
Image: globalindian
आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी घडतात. पण आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपण तर अजून लहानच आहोत मग आपण काय करणार, हे तर मोठ्यांचं काम असा विचार करुन सोडून देतो. पण करिना सॅम्युअलने मात्र असा विचार केला नाही. करिना सॅम्युअल ही भारतीय अमेरिकन मुलगी. ती अमेरिकेत राहाते. लहानपणापासून हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंजबद्दल ती ऐकत होती. नुसतंच ऐकत नव्हती तर हवामान बदलाचे परिणामही ती पाहात होती, अनुभवत होती. सतत येणारे पूर, मोठी वादळं हा तर हवामान बदलाचाच परिणाम. सतत मोठे पूर येवून समुद्रातील कोरल रीफ (समुद्रातील प्रवाळ) धोक्यात येत आहे. त्याचा समुद्रातील जीवसृष्टीवर परिणाम होतोय. तसेच पूर, वादळं यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांवर त्याचा वाईट परिणाम होतोय. या लोकांना हवामान बदलाबद्दल जास्त माहिती नाही पण त्याचे वाईट परिणाम मात्र या गरीब लोकांच्या वाट्यालाच जास्त. पण त्यांना त्याबाबत काही बोलताच येत नाही. नैसर्गिक आपत्तींमुळे गरीब श्रीमंत असा भेद निर्माण होत आहे. या सर्व गोष्टी शाळेत जाणाऱ्या पण आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल फारच जागरुक असणाऱ्या करिनाला कळत होत्या. पर्यावरणासाठी, पर्यावरण रक्षण, हवामान बदल याबाबत लोकांना माहिती देण्यासाठी आपण काम करायला हवं असं तिला वाटू लागलं.
हेही वाचा!
हवामान बदल आणि प्लॅस्टिकचा वापर यात जवळचा संबंध आहे. लोकांना प्लॅस्टिक वापरण्यापासून परावृत्त करायला हवं असं तिला वाटू लागलं. यातूनच एक मोहीम उभारण्याची कल्पना तिला सूचली. तेव्हा करिना १४ वर्षांची होती. २०१९ मध्ये तिने 'फ्लोरिडा चॅप्टर ऑफ बाय बाय प्लॅस्टिक बॅग्ज ' नावाची मोहीम सुरु केली. ही मोहीम खरंतर इंडोनेशियातील बाली येथील. पण पर्यावरण वाचवण्यासाठी जगभरात ती त्या त्या भागात लोकांनी सुरु केली. ही मोहीम करिनाने फ्लोरिडा येथे सुरु केली.
हेही वाचा!
मोहीम ही एका व्यक्तीच्या बळावर कशी पुढे जाणार, त्यासाठी कार्यकर्ते लागणारच. करिना शाळाशाळांमध्ये जावून फ्लोरिडा चॅप्टर ऑफ बाय बाय प्लॅस्टिक बॅग्ज, क्लायमेट चेंज, फ्लोरिडा समुद्र किनाऱ्यावरील घाण, फ्लोरिडा किनारा स्वच्छता मोहीम, आपण काय करु शकतो अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलायची. तिने शाळाशाळांमधील मुलांना आपल्या या मोहिमेत भाग घेण्यासाठी आवाहन केलं. करिना मुलांशी जे बोलायची त्याचा परिणाम होवून मियामी, टाम्पा येथील अनेक शाळकरी मुलं , त्या भागातील तरुण मुलं मुली करिनासोबत चळवळीत सहभागी झालेत. करिनाने फ्लोरिडा चॅप्टर ऑफ बाय बाय प्लॅस्टिक बॅग्ज या मोहिमेसाठी १००० कार्यकर्त्यांना प्रवृत्त केलं आणि आपल्या सोबत सहभागी केलं.
करिना आणि तिच्या सोबतचे कार्यकर्ते दर आठवड्याला फ्लोरिडा समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी जातात. समुद्र किनारा स्वच्छ करताना त्यांना प्लॅस्टिक बॅग्ज, प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन्स सापडतात. हा कचरा गोळा करुन लोकांना प्लॅस्टिक बॅग्ज न वापरण्याचं आवाहन करतात, याबाबत लोकांशी बोलतात. याचा परिणाम होवून अनेक लोकांनी एका वेळी एकच प्लॅस्टिक बॅग वापरण्याचं ठरवलं आहे.

Image:bowseat
हेही वाचा!
करिना आणि तिच्या सहकारी कार्यकर्त्यांनी मिळून आपल्या कामातून, लोकांशी संवाद साधून १०,००० डाॅलर्सचा निधी जमा करुन तो पर्यावरणावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांना देणगी म्हणून दिला. करिना सॅम्युअल फ्लोरिडा चॅप्टर ऑफ बाय बाय प्लॅस्टिक बॅग्ज' मोहिमेची अध्यक्ष आहे. आपलं शिक्षण, अभ्यास आणि छंद सांभाळून ती तिच्या मोहिमेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधते, कामांची आखणी करते, लोकांना हवामान बदल आणि पर्यावरण रक्षण विषयावर जागृत करण्यासाठी 'ग्रीन झीन' या मॅग्झिनमध्ये लेख लिहिते, फ्लोरिडा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छतेची मोहिम राबवते, शाळाशाळांमध्ये जावून मुलांशी बोलून नवीन कार्यकर्ते तयार करण्याचं कामही ती जोमाने करत आहे. स्वच्छ समुद्र किनारा हे तिचं स्वप्न आहे. आपण जेव्हा समुद्र किनारा स्वच्छ करण्याचं काम करतो तेव्हा आपल्याला खूप आनंद आणि समाधान मिळतं असं करिना म्हणते.
करिनाची प्रेरणा घेवून आपणही जिथे राहातो तो भाग प्लॅस्टिकमुक्त व्हावा यासाठी काम करायचं का? तुम्हाला काय वाटतं, ते मला नक्की सांगा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact