मला यूट्यूबवर व्हिडीओ का करु देत नाही?

Image: freepik

मी पाचवीत आहे. आई बाबांचा फोन घेऊन मला यूट्यूब व्हिडीओ करायचे आहेत. पण आई बाबा करुच देत नाही. सारखं तुझं हे वय नाही म्हणतात. वयाचा आणि यूट्यूब व्हिडीओ करायचा काय संबंध?

- प्रज्ञेश महामुनी, भूम, धाराशिव.

पाचवीत आहेस म्हणजे तू अजून लहान आहेस. पण लहान असण्याची एक गंमत असते, फायदा असतो, सांगू का तुला? लहान असताना आपल्याला करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. त्यात सध्या उन्हाळ्याची सुट्टी. म्हणजे किती मज्जा.. अभ्यास नाही, शाळा नाही, होमवर्क नाही आणि काही नाही! तू सुट्टीचं पान वाचतोस ना? इथे किती नवनवीन गोष्टी आहेत तुला वाचायला, करायला.. हो ना? मग तरी तुला आईबाबांच्या फोनवरुन यूट्यूब व्हिडिओजच का करायचे आहेत? म्हणजे यूट्यूब व्हिडिओ करणे यात काही वाईट आहे असं नाही, पण ते करायला वेळ आहे तुला अजून. मग मस्त फिरायचं, टाइमपास करायचा, छान खायचंप्यायचं. फिल्म्स बघायच्या, गेम्स खेळायचे, म्हणजे खरेखुरे ग्राऊंडवर जाऊन खेळण्याचे गेम्स हां, नाही तर परत तू आईबाबांचा मोबाइल मागशील.

तुला एक सांगू का? मोबाइल ही लहान मुलांच्या कामाची गोष्टच नाही. तुला कुणाला फोन करायचा असेल किंवा व्हिडीओ कॉलवर मित्रांशी गप्पा मारायच्या असतील तर आईबाबा देतात ना तुला फोन? झालं तर मग. तुझं मोबाइलवरचं काम तेवढंच आहे सध्या. त्यापेक्षा जास्त मोबाइल बघणं, वापरणं हे तुझ्या डोळ्यांसाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. तुला अभ्यास करुन मोठं व्हायचंय ना? छान करिअर करायचंय ना? मग त्यासाठी डोळे, मेंदू, मन हे सगळं कसं छान निरोगी हवं. मोबाइलवर तू जेवढा जास्त वेळ घालवशील तेवढं ते निरोगी राहाणार नाही हे लक्षात ठेव.

शिवाय आईबाबांचा फोन ते त्यांच्या कामासाठी वापरतात. त्यांचं काम महत्त्वाचं आहे ना? मग त्यांचा फोन तू घेऊन बसलास तर चालेल का? नाही ना? सिंपल आहे. मग चल, यूट्यूब व्हिडिओजचं खूळ आत्ता बाजूला ठेव आणि त्याऐवजी तू काय काय केलंस ते मला कळव, मी वाट बघते.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact