
माझे आई बाबा मला मुलांशी जास्त बोलूच देत नाही. मग ते वयाने मोठे असू देत की लहान. त्यांच्याशी खेळूही देत नाही, त्यांच्यासोबत राहू देत नाही. आई बाबा हे असं का करत असतील?
- अनुष्का
मुलांसोबत जास्त बोलू नकोस, खेळू नकोस असं अनेक घरातून आजही सांगितलं जातंच. याची कारणं अनेक आहेत. आई बाबांची जडणघडण पारंपरिक घडणीतील असेल . त्यांच्यावरचा संस्काराचा तो परिणाम असेल. त्यामुळे तुमच्या वयात असताना जे त्यांच्या आई बाबांनी त्यांना सांगितलं ते आत्ता स्वत: आई बाबा झाल्यावर तुम्हाला सांगत असतील.
- यात आणखी एक बाजू काळजीची देखील आहे. आई बाबांना तुझी फार काळजी वाटत असणार. आजूबाजूला मुलींसोबत विचित्र घटना घडतात. त्याच्या बातम्या सतत वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात, टीव्हीवर पाहायला मिळतात. त्यामुळे तुझ्याबाबातीत काही विचित्र घडू नये असं त्यांना वाटत असणार. त्या काळजीतून तू मुलींसोबत खेळणं मुलांच्या तुलनेत जास्त सुरक्षित वाटत असणार. म्हणून आई बाबा तुला मुलांशी खेळू नको, त्यांच्यासोबत राहू नको असं म्हणत असणार.
-आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समाजात वावरताना अनेकदा लोकं काय म्हणतील याचा विचार केला जातो. त्याची भीती बाळगली जाते, त्याचं दडपण घेतलं जातं. आईबाबांनाही कदाचित तू सतत मुलांसोबत खेळली तर लोकं नावं तर नाही ना ठेवणार? असं वाटत असणार. तुला मुलांशी न खेळू देण्यामागे हेही एक कारण असू शकेल.
- पण म्हणून आई बाबा तुला मुलांसोबत खेळू देत नाही, बोलू देत नाही हे योग्य आहे असं मुळीच नाही. आत्ताच्या काळात मुलगा मुलगी असा भेद पाळायलाच नको. अशा भेदातून मुला मुलींमधलं अंतर वाढत जातं. आपल्या सामाजिक आरोग्यासाठी असा भेद हा घातक आहे. मुलामुलींनी एकत्र खेळणं, एकमेकांसोबत संवाद साधणे यातून मुला मुलींची निकोप वाढ होते. मुलींप्रमाणे मुलंही चांगले मित्रं होऊ शकतात. सर्वच मुलं वाईट नसतात. याबाबत आई बाबांशी तू पुढाकार घेऊन बोलायला हवं. यावर घरात चर्चा घडायला हवी. आई बाबा मुलांशी बोलू नको असं म्हणतात म्हणून चिडून न जाता, त्यांच्याशी न भांडता तुला तुझे मुद्दे मांडत राहावं लागेल.
- तू ज्या मुलांशी खेळते, बोलते, ज्यांच्यासोबत तू वावरते ती मुलं चांगली आहे ना याबाबत आई बाबांमध्ये विश्वास निर्माण होणंही आवश्यक आहे. तो निर्माण करण्यासाठी तू तुझ्या मित्रांशी आईबाबांची ओळख करुन द्यायला हवी. बघ, तुला पटतंय का मी काय म्हणतेय ते? तुझं काही मत असेल तर मला नक्की कळव.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


