लागातं. ते धैर्य ॲमस्टरडॅमने दाखवलं म्हणून आज जगात या देशाची एक वेगळी ओळख आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact