– डाॅ. श्रुती पानसे

आता परीक्षेचे अगदी थोडेच दिवस राहिलेले असताना हा प्रश्न मनात का बर यावा? पण हा प्रश्न बहुतेकांच्या मनात येतो की घरातली मोठी माणसं बाहेर फिरताहेत, त्यांची त्यांची कामं करतायेत आणि आपण एकटेच इथे अभ्यास करतोय. बाकी सगळ्यांना टीव्ही बघायला, मित्र मैत्रिणींबरोबर खेळायला जायला, मोबाईलवर गेम खेळायला, फिरायला जायला, सगळं करायला परवानगी आहे. फक्त आपणच हे काहीही करायचं नाही. असे त्रास देणारे विचार सारखे सारखे मनामध्ये येत असतात. अशा वेळी अभ्यास म्हणजे अगदी शत्रू वाटायला लागतो. कधी एकदा या परीक्षेपासून सुटका होते आहे, यांची आपण वाट बघायला लागतो. बाकी लोकांकडे बघून हा त्रास अजूनच वाढतो.
पण जर नीट विचार केला तर लक्षात येईल की मोठ्या माणसांच्या वागण्याची एकच बाजू आपल्याला दिसते. वास्तविक आपले आई-बाबा किंवा इतर मोठी माणसं सुद्धा काम करत असतात. ते काम ते खरंच किती आनंदाने करत असतात, उत्साहाने करतात की नको असताना करतात, हे आपल्याला माहितीही नाही.
हेही वाचा!
केवळ पाठांतर करुन पेपर सोडवता? ऐनवेळी काही आठवलंच नाही तर?
आपल्याला वाटतं की ते मज्जा करतात, पण खरं म्हणजे ते मज्जा नाही तर काम करत असतात. यासाठी एक गोष्ट लक्षात घेऊया की जेव्हा ही मोठी माणसं आपल्या वयाची होती तेव्हा त्यांनीसुद्धा असंच मान मोडून अभ्यास केलेला आहे. आई-बाबा लहान असताना त्यांनी अशाच परीक्षा दिल्या आहेत.
त्यामुळे आपण अजून लहान आहोत तर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपण जितका छान अभ्यास करू, जितक्या उत्साहाने अभ्यास करू, त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला छान मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे बाकी सर्वजण मजेत आणि आपण नाही ही हे मनातून बाहेर काढलं पाहिजे.
याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता फारच थोडे दिवस परीक्षेचे राहिलेले आहेत. तेवढे दिवस संपले की आपल्यालाही मोठी सुट्टी लागणार आहे. त्या वेळेला आपल्याला जे हवं ते आपल्याला करता येणार आहे. सुट्टीत काय करायचं हे आता ठरत आलेलं असेल. कुठल्या सहलीला जायचं, कुठल्या शिबिराला जायचं, खेळायला जायचं, नवं काय शिकायचं, हे सगळं आपल्याही बाबतीत होणार आहेत, परंतु त्यासाठी थोडा संयम दाखवावा लागेल.
कितीही कंटाळा आला तरीसुद्धा उत्साहाने अभ्यास करावा लागेल. शांतपणाने अभ्यास करत राहिलो तर त्याचा फळ हे आई-बाबांना किंवा इतर कोणालाही नाही, तर ते आपल्यालाच मिळणार आहे.
( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)
shruti.akrodcourses@gmail.com


