सुटी घेऊन माझ्यासोबत घरी थांबण्यात आई बाबांना काय प्राॅब्लेम आहे?

Image: freepik

आम्हाला सुट्या असतात तेव्हा आईबाबा सुट्या घेऊन घरी का नाही बसत?

- अभिषेक सुतार, रत्नागिरी

- जे तुला वाटतं तेच तुझ्या आई बाबांनाही नक्की वाटत असेल. आपल्या मुलाला सुटी लागली आहे. आपणही त्याच्यासोबत घरी थांबावं, त्याच्याशी खेळावं, बोलावं, तुझ्यासोबत बसून तुझ्या आवडीचा एखादा सिनेमा पाहावा असं त्यांना नक्की वाटत असेल. पण जे वाटतं ते त्यांना करता येत नाही. कारण त्यांची नोकरी, व्यवसाय, त्यातील त्यांच्या जबाबदाऱ्या.
- ऑफिसात असलेली कामं, डेडलाइन्स या गोष्टी नोकरी करणाऱ्या तुझ्या आई बाबांना नक्कीच सांभाळाव्या लागत असतील. त्यात घरातल्या कामांच्या जबाबदाऱ्याही असतातच. तरीही तुझी आवड निवड सांभाळणे, सुटीत तुझ्या आवडीचा खाऊ करणे या गोष्टीही ते घाई गडबडीत का होईना पण नक्कीच करत असतील. केवळ ते सुटी घेऊन घरी थांबत नाही याचा राग मानू नकोस किंवा दु:खही करु नकोस.
- उलट आईबाबा जेव्हा ऑफिसमधून घरी येतात तेव्हा त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल हे बघ. नेमके आई बाबा कामावरुन घरी येण्याची आणि तुझी बाहेर पडून खेळण्याची वेळ एकच आहे का ते बघ. नाहीतर तू घरी येईपर्यंत उशीर झालेला असतो. आई बाबांनाही जेवणं उरकून , आवरा आवरी करुन झोपायला जाण्याची घाई असते. तुला सुटी आहे. आई बाबांना नाही. यामुळे सुटी असूनही आई बाबांचा जास्त वेळ आपल्याला मिळत नाही याचं तुला वाईट वाटत राहाणार. त्यापेक्षा आईबाबांचा वेळ जास्तीत जास्त मिळावा यासाठी तुला काय करता येईल ते बघ.
- एरवी शाळा, क्लासेसच्या वेळेत ऑफिसातून दमून आलेल्या आईबाबांना घरकामात मदत करणं शक्य नसतं. सुटीच्या काळात मात्र तू आईबाबांची नक्की मदत करु शकतो. यामुळे त्यांची कामं पटकन आवरायला मदत होईल. त्या वेळेत तुला त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळता येईल , टीव्हीवर एखादा कार्यक्रम , सिनेमा पाहाता येईल. त्यांच्याशी गप्पा मारता येतील. आई बाबांचा क्वालिटी टाइम जर तुला मिळाला तर आई बाबा आपल्या सुटीच्या काळात सुटी काढत नसल्याची खंत वाटणार नाही.
- नोकरी, व्यवसाय, उद्योग सांभाळतांना आलं मनात आणि घेतली सुटी असं करुन चालत नाही. अनेक कामांचं नियोजन करावं लागतं. सुटी घ्यायची म्हटली तर काही कामं आधी उरकावी लागतात. आपल्या कामांची जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवावी लागते. पण ती व्यक्ती जर उपलब्ध नसेल तर मात्र आई बाबांना इच्छा असूनही सुटी घेता येत नाही. त्यामुळे आई बाबा सुटी का नाही घेत यामागची कारणंही तू समजून घ्यायला हवीत.
- सुटीच्या काळातल्या रविवारचं आई बाबांसोबत तू स्पेशल प्लॅनिंग करु शकतो. तसं काही केलं तर सुटीतला प्रत्येक रविवार स्पेशल ठरु शकतो.
- नोकरीच्या ठिकाणी मोजक्याच सुट्या असतात. आई बाबांना घरातली कामं, घरातल्यांच्या तब्येती, आजारपणं नातेवाईकांकडचे कार्यकम या सर्व गोष्टींचा विचार करुन सुट्या जपून वापराव्या लागातत. त्यांच्याकडच्या सुट्यांचं नियोजन करावं लागतं. या नियोजनात तुला सुट्या आहेत म्हणून त्यांनी सलग सुट्या घेवून घरी थांबणं त्यांना शक्य नसतं. तेव्हा सुट्या न घेऊ शकण्याची आई बाबांची बाजूही तू समजून घ्यायला हवी. कदाचित या वर्षी त्यांना नसेल जमलं, पण पुढच्या वर्षी ते जमवण्याचा विचार करत असतील.
- आई बाबा सुट्या घेत नाही अशी सतत तक्रार करण्यापेक्षा तू तुझ्या सुट्यांचं प्लॅनिंग कर. ते आई बाबांशी शेअर कर. यामुळे तुझ्या नियोजनात आई बाबांना त्यांनी स्वत: काय करणे अपेक्षित आहे हे त्यांना समजू शकेल. त्यानुसार तेही वेळ काढण्याचा नक्की प्रयत्न करतील.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact