
किशोर वयातील मुला मुलींच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. या वयात मनात येणारे आत्महत्येचे विचार काढून टाकण्यासाठी काय करावे?
- एक विद्यार्थिनी
- लहान मुलं, वयात येणारी मुलं मुली यांना कसलाही ताण नसतो. ते काय मस्त मजेत जगत असतात, त्यांना कसलं आलंय टेन्शन असा समज प्रौढ माणसांचा असतो. पण या वयातली मुलं जेव्हा आत्महत्या करण्याचं पाऊल उचलतात, त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिध्द होतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. इतक्या कमी वयातली मुलं, शिकणं, खेळणं, छंद, मैत्री, जगणं अनुभवणं यातला आनंद सोडून आत्महत्या का करत असतील असा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक आहे. या प्रश्नाच एकच्ज एक उत्तर नाही. पण उत्तरच नाही असंही नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हा प्रश्न सोडवण्याचा मार्गही आहे. एकटेपणाची भावना, राग, दु:ख यामुळे आत्महत्येचा टोकाचा विचार मनात येतो. पण प्रयत्न केल्यास या विचारावर सहज मात करता येते.
- सर्वात आधी असे विचार मनात आल्यावर ते मनातच न ठेवता त्याबाबतीत कोणाशीतरी बोलायला हवं. घरात, मित्रमैत्रिणींमध्ये जे कोणी आपल्याला विश्वासू आणि जवळचे वाटतात त्यांच्याजवळ आपण आपल्या मनातील विचार, भावना व्यक्त करायला हव्यात.
- वाईटच घडणार, आपल्याच बाबतीत असं का होतं?, आपल्याला हे शक्य नाही यासारखे नकारात्मक विचार न करता सगळं चांगलं होईल ,आपण एकटे नाही, आपल्याला जमेल, आपल्याला मदत मिळेल असा विचार करण्याची स्वत:ला सवय लावावी.
- आत्महत्येचे विचार मनातून काढून टाकायला मदत करणाऱ्या अनेक हेल्पलाइन असतात. त्यावर बोलूनही आपण अशा विचारांपासून स्वत:ची सुटका करुन घेऊ शकतो.
- मन आनंदी राहण्यासाठी मैत्री करावी, भरपूर गप्पा माराव्यात, मन ज्यात गुंतेल, रमेल अशा गोष्टी कराव्यात. खेळावं, चित्र काढावी, गाणी ऐकावी, गाण, नृत्यं शिकावं.
- आपल्याला कसला राग येतो, काय झालं की दु:ख होतं, मूड जातो या कारणांचा शोध घ्यावा. स्वत:ला ते जमत नसेल तर घरातली मोठी माणसं किंवा डाॅक्टर, समुपदेशक यांची मदत घ्यावी.
- कितीही वाईट प्रसंग आपल्यावर आला असला तरी अशा प्रसंगाला तोंड देणारे आपण जगातले एकमेव नाही हे लक्षात ठेवावं. अनेकांवर वाईट प्रसंग येतात, ते यातून मार्ग काढून पुढे जातात. आपल्याबाबतीतही असंच होईल असा विचार कायम करावा.
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


