
Image: savethatass.org
गाढवाला वेगानं पळता येतं, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? उलट तुम्ही वेगानं पळायला गाढव काय घोडा आहे का? असा प्रश्न विचारुन हसाल. पण भारतातील वाइल्ड ॲस नावाचा हा प्राणी वेगानं पळणाऱ्या प्राण्यांच्या यादीत गणला जातो. भारताच्या पश्चिम प्रदेशातील वाळवंटात आढळणारा हा वाइल्ड ॲस. याला वन्य गाढव म्हणूनही ओळखलं जातं. नावाने गाढव असला , तरी रुपाने खरोखरच देखणा असलेला हा प्राणी घोड्याच्या कुळातला आहे. तांबूस, भुऱ्या रंगाचा आणि मानेवर गडद तपकिरी रंगाची लहानशी आयाळ मिरवणारा हा प्राणी फक्त सोळाव्या वर्षीच नव्हे तर कायम सुंदरच दिसतो. खुर किंवा घुडखुर या स्थानिक नावाने ओळखला जाणारा हा प्राणी भारतातील वेगवान प्राणी म्हणून ओळखला जातो. ताशी ७० ते ८० किमी या वेगाने तो पळू शकतो.
हेही वाचा
एके काळी भारताच्या पश्चिमेतील गुजरातमधील रणच्या वाळवंटापासून ते पाकिस्तान ( सिंध, बलुचिस्तान), अफगाणिस्तान आणि इराणचा आग्नेय भाग इथपर्यंत ही गाढवे पाहायला मिळायची. मात्र, आता फक्त लिटल रण ऑफ कच्छच्या वाळवंटातच आढळतात. आफ्रिकन वाइल्ड ॲस प्रजातीपेक्षा भारतीय वाइल्ड ॲस वेगळे आहेत. २०ते २५ वर्षं त्यांचं आयुष्य असतं.
अतिशय कोरड्या वातावरणातही हे वाइल्ड ॲस सहज राहू शकतात. कारण हे वन्य गाढव हे एशियाटिक वाइल्ड ॲसची उप प्रजाती आहे. या प्रजाती सौदी अरेबिया, इराक, जाॅर्डन, इस्त्राएल, सीरिया, अफगाणिस्तान येथील वाळवंटात भटकत असे. त्यामुळे उन्हाळ्यात वाळवंटात पाणी मिळणं कठीण असतानाही ते जगतात. तग धरुन राहातात.

Image : thenewsminute
या वाइल्ड ॲसचं जवळून निरिक्षण करावंसं वाटलं तरी ते करता येणं शक्य नाही. कारण स्वभावानं अतिशय लाजरा असा हा प्राणी घाबरला तर धूम ठोकतो. आणि क्षणाधार्त दिसेनासा होतो. या वेगामुळेच पूर्वी राजा महाराजांना, ब्रिटिश वसाहतीतील शिकाऱ्यांना त्यांची शिकार करता आली नाही. पण साथीच्या रोगाचा फैलाव झाल्यामुळे, खाद्य नसलेल्या 'विलायती बाभळीचा' प्रसार झाल्याने आणि मिठासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर माणसाचे आक्रमण झाल्याने त्यांची संख्या १९६० साली फक्त ३६२ झाली होती होती, मात्र वेळीच खबरदारी घेऊन संवर्धनाचे उपाय योजल्याने आता कच्छच्या रणात २०२० च्या गणनेनुसार ६,०८२ वाइल्ड ॲस असल्याचे समजले. कच्छच्या रणाशिवाय वाइल्ड ॲसने अवती भवतीच्या प्रदेशातही बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. अहमदाबादजवळच्या नल सरोवर परिसरात, तसेच राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातही वाइल्ड ॲस आढळून आले आहेत.

Image: animals.sandiegozoo
पावसाळा हा वाइल्ड ॲसचा प्रजननाचा काळ आहे. या काळात माजावर आलेली मादी कळपापासून वेगळी होऊन नराबरोबर राहते. गाभण झाल्यावर पुन्हा कळपात येऊन मिसळते. त्यांचा गर्भधारणा कालावधी ११ महिन्यांचा असतो. एकावेळी एक पिल्लू जन्माला येतं. थरच्या वाळवंटातील वाइल्ड ॲसचा भाइबंद लडाखच्य शीत वाळवंटातही आढळतो. त्याला 'कियांग तिबेटियन वाइल्ड ॲस' म्हणतात.
- मकरंद जोशी
( लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत.)
makarandvj@gmail.com
Image Credit : Google
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact