स्वयंपाकाच्या आधी पूर्वतयारी गरजेची. ती कशी करायची?

स्वयंपाकघरातली लुडबुड

-वैभव भाल्डे

Image: freepik

तुमच्या शाळेत अचानक छोटीशी टेस्ट किंवा चाचणी परीक्षा घेतात का रे? असते जेमतेम दहा मार्कांची पण तारांबळ उडते नं? का असं होतं विचार केलाय का? कारण आपली पूर्वतयारी नसते, बरोबर नं? तर ह्या पूर्वतयारीला कुठेही जा फार महत्व असतं बरं. रात्रीची जेवणं झाली तरी आई बरेचदा किचनमध्ये बिझी असते नं, ती या पूर्वतयारी साठीच!! उद्या सकाळचा नाष्टा किंवा भाजी काय आहे यावर ही तयारी अवलंबून असते. कधी कडधान्य भिजत घाल तर कधी साबुदाणा. कधी एखाद्या निवडायला किचकट वा वेळखाऊ भाज्या निवडून ठेव अश्या अनेक गोष्टी अव्याहत सुरु असतात, म्हणून तर तुम्ही वेळच्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकता.

एकदा काय बनवायचं आहे हे नियोजन म्हणजे प्लांनिंग झालं नं की पूर्वतयारी म्हणजे प्रेपरेशन सोपी जाते बरं. एकदम सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यातर दमायला होतं, कंटाळाही येऊ शकतो नी धांदल उडते ती वेगळीच. आज दुपारी सर्वांना लिंबू सरबत पाजून खूष करायचे ठरवताय का? मग सर्वात आधी बघा लागणारं साहित्य घरात उपलब्ध आहे नं.. साखर मीठ पाणी तर असतंच पण ताजी रसाळ लिंब असल्याची खात्री करणे, नसली तर आणून घेणे म्हणजे पूर्वतयारी. आधी कधी तुम्ही सरबत बनवलं असेल तर लागणाऱ्या वेळेचा अंदाज घेऊन त्यानुसार वेळेचे नियोजन हेही फार महत्वाचे. आई आजी झोपलेल्या असताना खुडबूड केलीत तरी ओरडा बसेल नी वेळेवर वाट बघायला लावली तरीही मोठी मंडळी रागावू शकतात, नाही का? पण आपण हे सगळं शिकतोय नी आणखीन शहाणं होतोय, ते रागवून घ्यायला नाही तर शाब्बासकी मिळवायला!!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact