कशाला हवं अवांतर वाचन?

मला वाचायला आवडत नाही. सुटीत मी काहीच वाचत नाही यावरुन मला खूप बोलणी बसतात. तू वाचत नाही, तुझं आयुष्यात पुढे काही खरं नाही म्हणतात. अवांतर वाचन खरंच एवढं महत्त्वाचं आहे का? - अन्वय, परभणी.

Image - Freepik

  • अवांतर वाचन खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या जगात नक्की काय काय चाललंय हे आपल्याला कळतं. तू पुस्तकी किडा हा शब्द ऐकलायस का? पुस्तकी किडा म्हणजे ज्याला शाळेच्या पुस्तकांमध्ये लिहिलेल्या बाहेरचं काहीही माहिती नसतं तो… आपण असा पुस्तकी किडा व्हायचं नसेल तर आपण वाचायला हवं.
  • अवांतर वाचनाची सुरुवात तू घरी येणारा रोजचा पेपर वाचून करु शकतोस. अवांतर वाचनातून आपल्याला नवनवीन शब्द कळतात. असे शब्द माहिती होण्याची, मग त्यांचा वापर करुन बघण्याची आणि तो वापर जमला की भारी वाटण्याची मज्जा वेगळीच असते… ती मज्जा तुला अनुभवायची असेल तर तुला वाचनापासून सुरुवात करायला लागेल ना पण?
  • तुझ्या शाळेत लायब्ररी असेल ना? लायब्ररीत एका पेक्षा एक मस्त पुस्तकं असतील… ती वाचली आहेस का तू? लायब्ररीत गेला आहेस का? कधीतरी जाऊन बघ… तिथली काही पुस्तकं चाळलीस की तुला एखादं पुस्तक नक्की आवडेल आणि वाचावंसं वाटेल. असं करत करत तुला वाचनाची गोडी लागेल.
  • सुट्टीचं पान तर तू रोज वाचतोसच, हो ना? या सुट्टीच्या पानावर आम्ही तुम्हा मुलांसाठी ‘काय वाचा’ हा कॉलम लिहिला होता! त्यातली पुस्तकं तुझ्या आत्ताच्या वयाला वाचण्यासाठी एकदम पर्फेक्ट आहेत. सुरुवात तर कर… मग तुझ्या मित्रमैत्रिणींना तूच सांगशील कुठलं पुस्तक वाचायचं ते! बघ ट्राई करुन, मज्जा येईल तुला!