कानाला सतत हेडफोन लावल्यानं बॅक्टेरिया कान पोखरतात का?

 Image: .freepik

जी पण गोष्ट करायची ती स्टाइलमध्ये. आता म्युझिक ऐकायचंच उदाहरण घ्या ना.. रेडिओवरपण गाणी लागतात. पण बाजूला रेडिओ लावलाय आणि आपण गाणी ऐकतोय असं आता होत नाही. आपल्याला मोबाइलमध्ये गाणी ऐकायची सवय असते. शिवाय ती ऐकताना आता  कानात हेडफोन्स लागतात. कधी कधी आपल्याला आवडणारं म्युझिक  म्हणजे आई बाबांच्या दृष्टीने नुसता धांगडधिंगा असतो. मग वैतागून तेच आपल्याला म्हणतात, ' तो हेडफोन लावून गाणी ऐक'. त्यामुळे आता हेडफोन , इयरफोन ही आपल्यासाठी महत्वाची ॲक्सेसरी झाली आहे. पण कानाला हेडफोन लावून गाणी ऐकल्याने कानात जिवाणुंची संख्या वाढते, हे माहिती आहे का तुम्हाला?

हे वाचा!

आता तुम्ही म्हणाल हेडफोन, म्युझिक यामध्ये जिवाणू आले कुठून? हेडफोनमुळे किती स्पष्ट आवाज येतो, शिवाय आपल्या आवडीची गाणी ऐकताना बाहेरच्या आवाजाचा अडथळा येत नाही. मग हे कानात जिवाणू वाढण्याचा काय संबंध आहे?

हेडफोन वापरल्याने कानात जिवाणुंची संख्या वाढते, हे सांगितलं तर कुणालाच खरं वाटत नाही. पण हे खरं आहे. अभ्यासकांनी यासंबंधीचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. कानाला हेडफोन लावल्याने असं काय होतं की, ज्यामुळे कानातल्या जिवाणुंची संख्या वाढते हे समजून घेणं आवश्यक आहे.

हेडफोन आणि जिवाणुंचा काय संबंध ?

अभ्यासक म्हणतात की, कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणं यात वाईट काही नाही. पण हेडफोन्स आपण किती वेळ वापरतो, कोणते हेडफोन्स वापरतो , कसे वापरतो यावर हेडफोनमुळे कानांवर होणारे दुष्परिणाम अवलंबून असतात. हेडफोन वापरल्याने कानात एका तासात ७०० टक्के जिवाणुंची निर्मिती होते ही बाब थाप नसून खरी आहे. आपल्या कानाची रचना बघता इतक्या मोठ्या प्रमाणात जिवाणुंची संख्या वाढल्यास कान ते सहन करु शकत नाही. आपण जर रोजच तासनतास कानाला हेडफोन लावून म्युझिक ऐकत असू किंवा एखादा कार्यक्रम पाहत असू तर त्याचा परिणाम कानावर होणारच. मग त्यामुळे कान दुखणे, कमी ऐकू येणे यासारखे त्रासही उद्भवतात.

हेडफोन बनवताना जी सामग्री वापरली जाते, त्यात प्लॅस्टिक, लेदर यांचा वापर केलेला असतो. या गोष्टींवर धूळ , घाण जमा होते. हेडफोन वापरताना त्यावर बसलेली धूळ , घाण स्वच्छ न करताच ते कानाला लावले तर ते कानात जावून कानातल्या जिवाणुंची संख्या वाढते. कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

 Image: sonampatelcse

कानाला हेडफोन लावल्यावर कानाच्या तापमानात बदल होतो. हेडफोनमुळे नैसर्गिक हवा कानात जाण्यास अडथळा निर्माण होतो. बाहेरील हवा कानात जावू शकत नसल्याने कानाचं तापमान वाढतं. कानाचं हे वाढलेलं तापमान जिवाणुंच्या निर्मितीसाठी पोषक असतं. त्यामुळे कानाला हेडफोन लावले की कानात जिवाणुंची संख्या वाढते.

घरात बरेचदा एकच हेडफोन असतो. तोच हेडफोन घरातल्या सर्व व्यक्ती वापरतात. यातूनही कानात जंतूचा संसर्ग होतो. म्हणून अभ्यासक इतरांचा हेडफोन आपण वापरताना तो स्वच्छ करुन घेणे, निर्जंतुक करणे या गोष्टींना महत्व देतात. शिवाय आपले किंवा इतर कोणाचे कान स्वच्छ नसले तर एका व्यक्तिच्या कानातले जंतू दुसऱ्या व्यक्तीच्या कानात प्रवेश करतात. यामुळे संसर्ग होवून त्याचा परिणाम कानावर होतो. हेडफोन जास्त वापरल्याने केवळ कानात जिवाणुंची संख्याच वाढते असं नाही तर 'व्हर्टिगो' हा आजारही जडतो.

हेडफोन वापरण्याचा ६०-६०-९० नियम 

हेडफोन वापरताना ऑस्ट्रेलियन हिअरिंग हब यांनी कानाचं आरोग्य जपणारा ६०-६०-९० हा सांगितलेला नियम नीट समजावून घेणं आवश्यक आहे. या हबमधील अभ्यासकांच्या मते कानाला हेडफोन लावून काही ऐकताना तो आवाज ६०टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. एका वेळी ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ कानाला हेडफोन लावून ऐकू नये.. आणि दिवसभरात हेडफोनचा वापर हा ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ नसावा. ६०-६०-९०चा नियम काटेकोरपणे पाळून हेडफोन वापरण्याची काळजी घेण्याचा सल्ला येथील अभ्यासक देतात. आता हेडफोन लावून गाणी ऐकताना फक्त कम्फर्ट आणि स्टाइलचाच विचार नको करायला, कानात जिवाणुंची संख्या वाढणार नाही, याची काळजीही यापुढे घ्यावी लागणार आहे. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact