दुपारचा खाऊ चला, आज तुमचा तुम्हीच बनवून घ्या पटापट!

  

image : the exploring family

चार वाजता भूक लागते आणि मग आपण आईचं डोकं खातो. त्यापेक्षा आता स्वत:च्या हातानी बनवलेला खाऊ खाऊया. 

आईबाबांनी घरात बिस्किटं आणून ठेवली असतील. ती शोधा. चीज, टोमॅटो, काकडी असे पदार्थ घरात असतातच! ते सापडले की लागा कामाला. 

साहित्य: 

खाऱ्या चवीची कुठलीही बिस्किटं, चीज स्लाईस किंवा किसलेलं चीज, टोमॅटो-काकडीचे गोल काप, मीठ, मिरपूड, कॉर्नचे दाणे 

 

 

हेही वाचा!

तुमच्या कुठल्या डोळ्याचं तुम्ही जास्त ऐकता? शोधून पाहा!

कृती: 

१) एका रिकाम्या प्लेटमध्ये एक खारं बिस्कीट ठेवा. 

२) त्यावर त्या बिस्किटाच्या आकाराचा कापलेला चीज स्लाइसचा तुकडा ठेवा.

३) समजा चीज किसलेलं असेल तर थोडा किस पसरावा. 

४) त्यावर मिरपूड भुरभुरवा. 

image : iStock

५) त्यावर टोमॅटोची फोड ठेवा.  मीठ टाका. 

६) काकडी आणि वर कॉर्नचे एकदोन दाणे. 

७) तुमचा मधल्या वेळचा टेस्टी खाऊ तयार आहे.  आता गोड बिस्किटांवर काय काय चांगलं लागेल विचार करा बरं?

आता अजून एक गंमत करा, तुम्ही तयार केलेला खाऊ आईला द्या. कधीतरी मुलांनी केलेला खाऊ खायला तिला नक्की मजा वाटेल. त्याबद्दल ती तुमचं कौतुकही करेल. पण सगळ्यात शेवटचं काम विसरायचं नाही. ते म्हणजे हा खाऊ तयार करतांना आपण केलेला सगळा पसारा आवरून टाकायचा. म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला स्वयंपाकघरात नक्की लुडबूड करायला मिळेल.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 9112050500

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact