
तुला आता पुढच्या वर्षी हाॅस्टेलमधेच टाकतो बघ. तिथे गेल्यानंतरच तुला समजेल आम्ही काय् सांगतो ते!' अशी धमकी मला आई बाबा सारखी देतात. मला फार टेन्शन येतं त्याचं,आई बाबांना हे समजत कसं नाही?
- विदित , कोल्हापूर
- आई बाबा तुला हाॅस्टेलला टाकू असं म्हणतात हे तू सांगितलंस. पण ते असं का म्हणतात हे नाही सांगितलंस. सांगू नकोस पण याचा विचार तरी तू केला आहेस का?
- कोणत्याच आई बाबांना आपलं मूल लांब जायला नको असतं. एवढ्या लहान वयात तर ते कोणा जवळच्या नातेवाईकाकडेदेखील मुलांना एकट्याने सोडत नाही. तुला ते जेव्हा ' हाॅस्टेलला टाकू' असं म्हणतात तेव्हा ते खूप आनंदाने म्हणतात असं मुळीच नाही. पण त्यांना हे बोलणं भाग पडतं. याचं कारण तुझ्या वागण्यात आहे का? याचा विचार तू करायला हवास.
- आई बाबा मुलांचे लाड करतात, त्यांना हवं नको ते सर्व बघतात पण हे करताना आपल्या मुलांना चांगलं वळण लागावं यासाठीही त्यांची धडपड सुरुच असते. तुला चांगली शिस्त लागावी यासाठी तुझे आई बाबा तुला वेळोवेळी काही सांगत असतील. पण तू जर त्यांनी प्रेमाने सांगितलेलं ऐकतच नसशील तर त्यांना तुला रागावण्याशिवाय पर्यायच नसतो.
- मुलांना आई वडिलांना सोडून एकट्याने राहण्याची भीती वाटते. हे आई वडिलांनाही चांगलं माहित असतं. हाॅस्टेलमधील कडक शिस्तीबद्दल घरात कधी ना कधी बोललं गेलंच असेल. त्याची तुला भीती वाटलेली असणार हेही त्यांना समजलेलं असणार. मग तू बऱ्या बोलानं त्यांचं ऐकत नसल्याचं पाहून ते तुला हाॅस्टेलला घालण्याचा धाक दाखवत असतील. किमान या धाकाने तरी तुझ्यावर चांगला परिणाम होईल असं त्यांना वाटत असावं.
- जर तुला खरोखर हाॅस्टेलला जायची एवढी भीती वाटत असेल तर आई बाबा जे सांगत आहेत ते समजून घे. तसं वागण्याचा प्रयत्न कर. त्यात काही अडचणी येत असतील तर त्याबद्दल आई बाबांशी बोल, त्यांची मदत घे. किमान यामुळे आपण सांगितलेल्या गोष्टींवर तू प्रयत्न करत आहेस हे तरी त्यांना दिसेल.
- चांगल्या सवयी, शिस्त हे पुढे जाऊन मोठं होताना तुझ्याच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपल्या अंगी कशा बाणवता येतील यासाठी प्रयत्न कर.
- कधीतरी तू चुकणार, हट्ट करणार हे आई बाबांना माहिती असतं आणि त्यासाठी ते तयारही असतात. पण सांगितलेली कोणतीही गोष्ट तू ऐकतच नसशील तर त्यांनाही ओरडण्याशिवाय, धाक दाखवण्याशिवाय पर्याय राहात नसणार . त्यामुळे आई बाबा कसं सांगतात हे न बघता काय सांगतात ते बघ, त्यावर काम कर. तुलाच काही दिवसांनी हाॅस्टेलला टाकण्याच्या धमक्या ऐकू येणार नाहीत.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


